गुडघ्याचे शस्त्रकर्म झाल्यावरही शांत, स्थिर आणि आनंदी रहाणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !

‘माझ्या बाबांना (सद्गुरु नंदकुमार जाधव यांना) मागील ४ – ५ वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होत होता. ८.१०.२०२४ या दिवशी त्यांच्या पायाच्या उजव्या गुडघ्याचे (‘नी रिप्लेसमेंट’चे) शस्त्रकर्म आधुनिक वैद्य भास्कर प्राणी यांच्या मिरज येथील रुग्णालयात झाले. त्या कालावधीत मला सद्गुरु बाबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. शस्त्रकर्म होण्यापूर्वी विविध चाचण्या करणे आणि चाचण्यांचे अहवाल साधारण येणे अन् ते पाहून आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटणे  

‘सद्गुरु बाबांचे गुडघ्याचे शस्त्रकर्म करण्यापूर्वी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या, उदा. रक्ताच्या चाचण्या, ‘टू डी इको’ (2D echo) (टीप) तपासणी इत्यादी. रुग्णालयातील आधुनिक वैद्य जमगे यांनी चाचण्यांचे अहवाल पाहिल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी काहीच नाही. तुम्हाला वयाच्या ७३ व्या वर्षीही कोणतेच औषध चालू नाही. देवाच्या कृपेने तुम्हाला चांगले शरीर लाभले आहे. असे रुग्ण क्वचितच पहायला मिळतात.’’

टीप : ‘टू डी इको’ (2D echo) तपासणी : या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्या योगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते.

२. अतीदक्षता विभागात असतांनाही शांत आणि आनंदी रहाणारे सद्गुरु नंदकुमार जाधव ! 

शस्त्रकर्म झाल्यानंतर पू. बाबांना काही घंटे अतीदक्षता विभागात ठेवले होते. तेथील ‘परिचारिकेने बाबांना काही त्रास होत आहे का ?’, असे विचारल्यावर बाबा त्यांना ‘नाही’ असे सांगायचे. तेव्हा तेथील एक परिचारिका म्हणाली, ‘‘मी १४ वर्षे इकडे नोकरी करत आहे. एवढा शांत आणि आनंदी रुग्ण मी प्रथमच पहात आहे.’’

 सौ. गायत्री शास्त्री

३. शस्त्रकर्म पुष्कळ चांगले होणे आणि योगासने अन् प्राणायाम केल्यामुळे पायाचा तळवा आणि बोटे यांमध्ये शक्ती असणे 

शस्त्रकर्म झाल्यावर दुसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी सद्गुरु बाबांची तपासणी केली आणि पायाच्या तळव्याची शक्ती जाणून घेतली. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म पुष्कळ चांगले झाले आहे. काही वेळा रुग्णांच्या पायावर सूज येते. तुम्ही प्राणायाम आदी करता का ? तुमच्या पायाचा तळवा आणि बोटे यांमध्ये चांगली शक्ती आहे !’’ बर्‍याच वर्षांपासून सद्गुरु बाबा योगासने आणि प्राणायाम करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले आहे, तसेच त्यांनी रुग्णालयातही शस्त्रकर्म झाल्यावर ४ दिवसांनंतर प्राणायाम करण्यास आरंभ केला. दोन दिवसांनी गुडघ्यावर मलमपट्टी करण्यासाठी जेव्हा आम्ही गुडघ्याची जखम पाहिली, तेव्हा जखमेला संसर्ग इत्यादी काही झाले नव्हते.

४. रुग्णाने चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल भौतिकोपचार तज्ञांना आश्चर्य वाटणे 

दुसर्‍या दिवशी सद्गुरु बाबांची फिजिओथेरपी (भौतिकोपचार) चालू झाली. तेव्हा त्यांचा पाय सहजतेने वर-खाली होत होता. तसेच ते दुसर्‍या दिवसापासून वॉकर (चालण्यासाठी साहाय्य करणारे साधन) घेऊन चांगले चालले. ‘रुग्णाने इतक्या लवकर चांगला प्रतिसाद दिला’, हे पाहून भौतिकोपचार तज्ञांना आश्चर्य वाटले.

५. रुग्णालयातील कर्मचार्‍यांना सनातनच्या सात्त्विक धुपाचा सुगंध आवडणे

रुग्णालयात असतांना आम्ही सद्गुरु बाबांच्या खोलीत सनातनचा धूप लावत होतो. तेव्हा तेथील परिचारिका आणि कर्मचारी यांना धुपाचा सुगंध आवडायचा. तेथील एका मुख्य सेविकेने मला विचारले, ‘‘तुम्ही जो धूप लावता, त्याचे नाव काय आहे? तो कुठे मिळेल? तो आम्हाला रुग्णालयातील सर्व खोल्यांमध्ये लावायचा आहे.’’ मी त्या सेविकेला ‘सात्त्विक सनातन धूपबत्ती’ विषयी माहिती दिली. मी तेथील काही कर्मचार्‍यांना कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले.

