पणजी, २३ मार्च (वार्ता.) – गोव्यात येणार्या प्रवाशांना कोरोनाबाधित नसल्याचा दाखला आणणे बंधनकारक करता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात शेजारील राज्यांतून येणार्या प्रवाशांना कोरोनाबाधित नसल्याचा दाखला आणणे बंधनकारक करण्याची शिफारस शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात आर्थिक घडामोडी पुन्हा बंद करता येणार नाहीत. कोरोनासंबंधी चाचण्यांमध्ये वाढ करता येईल, तसेच मास्क न घालणे आदी नियमांचे पालन न करणार्यांच्या दंडाच्या रकमेतही वाढ करता येते. राज्यात शिमगोत्सव घ्यायचा कि नाही, हे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण किती आहे यावर ठरणार आहे.’’
कला अकादमीचे ५० कोटी रुपये खर्चून सुशोभिकरण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता
कला अकादमीचे ५० कोटी रुपये खर्चून सुशोभिकरण करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. मूळ ढाच्यात पालट न करता कला अकादमीचे पूर्णपणे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. कला अकादमीचे ‘वॉटर प्रूफींग’चे कामही घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.