सचिन वाझे यांच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज करणार !

आतंकवादविरोधी पथकाची पत्रकार परिषद

आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह

मुंबई – सचिन वाझे सध्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत असून २५ मार्च या दिवशी त्यांची पोलीस कोठडी संपणार आहे. वाझे यांच्या विरोधात काही महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात जबाब देण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कह्यात घेण्यासाठी आम्ही २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी जयजीत सिंह यांनी म्हटले की,

१. मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला, त्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळालेला नव्हता. सचिन वाझे यांनी पुरावे नष्ट केले. त्यांनी दिलेला जबाब खोटा असल्याचे पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले असून पुढील अन्वेषण चालू आहे.

२. मनसुख यांच्या हत्येच्या कटात वापरलेल्या सीमकार्डचा शोध लागला आहे. वाझे यांच्या सांगण्यावरून एका सट्टेबाजाने गुजरात येथील एका आस्थापनाच्या नावे हे सीमकार्ड विनायक शिंदे यांना दिले. विनायक शिंदे हे वर्ष २००७ मधील लखनभैय्या चकमकीतील आरोपी असून त्यांना निलंबित करून अटक करण्यात आली होती. ते मे २०२० पासून पॅरोलवर बाहेर आहेत.

३. मनसुख यांच्या हत्येमध्ये विनायक शिंदे यांचाही सहभाग आहे. विनायक शिंदे यांनीच मनसुख यांना बोलावून घेतले होते. या प्रकरणात वापरण्यात आलेली १४ सीमकार्ड आतंकवादविरोधी पथकाच्या हाती लागली आहेत. ही सीमकार्ड ज्या भ्रमणभाषमध्ये वापरण्यात आली, त्यांतील काही भ्रमणभाष आरोपींनी नष्ट केले आहेत. या व्यतिरिक्त आरोपींच्या विरोधात आमच्याकडे अनेक पुरावे आहेत.

४. अनेक मार्गावरील ‘सीसीटीव्ही फुटेज’ आमच्याकडे आहेत. काही सीसीटीव्ही फुटेज आरोपींनी नष्ट केले आहेत.

पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर न देताच जयजीत सिंह निघून गेले !

मनसुख हत्येच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने प्रथमच ही पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना अधिकृतपणे माहिती दिली; मात्र या पत्रकार परिषदेत कोणती नवी माहिती न देता यापूर्वी माध्यमांनी प्रसारित केलेली माहिती जयजीत सिंह यांनी दिली. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत स्वत:चे निवेदन झाल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे न देताच जयजीत सिंह निघून गेले.