पणजी, २६ जानेवारी (वार्ता.) – गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक आणि साहित्यिक श्री. विनायक विष्णु खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला ७ जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मूभषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आले.
पुरस्कार घोषित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना श्री. खेडेकर म्हणाले, लोकसंस्कृतीसाठी दिलेल्या योगदानाची शासनाने नोंद घेतल्याने आनंद झाला. लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात पुष्कळ कार्य करायचे आहे. या पुरस्काराने दायित्व वाढले आहे. गोव्याची संस्कृती जागतिक नकाशावर पोचावी, यासाठी मी काम करणार आहे.
विनायक खेडेकर यांचा परिचय
श्री. विनायक खेडेकर यांनी कला अकादमीत बरीच वर्षे सदस्य सचिव हे दायित्व सांभाळले आहे. भारत सरकारचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून त्यांनी रशिया, अमेरिका, यांसह आशियाई देशांचे दौरे केले आहेत. गोवा शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, रंग सन्मान पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले असून आकाशवाणी आणि दूरदर्शन यांसाठीही कार्यक्रम केले आहेत.