१. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काटेकोरपणे सिद्धता करणे
‘एका बलिष्ठ आणि अगडबंब सत्तेविरुद्ध अनेक वर्षे नेटाने लढा देण्यासाठी जी जी सिद्धता करावी लागते, ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काटेकोरपणे केली होती. अतिपूर्वेतील अनेक देशांत वसलेल्या २५-३० लाख हिंदी जनतेची नागरिक संघटना, सैनिकी आणि आर्थिक बळ पुरवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी होती. इंग्रजांच्या तालमीत शिकून सिद्ध झालेली ३०-४० सहस्र सेना सिंगापूरमध्ये जपान्यांना शरण गेले आणि नेताजींच्या बाजूने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढावयास सिद्ध झाली. योग्य त्या अधिपत्याखाली युद्ध चालावे; म्हणून नेताजींनी स्वतंत्र भारताचे एक सरकारही स्थापन केले. एवढेच काय पण भारताचा एकेक भाग आपल्या कह्यात येईल, तसे त्यातील नाणी, नोटा, तार आणि ‘मनिऑर्डर’ यांचे अर्ज आदी सर्व स्वतंत्र सरकारचेच असावे, याविषयीही त्यांनी काटेकोर दक्षता बाळगली.
२. पेनांग उत्पाती विद्याकेंद्र
२ अ. परतंत्र भारताला नेताजींनी दिलेल्या धडकीत या उत्पाती केंद्राचा पुष्कळ हात असणे
नेताजींच्या सिद्धतेत एका विशिष्ट गोष्टींचा अंतर्भाव झाला होता. ती गोष्ट म्हणजे पेनांग येथील स्वातंत्र्यसेनेचे उत्पाती विद्याकेंद्र ! नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यात काही अल्प ज्ञात किंवा अज्ञात गोष्टींत या उत्पाती केंद्राचा उल्लेख केला पाहिजे. परतंत्र भारताला नेताजींनी दिलेल्या धडकीत या उत्पाती केंद्राचा पुष्कळ हात होता. या केंद्रात शिकून सिद्ध झालेल्या काही व्यक्तींनी चिवट मर्दुमकीची आणि देशभक्तीची शर्थ, तर काहींनी भित्री फितुरीही केली.
२ आ. शत्रूच्या गोटात शिरून उत्पात आणि अपघात घडवून गडबड गोंधळ निर्माण करणे अन् शत्रूला त्रस्त करणे
एखाद्या मोठ्या, अफाट शक्तीविरुद्ध उठाव करायचा असतांना ‘गनिमी कावा’ फार उपयोगी पडतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिकमती कर्तृत्वावरून आपल्याला पटलेले आहेच. शत्रूच्या गोटातून उत्पात, अपघात घडवून आणून गडबड आणि गोंधळ निर्माण करण्याने ‘शत्रूची शक्ति मूले कुठार:’ या न्यायाने पुष्कळ खच्ची होते. प्रत्यक्ष युद्ध सिद्धतेत तर खंड पडतोच; पण त्यापेक्षा आपल्याला ‘थेट शत्रूच्या गोटात आणि बालेकिल्ल्यात विरोधकांचा धुमाकूळ चालू झाला’, ही भावनाच शत्रूला मोठी घाबरून सोडणारी असते. शत्रू बेजार होतो. त्याला काय करावे ?, कुठे जावे ? असा भ्रम पडतो. फितुरीचे बीज कुठे कुठे रुजले असेल, याची शत्रू धास्ती घेतो. सगळीकडून रान उठवून एखाद्या वाघाचा पाठलाग केल्याप्रमाणे शत्रू त्रस्त होतो. पेनांगचे उत्पाती विद्याकेंद्र स्थापन करण्यात नेताजींची हीच दृष्टी होती.
