
पंढरपूर – पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठाचा कचरा आणि नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे. पाणी वहाते नसल्याने शेवाळ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पाण्याची पातळी न्यून झाल्याने नदीपात्रात भाविकांना स्नान करतांना अडचणी निर्माण होत आहेत. याची नोंद घेत प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी ५० स्वच्छता कर्मचार्यांकडून नदीकाठाचा कचरा आणि शेवाळे काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले आहे.
येत्या ४ ते ५ दिवसांत सर्व शेवाळे काढण्याचे काम पूर्ण होईल. चैत्र यात्रेच्या निमित्ताने नदीपात्रात लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे, हे पाणी सोडल्यास नदीतील घाण पाणी निघून जाईल आणि वारकर्यांनाही चैत्री यात्रा कालावधीमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये स्नान करता येईल, असे नगरपालिका प्रशासनाने कळवले आहे.
संपादकीय भूमिका :पवित्र चंद्रभागा नदी नेहमीच स्वच्छ कशी राहील, असे प्रयत्न प्रशासनाकडून होणे अपेक्षित ! |