ममता बॅनर्जी घायाळ झाल्याने निवडणुकीत दीड मास प्रचार करू शकणार नाहीत !

पायाचा अस्थीभंग झाल्याने रुग्णालयात असलेल्या ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी १० मार्च या दिवशी नंदीग्राम येथे प्रचार करत असतांना एका लहान अपघातात त्यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या उजव्या खांद्याला, मानेला दुखापत झाल्याचे एम्.आर्.आय. स्कॅनमध्ये समोर आले आहे. यामुळे पुढील दीड मास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये त्यांना प्रचार करता येणार नाही.

भाजपने घातपात घडवून आणल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या घायाळ होण्यामागे घातपात असल्याचा आरोप केला आहे. यामागे भाजपचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या घटनेच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपनेही या घटनेवरून आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजप, तसेच काँग्रेसने याला ‘ममता बॅनर्जी यांचे नाटक’ अशा शब्दांत हिणवले आहे.