हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

श्री. विजय भोर, प्रतिनिधी

हरिद्वार – कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

ते पुढे म्हणाले की,

१. देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाद्वारे हरिद्वारमध्ये कोरोना चाचणी चालू करण्यात आली. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. सध्या एका दिवसाला ४ सहस्र जणांची चाचणी केली जात आहे. यामध्ये कुंभमेळा क्षेत्रातील आखाडे, आश्रम, उपाहारगृह यांचा प्राधान्याने समावेश आहे. त्याचप्रमाणे जे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि उपाहारगृहातील कामगार यांचा थेट जनतेशी संबंध येत आहे, त्यांचीही चाचणी करून त्यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. सध्या ३९ रुग्णालयांच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात आहे.

२. महाशिवरात्रीच्या पवित्र स्नानानंतर शासनाच्या आदेशानुसार १७ ते २२ मार्च या कालावधीत ३० सहस्र जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये ४९ जण कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

३. एक एप्रिलपासून सर्व घाटांवर, वाहनतळ, रेल्वेस्थानक, रुग्णालये, हरिद्वारमध्ये येणार्‍या महार्गावरील प्रवेशद्वार, महामार्गापासून आत जाणारे रस्ते या सर्व ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र चालू करण्यात येणार आहे.

४. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हरिद्वारमध्ये येणार्‍यांचा कोरोनाचा (आर्.टी.पी.सी.आर् अहवाल) ७२ घंट्यांच्या कालावधीतील नकारात्मक अहवाल असणे आवश्यक आहे. ज्यांचा असा अहवाल नसेल, त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे.

५. कोरोनाबाधितांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये २ सहस्र खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेेत. आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास धर्मशाळा आणि हॉटेल्स आदी कह्यात घेण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी १० सहस्र खाटा उपलब्ध होणार आहेत.

६. इंडियन मेडिकल असोसिएशन शहरातील सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा (४ सहस्र खाटा), आधुनिक वैद्य आणि कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती संभूकुमार झा यांनी दिली.