२ इ. पेनांग बंदराच्या परिसरात स्वातंत्र्यसेनेचे गुप्त गडी शिकवून सिद्ध करण्याचे काम चालणे
मलायाच्या पूर्व किनार्यावर ‘पेनांग’ नावाचे एक सुंदर टुमदार गाव आहे. समुद्रकाठचे हे गाव फारच निसर्गरम्य वाटते. पेनांग बंदराच्या समोर वृक्षाच्छादित २-३ पर्वतांनी थोडा आडोसा निर्माण केलेला दिसतो. पहाडावरील तोफा पलीकडे खुुल्या समुद्रावर स्वतःची भेदक नजर रोखून ठेवतात. काही क्रृद्ध मुद्रेने आकाशातील शत्रू विमानांचा समाचार घेण्यास टपलेल्या असतात. अशा कडेकोट बंदोबस्तात जंगलमय पर्वतांच्या विस्तीर्ण घेरामध्ये पहारा, नाविक शिक्षण, सैनिक हालचाली आणि शत्रूवर मारा करणे आदींची काही गुप्त ठिकाणे होती. कुशल आणि शूरवीर जपानी सैनिकांनी हा सर्व भाग बघता बघता इंग्रजांशी युद्ध पुकारून चुटकीसरशी आपल्या कह्यात घेतला होता. याच पेनांग बंदराच्या परिसरात पर्वतांच्या आडोशाला एका खबदाडींत नेताजींच्या स्वातंत्र्यसेनेचे विद्याकेंद्र निमूटपणे स्वतःचे कार्य करत होते. भारतात धूमधडाका उडवणारे स्वातंत्र्यसेनेचे गडी गुप्तपणे शिकवून सिद्ध करण्याचे काम येथे चालत असे.
३. नेताजींची स्वातंत्र्यसेना आणि जपानी सेना यांचे संयुक्त आक्रमण करण्याच्या दृष्टीने पाहणीच्या कामास प्रारंभ !
नेताजींच्या स्वातंत्र्यसेनेला अन्य क्षेत्रांत जसे जपानी युद्धकौशल्य आणि युद्धतंत्र यांचे साहाय्य मिळाले, तसे ते उत्पाती विद्याकेंद्रासही लाभले. कर्नल गिलानी नावाचे एक भारतीय गृहस्थ केंद्राचे वरिष्ठ अधिकारी होते. तेथे उत्पाती गुप्तदल शिकवून सिद्ध करणारे जे जपानी तज्ञ होते, त्यात कॅप्टन यामानूची मुख्य होते. वर्ष १९४३ मधील ऑगस्ट मासापासून येथील शिक्षणकार्याची लगबगीने सिद्धता चालू झाली. ब्रह्मदेश आणि भारत यांच्या सरहद्दीवर नेताजींची स्वातंत्र्यसेना आणि जपानी सेना यांंचे संयुक्त आक्रमण लवकरच चालू करण्याच्या दृष्टीने आघाडीच्या पाहणीच्या कामास प्रारंभ झाला. रसदीचा मार्ग, चौक्या पहारे, सैन्याचे मुख्य तळ, तोफांचे मोर्चे, विमानतळ आणि शत्रूप्रदेशावर आरंभीचे भुरटी आक्रमणे करणार्या गनिमी तुकड्यांची शिबिरे कुठे कुठे असावीत, यांची नकाशावर आखणी झाली.
४. आक्रमणाची पूर्वसिद्धता
अ. ब्रह्मदेश-भारत आघाडीवर होणार्या या आक्रमणाची नांदी म्हणून कोलकाताच्या औद्योगिक आणि नाविक परिसरांत बॉम्ब फेकणार्या विमानांनी धुमधडाका चालू केला. नेताजींच्या स्वातंत्र्यसेनेच्या आगामी आक्रमणाची सूचना देणारी शेकडो पत्रकेही वेळोवेळी हेलकावत हेलकावत कोलकाता आणि आसाम येथील सरहद्दीवर येऊन विसावू लागली.
आ. पेनांग येथील उत्पाती विद्याकेंद्रास गुप्त सैनिकांच्या तुकड्या शिकवून सज्ज ठेवण्याचे हुकूम देण्यात आले. प्रत्येक ३ मासांत ८-८ किंवा १०-१० सैनिकांच्या दोन, तीन तुकड्या सिद्ध ठेवण्याचे कार्य चालू झाले. प्रत्येक तुकडीच्या कार्यक्षेत्राप्रमाणे त्यांच्या शिक्षणांत थोडा फार भेद असे.
इ. पेनांग येथे सिद्ध झालेल्या काही तुकड्या ब्रह्मी सरहद्दीतून नाग पहाडी आणि आसाम येथे सोडण्यात आल्या. काहींना रात्री विमानांतून पॅराशूटच्या साहाय्याने बंगाल आणि बिहार प्रांतात रानावनांत उतरवण्यात आले. तसेच विशाखापट्टणम्, मद्रास, लंका, मुंबई, कन्याकुमारी, मलबार, कोकणपट्टी, गुजरात ते कराची अशा विस्तीर्ण सागर किनार्यावर स्वातंत्र्यसैनिकांची गुप्त उत्पाती पथके सोडण्याचा कार्यक्रम आखण्यात आला.
५. उत्पाती केंद्रात देण्यात येणारे शिक्षण
अ. गाजावाजा न करता थोड्या थोडक्या साहित्याने रेल्वेचे रूळ उखडणे, दारूगोळ्याच्या कोठाराला आग लावणे, सुरुंग लावून तटबंदी उद्ध्वस्त करणे, तोफा-बंदुका आदी शत्रूंची शस्त्रेे निकामी करणे, जहाजे बुडवणे, आणीबाणीच्या प्रसंगी हातघाईचा प्रसंगच आला, तर शत्रूला गारद करणे इत्यादी शिक्षण पेनांगच्या केंद्रात देण्यात येई.
आ. ही कामगिरी बजावता यावी; म्हणून कित्येक अनुषंगिक गोष्टी शिकाव्या लागत. पोहणे, पाण्याखालून मार्ग काढणे, त्या त्या प्रांताची भाषा बोलणे, बैरागी, संन्यासी, साधु, भिकारी, फकीर, लोहार, चांभार, कोळी आदी बेमालूम बनाव करणे, अनेक शस्त्रे हाताळणे, गुप्तपणे बातम्या धाडण्याची निरनिराळी तंत्रे हाताळणे या गोष्टींचा समावेश असे.
इ. पहाटे आणि सायंकाळच्या काळोखात पोहण्यासंबंधी शिक्षणाचे प्रात्यक्षिक पेनांगच्या भोवती सागरपर्वतांच्या प्रदेशात दिले जाई. भाषा आणि व्यवसाय यांचे शिक्षण दिवसा दिले जाई. दिवसभरातील एकूण शिक्षण साधारण १५ घंटे चाले.
ई. विद्याकेंद्रात शिक्षणक्रमासाठी निवडल्या जाणार्या व्यक्तींना अन्य जगाशी संबंध तोडावा लागे. त्यांना इतरत्र कुठेही जाण्याची बंदी होती. त्यांना भेटायला कुणीही येऊ शकत नसे. एकदा घर सोडल्यावर ही मुले कुठे आहेत ?, त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण झाला किंवा नाही आणि त्यांना कामगिरीवर कुठे धाडले ? याविषयी त्यांच्या घरच्यांनाही काही सुगावा लागत नसे. कोट्यवधी लोकांच्या पिढ्यान्पिढ्या सुखी समृद्ध करायच्या असतील, तर सहस्रो लोकांना खडतर देशसेवेचे इतके कडक व्रत अंगीकारावे लागते.
६. दुसर्या महायुद्धाच्या आरंभीच्या ४ वर्षांत इंग्रजांना हार पत्करावी लागल्यावर त्यांनी भारतात सैन्य आणि शस्त्रास्त्रे यांची वेगाने जुळवाजुळव करणे
पेनांगच्या उत्पाती केंद्रात एका वर्षांत अनुमाने १०० ते १२५ गुप्त सैनिक शिकून सिद्ध झाले. काही युक्तीने नागप्रदेशांत (बर्मा) आणि आसामात शिरले. इतरांना जर्मन पाणबुड्या बोटींतून भारताच्या समुद्रकिनार्यावर ठिकठिकाणी बहुदा कोळ्यांच्या वेशात उतरवण्यात आले. दुसर्या महायुद्धाच्या आरंभीच्या ४ वर्षांत इंग्रजांना जिकडे तिकडे जबरदस्त मार बसला. त्यामुळे ते पुन्हा भारतात सैन्य आणि शस्त्रास्त्रे यांची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करू लागले. रेल्वे आणि विमाने भरभरून दारूगोळा अन् सैनिक भारत आणि ब्रह्मदेश सरहद्दीकडे जाऊ लागले. रेल्वेच्या मार्गावरील नाक्याच्या स्थानकावर युद्धसाहित्य आणि सैनिक यांची एकच गर्दी उडून जाई. त्यांच्या मागोमाग कोलकाता, मद्रास (चेन्नई), कोलंबो, कोचीन, मुंबई आणि कराची येथे अनेक जहाजांचे तांडे अविरत सैनिक अन् युद्धसामुग्री उतरवत होते.