६. रुग्णालयातून मिरज आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे

६ अ. जखमेचे टाके संसर्ग (इन्फेक्शन) न होता सुकणे : शस्त्रकर्म झाल्यावर २० दिवसांनी सद्गुरु बाबांच्या जखमेचे टाके काढण्यासाठी रुग्णालयातून एक साहाय्यक आले होते. तेव्हा बाबांच्या जखमेचे टाके एकदम सुकले होते. तेव्हा साहाय्यक म्हणाले, ‘‘बर्‍याच रुग्णांच्या टाक्यांना संसर्ग झालेला असतो आणि टाके व्यवस्थित सुकलेले नसतात. मी इतके चांगले सुकलेले टाके प्रथमच पहात आहे.’’

६ आ. मिरज येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर नातेवाइकांना आनंद होणे : सद्गुरु बाबांना रुग्णालयातून सोडल्यावर आम्ही मिरज येथील सनातनच्या आश्रमात रहायला आलो. तेव्हा आमचे जवळचे नातेवाईक सद्गुरु बाबांना भेटायला आले. नातेवाइकांनी आश्रम पाहिल्यावर त्यांना आश्रमातील स्वच्छता आणि शांतता आवडली अन् पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ‘बाबांनी त्यांच्या नातेवाइकांना जोडून ठेवले आहे’, असे मला वाटले.

७. सद्गुरु बाबांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती 

७ अ. सद्गुरु नंदकुमार जाधव यांची सेवा करतांना मन स्थिर आणि शांत होऊन नामजप सहजतेने होणे : गुरुकृपेने बर्‍याच वर्षांनी मला सद्गुरु बाबांच्या समवेत एक मास रहाण्याची संधी मिळाली. ‘मला सद्गुरु बाबांची सेवा जमेल का ? माझ्याकडून चुका होतील का ? त्यांना काही त्रास होईल का ?’, असे आरंभी माझ्या मनात नकारात्मक विचार आले; परंतु त्यांची सेवा करू लागल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार कधी नष्ट झाले, ते मला कळलेच नाही. त्यांची सेवा करतांना माझ्या मनाची स्थिती स्थिर होती. तसेच ‘माझे मन शांत झाले आहे’, असे मला जाणवायचे. माझा नामजपही सहजपणे होत असे.

७ आ. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी अंघोळ न करताही त्यांची त्वचा चमकदार आणि चेहरा तेजस्वी दिसणे : शस्त्रकर्म झाल्यावर सद्गुरु बाबांनी ३ आठवडे अंघोळ केली नाही, तरीही त्यांची त्वचा चमकदार दिसायची आणि त्यांचा चेहराही तेजस्वी दिसत होता. त्यांच्याकडे पाहून ‘त्यांचे मोठे शस्त्रकर्म झाले आहे’, असे वाटत नव्हते. सद्गुरु बाबांना भेटायला येणार्‍या साधकांनाही असेच वाटायचे.

७ इ. ‘संत आणि सद्गुरु स्वतःच्या शारीरिक त्रासाकडे साक्षीभावाने पाहू शकतात’, हे मला सद्गुरु नंदकुमार जाधव यांची सेवा करतांना शिकायला मिळणे : संत आणि सद्गुरु यांच्या शरिराला कितीही वेदना झाल्या, तरी त्यांच्या मनाचा आनंद न्यून होत नसतो आणि प्रत्येक प्रसंगात ते स्थिर असतात. ‘संत आणि सद्गुरु स्वतःच्या शारीरिक त्रासाकडे साक्षीभावाने पाहू शकतात’, हे मला सद्गुरु बाबांची सेवा करतांना शिकायला मिळाले.

७ ई. सद्गुरु बाबांकडून व्यायाम करवून घेतांना मला चैतन्य मिळायचे. 

७ उ. निवासाच्या खोलीतील प्रकाश वाढणे आणि दैवी सुगंध येणे : आम्ही मिरज आश्रमातील तळमजल्यावर असलेल्या खोलीत निवासाला आहोत. ‘त्या खोलीतील प्रकाश पुष्कळ वाढला असून खोलीत मंद दैवी सुगंध येत आहे’, असे मला जाणवते.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला सद्गुरु बाबांचा सत्संग मिळाला आणि त्यांच्या समवेत दैवी क्षण अनुभवता आले’, याबद्दल कृपाळू गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. गायत्री आदित्य शास्त्री (सद्गुरु नंदकुमार जाधव यांची थोरली मुलगी), फोंडा, गोवा. (२९.१०.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक