वर्ष २०२१ च्या गोव्याच्या अर्थसंकल्पात शासन कर किंवा शुल्क यांमध्ये कपात करण्याच्या विचारात

पणजी, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा शासन ‘गोवा अर्थसंकल्प २०२१’ मध्ये कर किंवा शुल्क यांमध्ये कपात करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पाला अनुसरून ‘सी.आर्.ई.डी.ए.आय.’, ‘जी.एस्.ए.’ आणि लहान हॉटेल व्यावसायिक यांच्यासमवेत ११ फेब्रुवारी या दिवशी बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पायाभूत सुविधा कर २ टप्प्यांमधून घेण्यात येणार आहे. अर्थसंकल्प मांडण्याचा दिवस पुढील आठवड्यात निश्‍चित केला जाणार आहे.’’

पंचायतींसमवेत शनिवारी ‘व्हर्च्युअल’ बैठक

पणजी – ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी राज्यातील सर्व १९८ पंचायतींसमवेत ‘व्हिडिओ कान्फरसिंग’द्वारे ‘व्हर्च्युअल’ बैठक घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेला चालना देणार्‍या पंचायतींना ५० लाख रुपये अनुदान देणार

केंद्राने ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेसाठी गोव्याला ३०० कोटी रुपये दिले आहेत. ज्या पंचायती ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच स्मशानभूमी, पंचायत घर, सभागृह आदी नवीन प्रकल्पांविषयी ‘स्वयंपूर्ण मित्र’ यांनी प्रमाणित केलेला अहवाल वेळेत शासनाला सुपुर्द करणार, त्यांना योजनेअंतर्गत ५० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहेत. काही ‘स्वयंपूर्ण मित्र’ अधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार काही पंचसदस्य त्यांना सहकार्य करत नाहीत. राज्यातील सर्व पंचायतींचे सरपंच आणि पंचसदस्य यांनी शासनाला केंद्राची योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.