७. गुप्त उत्पाती सैनिकांनी धुमाकूळ घालून इंग्रजांची अतोनात हानी करणे
युद्धाच्या या घाईत आणि झुंबड गर्दीत नेताजींच्या १००-१२५ गुप्त उत्पाती सैनिकांना चांगले फावले. आसाम-बंगाल विभागांत रेल्वे रुळाचे सांधे पालटणार्या माणसांस गुंगीचे औषध देऊन स्वत: ते उलटेपालटे करून लष्करी आणि मालगाड्यांच्या धडका घडवून आणणे, दारूगोळ्यांच्या साठ्यांना सुरुंगाने उद्ध्वस्त करणे, रेल्वेच्या डब्यांची चाके नादुरुस्त करणे, इंग्रज सेनाधिकार्यांना खोटे आदेश धाडून तुकड्या परत फिरवणे आदी अनेक प्रकारची अतोनात हानी अन् बराच गोंधळ या सैनिकांनी घडवून आणला.
८. नेताजींच्या १७ स्वातंत्र्यसैनिकांना फितुरीमुळे फाशी !
कराचीच्या उत्तरेस उतरवलेली ५ जणांंची एक संपूर्ण तुकडी फितूर ठरली. त्यांनी इंग्रजांना पेनांगच्या विद्याकेंद्राची इत्यंभूत बातमी सांगितली. त्यांच्या या फितुरीमुळे इंग्रजांनी नेताजींच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी १७ जणांना धरले अन् लाहोरच्या किल्ल्यांत गाजावाजा न करता फाशी दिले. या १७ जणांच्या मृत्यूमुळे अतिपूर्वेतील नेताजींच्या स्वातंत्र्यसेनेत सर्वत्र ‘शोकदिन’ पाळण्यात आला. त्या विरांच्या मातापित्यांचा आणि अन्य आप्तांंचा नेताजींनी योग्य सन्मान केला अन् त्यांना नेमणुका करून दिल्या. ही भीषण बातमी अतिपूर्वेत पोचल्यावर पेनांगच्या उत्पाती विद्याकेंद्रात भरती होण्यास अनेक तरुण अधिक चेवाने मागणी करू लागले.
९. कॅप्टन यामानूची यांनी स्वतःला शिक्षा म्हणून स्वतःच खंजिराने पोट चिरून आत्महत्या करणे
जपानी वीरप्रथेस अनुसरून कॅप्टन यामानूची यांनी त्यांच्या रहात्या बंगल्यात खंजिराने पोट चिरून आत्महत्या केली; कारण स्वत:च्या देखरेखीखाली सिद्ध झालेल्या तुकडीतील एकही व्यक्ती फितूर होणे, हे जपानी अधिकार्यास अत्यंत लांच्छनास्पद होते, अशी जपानी सेना शिस्तीची शिकवण असते. जपानी सेनेतच नव्हे, तर नागरिकांतूनसुद्धा युद्धकाली एकही व्यक्ती फितूर होण्याचे तर बाजूलाच; पण प्रतिकाराविना कवडीमोल मरण पत्करत नाही. काळ्या तोंडाने जिवंत रहाण्यापेक्षा स्वतःचे लष्करी दायित्व योग्य प्रकारे पार न पाडल्याची शिक्षा म्हणून कॅप्टन यामानूची यांनी आपणहून मरण पत्करले.
१०. भारतीय गुप्त सैनिकांनी फितुरीचा सूड घेण्याचे ठरवणे
या लांछनास्पद फितुरीचा सूड उगवण्याचा पेनांगच्या उत्पाती केंद्रात शिक्षण घेत असलेल्या पुढच्या तुकडीतील काही भारतीय गुप्त सैनिकांनी विडा उचलला. त्यात महादू नावाचा एक महाराष्ट्र्रीय सैनिक होता. त्याने या प्रकरणाचा सूड उगवला. एवढेच नव्हे, तर पेनांग येथे सिद्ध झालेल्या १००-१२५ गुप्त स्वातंत्र्यसैनिकांपैकी अत्यंत बिकट, ब्रिटीश युद्धतंत्राला हादरा देणारी, इंग्रजांचे अतोनात हानी घडवणारी आणि आपल्या दणक्याने डोळ्यांत भरणारी अशी सर्वांहून अधिक चांगली कामगिरी केली असेल, तर ती या महादूने !
