देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

  • एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद होय ! हिंसाचार भडकावणार्‍यांवर आता पोलीस काय कारवाई करणार, हेही त्यांनी जनतेला सांगावे !
  • हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !
डावीकडून अभिनेता दीप सिद्धू आणि कुख्यात गुंड लक्खासिंह सिधाना

नवी देहली – राजधानी देहलीत हिंसाचार घडवणार्‍यांचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणात कुख्यात गुंड लक्खासिंह सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांनी नावे समोर आली आहेत.

लक्खा सिधाना याच्या विरोधात १२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद !

लक्खा सिधाना आणि त्याचे साथीदार यांची सेंट्रल देहलीत हिंसाचार घडवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. आंदोलनातील तरुणांना हिंसाचारासाठी भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

(सौजन्य : India News Live)

त्याच्या विरोधात पंजाबामध्ये १२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये हत्या, लूटमार, अपहरण, खंडणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. त्याच्या विरोधात शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत खटलाही चालू आहे. विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात लक्खा सिधाना याला कारावासाची शिक्षाही झाली आहे; मात्र या प्रकरणांमध्ये पुरावे न सापडल्यामुळे त्याची सुटका झाली आहे.

(सौजन्य : ABP NEWS HINDI)

लाल किल्ल्याच्या परिसरात हिंसाचार घडवण्यामागे दीप सिद्धू याचा हात !

ट्रॅक्टर मोर्च्याला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर ‘निशाण ए साहिब’ हा ध्वज फडकावला. तो फडकावण्यामागे दीप सिद्धू याचा हात असल्याचे पुढे येत आहे. दीप सिद्धू याने शेतकर्‍यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरियाणातील प्रमुख गुरनामसिंह चाडू यांनी केला आहे. दीप सिद्धू यानेच शेतकर्‍यांचे  नेतृत्व केले आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला आणि नंतर तेथे हिंसाचार उसळला, असा आरोप त्याच्यावर होत आहे.