काही दिवसांपूर्वी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. त्याविषयी मुंबई, महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांसह राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करीत आहेत. या गाडीत मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देणारे पत्रही सापडले आहे, तर २८ फेब्रुवारी या दिवशी ‘जैश उल हिंद’ या आतंकवादी संघटनेने ‘ही स्फोटकांनी भरलेली गाडी आम्हीच ठेवली होती’, असे पत्रक जारी करून सांगितले आहे. ‘हा केवळ ट्रेलर होता, पिक्चर अजून शेष आहे’, असे सांगून अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. तिची पूर्तता न झाल्यास आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. या घटनेनंतर अंबानी यांची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली; मात्र हे पुरेसे आहे का ? कारण भविष्यात भारतातील अन्य उद्योगपतींना आतंकवाद्यांनी लक्ष्य केले, तर त्यावर काय उपाय आहे ? त्यामुळे उद्योगपतींची सुरक्षा वाढवण्यासह आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला संपवल्यास ही समस्याच मुळापासून नष्ट होईल.
पोलीसयंत्रणा कसून अन्वेषण करत असली, तरी एवढ्या गजबजलेल्या आणि सुरक्षाव्यवस्था असणार्या परिसरात आतंकवादी येऊन आरामात गाडी ठेवून पळून जातात, यातून सुरक्षा किती कुचकामी आहे, हे निदर्शनास येते. मुंबईसारखे शहर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मोठे केंद्र आहे. परिणामी ते नेहमीच आतंकवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर राहिले आहे. आजवर अनेक बॉम्बस्फोट, आतंकवादी आक्रमण या शहराने झेलले आहे. त्यामुळे येथे मुंबई पोलीस डोळ्यांत तेल घालून शहराची सुरक्षा करत असतात. असे असूनही २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या असलेली मोठी गाडी एका मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर येऊन कशी थांबते ? ही गाडी विक्रोळी येथून चोरल्याचे आणि या गाडीसमवेत असलेली दुसरी गाडी मुंबईबाहेर गेल्याचे समजते. आतंकवाद्यांना अथवा बाहेरील गुन्हेगारांना नेहमीच स्थानिक ठिकाणी कार्यरत ‘स्लीपर सेल’चे मोठे साहाय्य मिळते. ही ‘स्लीपर सेल’ आतंकवादी आक्रमणात मुख्य भूमिका बजावतात. परिणामी आतंकवादी सुरक्षायंत्रणेला गुंगारा देऊन पळून जातात. सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि ‘स्लीपर सेल’ शोधून ती उद्ध्वस्त करण्यासाठी वेगाने कृती करणे आवश्यक आहे. या पूर्ण घटनाक्रमातून मुंबई अजूनही असुरक्षित आहे, हे दिसून येते.