११. कोळ्याच्या वेशात महादू मुंबईत दाखल होणे आणि त्याने संधी शोधत रहाणे
महादूला कोळ्याच्या वेशात मुंबईच्या खाली पाणबुडीने कोकण किनार्यावर सोडण्यात आले. महादू हा पूर्वीचा तिकडचाच रहाणारा; पण जपान्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्यापूर्वी तो अंदमानात चाकरीस होता. पेनांग येथील उत्पाती केंद्रात शिकण्यास नेताजींनी त्याची निवड केली. मुंबईच्या गोदीत बूट पॉलीश आणि हमाली करत महादू काही दिवस योग्य संधी हेरत राहिला. १४.४.१९४४ या दिवशी त्याला पाहिजे ती संधी मिळाली. तत्पूर्वीच काही दिवस सोने आणि दारूगोळ्यांनी भरलेल्या जहाजाचा एक समूह मुंबईत आला होता. या तांड्याच्या भावी आगमनाची आगाऊ बातमी नेताजींच्या वतीने पेनांग केंद्रात अगोदरच मिळाली होती आणि त्याच रोखानेे महादूची तुकडी झटपट सिद्ध होत होती.
१२. महादूने ‘फोर्ट स्टिकीन्’ जहाज दारूगोळ्यासह पेटवून देण्यासाठी केलेले नियोजन
विदेशातील युद्धवाहतूक खात्याच्या वतीने जी जहाजे त्या वेळी भारतात आली, त्यात ‘फोर्ट स्टिकीन्’ या नावाचे एक जहाज होते. या जहाजावर ग्लायडर्स, १२ लढाऊ विमाने, १ सहस्र ३९५ टन दारूगोळा आणि त्या वेळच्या बाजारभावानुरूप सव्वा ते दीड कोटी रुपये किमतीचे सुवर्ण होते. याखेरीज त्या ७ सहस्र १४२ टन वजनी जहाजाचे मूल्य होते, ते वेगळेच ! त्या जहाजावर ७-८ तोफा बसवलेल्या होत्या.
‘फोर्ट स्टिकीन्’ हे जहाज त्याच्यावरील दारूगोळ्यासह पेटवून दिल्याने त्याच्या भोवती उभ्या असलेल्या मुंबई बंदरातील अन्य अनेक जहाजांची नासधूस होणार होती. प्रत्यक्ष मुंबई बंदराच्या बांधकामाची नि यंत्रसामुग्रीची दुर्दशा उडून मुंबईसारख्या भल्या मोठ्या वाहतूक केंद्रास हादरा बसणार होता. सर्वांवर कडी म्हणजे मुंबईच्या आणि भारताच्या स्वातंत्र्यसमरात चिरस्मरणीय ठरणारा दणका मुंबईत उडणार होता.
नेताजींच्या युद्धतंत्रास अनुसरून महादूने एकंदर परिस्थितीचा व्यावहारिक आढावा घेतला. स्वतःचे जीवन अर्पण करून शत्रूची अतोनात हानी घडवून आणायची, हा नेताजींचा गुरुमंत्र होता. स्वामीभक्तीच्या भावनेने; पण अहिंसक वृत्तीने शत्रूसमोर मान टाकून निष्क्रीय आणि नि:सत्व मरण पत्करण्याची किंवा पळून वा शरण जाण्याची प्रथा नेताजींना नको होती. ‘फोर्ट स्टिकीन्’ जहाज मुंबईस येण्यापूर्वी ८-१० दिवस महादू अन्य साथीदारांसह एका जर्मन पाणबुडीतून कोकण किनार्यावर उतरला होता. प्रत्येकाने कोणकोणत्या ठिकाणी जाऊन इंग्रजी युद्धतंत्रास खीळ घालायची, हे ठरवून दिले होते.
या योजनेप्रमाणे महादूचे अन्य साथीदार पांगले. महादू मुंबईच्या गोदीवर आला. त्याने हमाली, बूट-पॉलीश असे पडेल ते काम करून गोदीत काम करणारे कामगार ते इंग्रज अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांची मर्जी संपादन केली.
