‘अ.भा. मराठी साहित्य संमेलना’च्या माहितीपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र न घेतल्याचे प्रकरण !
यंदाचे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’, देहली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. या संमेलनाचे आयोजन पुण्यातील ‘सरहद संस्थे’ने केले आहे. त्या संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसल्याविषयी स्वत:चे विचार सांगितले. ते म्हणतात ‘महाराष्ट्रात २ वैचारिक गट होते. जहाल गट आणि मवाळ गट ! मवाळ गटाचे गोपाळ कृष्ण गोखले आणि जहाल गटाचे लोकमान्य टिळक यांची छायाचित्रे घेण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र घेतले नाही.
१. जहाल आणि मवाळ अन्य साहित्यिकांचीही छायाचित्रे का नाहीत ?
महाराष्ट्रात मवाळ आणि जहाल हे गट होते, ते राजकारणात दिसून येतात. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कार्य करणार्यांच्या विचारांचे ते २ प्रवाह होते. ते प्रवाही विचार साहित्यासाठी आणि आपल्या लाभासाठी घेणे, ही अरसिक वृत्ती म्हणावी लागेल. साहित्यात जर असे विचार घ्यायचेच असतील, तर जहाल गटाचे पु.भा. भावे आणि मवाळ गटाचे पु.ल. देशपांडे यांची छायाचित्रे घ्यायला पाहिजे होती. हे दोघेही पूर्वी झालेल्या मराठी सािहत्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
महत्त्वाचे म्हणजे दोघेही सावरकरी साहित्याला आणि त्यांना मानत होते. पु.भा. भावे यांची विचारधारा सावरकर यांच्या विचारधारेत मिसळणारी होती; पण पु.ल. देशपांडे यांची त्यांनी अंदमानच्या कोठडीत सावरकर यांना वाहिलेली श्रद्धांजली श्री. नहार यांनी ऐकावी आणि मग सावरकर यांचे साहित्यातील स्थान समजून घ्यावे.
२. सावरकर यांच्या काव्याला आदराचे स्थान
येथे पु.ल. देशपांडे यांनी सावरकर यांची सांगितलेली आठवण नहार यांच्यापुढे ठेवतो. महाराष्ट्रातील म्हैसाळ या गावी श्री. देवल यांनी समाजातील दलित स्त्रियांना घेऊन त्या काळी सहकारी दूध संस्था काढली होती. तेथील कार्यक्रमात स्वागतासाठी पु.ल. देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी तेथील त्या महिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले…’, हे गीत सुंदर आवाजात आणि तालात सादर केले, असे देशपांडे यांनी नमूद केले आहे. त्यानंतर ते म्हणाले की, सावरकर यांचे खरे कार्य आपण करत आहात. हा सावरकर यांच्या साहित्याचा झंकार आहे.
पुण्यात झालेल्या ‘अखिल भारतीय महापौर परिषदे’चे अध्यक्षस्थान मवाळगटाचे भाई वैद्य हे पुण्याचे महापौर असल्यामुळे त्यांच्याकडे होते. त्या कार्यक्रमाचे स्वागतगीत म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, हेच म्हटले गेले.
९२ वर्षांपूर्वी म्हणजेच २२ फेब्रुवारी १९३३ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने रत्नागिरी येथील भागेश्वर मंदिरात शिवू भंगी या सावरकर यांच्या विद्यार्थ्याने गीतेचा १२ वा अध्याय म्हणून,
मी तहान जल तो जाण । मी कुडी माझा तो प्राण ।
मी भक्त नि तो भगवान । चरण त्याचे शिवुं द्या ।
मला देवाचे दर्शन घेऊ द्या । डोळे भरून देवास मला पाहू द्या ।।
हे कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले गीत म्हणून मंदिरात प्रवेश केला. त्या वेळची परिस्थिती डोळ्यांसमोर उभी करून हे गीत आपण त्या भावात म्हणाल, तर आजही नहार तुमच्या नेत्रातून पाणी आल्याविना रहाणार नाही. ही त्या साहित्यिकाकडून झालेली सरस्वतीची सेवा आहे.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषाशुद्धीसाठी अनेक वर्षे प्रयत्न !
सावरकर यांचा भाषाशुद्धी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. सावरकर ‘मराठी शब्द वापरा’, असे सांगत. पुण्यातील सुप्रसिद्ध विद्वान श्री. दत्तो वामन पोतदार हे वर्ष १९३६ मध्ये रत्नागिरीस सावरकर यांना जाऊन भेटले. ते म्हणतात ‘आम्ही भाषाशुद्धीवरच बोललो.’ पोतदार म्हणाले, ‘तात्याराव आम्ही जे परकीय शब्द आत्मसात् केले आणि पचवून टाकले, ही आमची विजय चिन्हे आहेत, असे म्हणतात.’ सावरकर ताडकन म्हणाले, ‘दत्तोपंत चुकत आहात आपण, ती काही आमची विजय चिन्हे नाहीत. ते आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.’ या सावरकर यांच्या म्हणण्यात काय चूक होती ?
स्वराज्य स्थापन होताच छत्रपती शिवरायांनी रघुनाथ पंडितांना राजव्यवहारकोष करण्याची आज्ञा केली. ही कर्तव्यदृष्टी होती म्हणूनच सावरकर यांनी परराज्याचे दास्यत्व झुगारण्याच्या प्रयत्नासह परकीय भाषांचेही दास्यत्व झुगारायला शिकवले.
भाषाशुद्धीवर सावरकर यांनी पहिला लेख वर्ष १९२५ मध्ये लिहिला आणि शेवटचा लेख ‘केसरी’मध्ये वर्ष १९५१ मध्ये लिहिला. अशा प्रकारे सतत २५ वर्षे मराठीच्या भाषाशुद्धीचा नेटाने प्रचार करत होते. म्हणूनच नू.म.वि. हायस्कूलची प्रशाळा झाली. अत्रे हे ‘प्रिन्सिपॉल’ होते, त्याचे आचार्य झाले. वेलणकर सांगलीच्या ‘मिल’चे वर्ष १९४० पर्यंत मालक होते; पण
३० जुलै १९४१ मध्ये सावरकर सांगलीला गेले आणि ‘मालका’चे ते ‘धनी’ झाले. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीत आणि दैनंदिन व्यवहारांत सावरकर यांच्यामुळे ३०० ते ४०० मराठी शब्द महाराष्ट्राला वापरायची सवय झाली.
४. तत्कालीन परिस्थितीत साहित्यापेक्षा ‘सैनिकी शिक्षणा’ला महत्त्व देण्यास सांगणे
संजय नहार शेवटी सांगतो, ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, या संदेशामुळे सावरकर यांचे जे भाषण अत्यंत गाजले. त्या १५ एप्रिल १९३८ मध्ये मुंबईत झालेल्या ‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’च्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप करतांना त्यांनी व्यासांच्या महाभारतातील वचनाचाच आधार दिला. ते म्हणाले ‘आजच्या राष्ट्रीय परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व दुय्यम आहे. तेव्हा तरुणांचे पहिले कर्तव्य आहे ‘सैनिकी शिक्षण’; कारण सर्व साहित्यिकांचा सम्राट जो व्यास त्यानेच स्पष्टपणे सांगितले आहे की,
उन्मर्यादे प्रवृत्ते तु दस्युभिः सङ्करे कृते ।
सर्वे वर्णा न दुष्येयुः शस्त्रवन्तो युधिष्ठिर ।। – महाभारत, पर्व १२, अध्याय ७८, श्लोक १८
अर्थ : हे युधिष्ठिर, जेव्हा दरोडेखोर प्रजासमूहाची मर्यादा आणि जाती नष्ट करण्यास प्रवृत्त होतील, तेव्हा सर्व वर्ण शस्त्रग्रहण करण्याने दोषी ठरणार नाहीत.
हे सध्याच्या परिस्थितीत सैनिकी शिक्षणाचे महत्त्व, या राष्ट्रासाठी सांगण्याचे कार्य देहलीत करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्याचे उद्गाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र व्यासपिठावर लावून ‘महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे’, ही त्यांची गर्जना हिंदुस्थानभर दुमदुमण्यासाठी आपण त्याचे श्रेय घ्यावे आणि मनाचा मोठेपणा दाखवावा, हीच विनंती.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्री. विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा; अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ आणि कार्यकर्ता, हर घर सावरकर समिती.
संपादकीय भूमिकाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसणे, हा सावरकरद्वेषच ! |