१३. महादूने जहाजाला पेटवून देत भारतमातेच्या चरणी स्वतःची आहुती देणे
१४.४.१९४४ या दिवशी सकाळीच महादूला हवी होती, ती संधी चालून आली. व्हिक्टोरिया डॉक्समध्ये पहिल्या फलाटावरच ‘फोर्ट स्टिकीन्’ हे जहाज लागले होते. त्यात काही सामान चढवण्याच्या आणि दुसरे काही सामान उतरवण्याच्या कामावर लागलेल्या कामगारांमध्ये महादूही शिरला. त्याने हमालीच्या खेपा करता करता संधी साधली आणि पेट्यांच्या टोलेजंग राशींच्या खाचांमध्ये लपून स्वतःचे कपडे काढले. तेलाच्या एका पिंपाला एका सळईने भोक पाडून गळणार्या तेलात ते माखून टाकले आणि स्वतःकडे लपवलेल्या काडीपेटीने ते पेटवून दिले. जवळच काही कापसाचे गठ्ठेच्या गठ्ठे होते.
तेल, कापूस, दारूगोळा यांनी पेट घ्यायला आरंभ केला. सगळीकडे आग पसरवत महादू आपले कार्य पूर्णपणे तडीस जाईल, यासाठी शेवटपर्यंत जातीने पाहणी करत फिरत होता. आता त्याला कुणाचीच तमा नव्हती; कारण त्याच्यासह कुणीच त्यातून जिवंत सुटणार नव्हते. त्याला स्वत:ला जिवंत रहायचे नव्हते आणि आपल्या उत्पाती कार्याविषयीचा यत्किंचितही पुरावा शत्रूस सापडू नये, याचीही त्याने पूर्ण दक्षता बाळगली होती.
सगळीकडून आग पेटत असता महादू तोफांच्या गोळ्यांच्या पेटार्यांजवळ उभा होता. पेटार्यांनी पेट घेतला आणि फाड्, फाड्… असे आवाज झाले. स्फोट होऊन महादूच्या मस्तकाच्या पाकळ्या होऊन ते भारतमातेच्या चरणकमलावर पडल्या.
१४. महादूच्या पराक्रमामुळे इंग्रजांची झालेली कोट्यवधी रुपयांची अपरिमित हानी
महादूच्या या पराक्रमाने इंग्रजी युद्धयंत्रणेची अपरिमित हानी झाली. ‘फोर्ट स्टिकीन्’ जहाजाभोवती असलेल्या २४ जहाजांना हानी पोचली. नेताजींच्या स्वातंत्र्यहोमास महादूने अनुमाने ३४.५ सहस्र टन वजनांची जहाजे नष्ट झाली, तसेच ५५ सहस्र टन धान्य, सहस्रो टन मसाला, बियाणे, लोणी आणि तेल यांची आहुती मिळवून दिली. एकूण ६ सहस्र व्यापार्यांच्या मालाची हानी झाली. ५० सहस्र माणसे चाकरीस मुकली. ३ सहस्र व्यक्तींचे सर्वस्व हरपले. ५ लाख किलो सुवर्ण समुद्रास्तृप्यंतु झाले. एकूण ३३६ माणसे मृत्यूमुखी, तर १ सहस्र ७८९ जण घायाळ झाले. अनुमाने २६ कोटी रुपयांची हानी झाली.
महादूसारख्या इतर १००-१२५ उत्पाती सैनिकांनी आसामपासून कोचीनपर्यंत आणि कराचीपासून कोलकातापर्यंत इंग्रजांची शस्त्रागारे, दारूगोळ्यांची भांडारे, रेल्वेची प्रमुख स्थानके आणि इंग्रज सेनेच्या छावण्या यांतून गोंधळासह उत्पात घडवून आणला आणि इंग्रजांच्या नाकीनऊ आणले; पण त्या सर्वांत अत्यंत नेत्रदीपक, दणकेबाज आणि अपरिमित हानी घडवून आणणारा असा पराक्रम महादूचाच होता. नेताजींच्या स्वातंत्र्यसेनेतर्फे चालवले जाणारे पेनांगचे उत्पाती केंद्र धन्य झाले.’
(संदर्भ : मासिक ‘केसरी’ ‘दिवाळी अंक’, ऑक्टोबर १९६३)