(म्हणे) ‘कर्नाटकातील इंचभरही भूमी देणार नाही !’

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद

मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेली ६० वर्षे चालू असून तो सामोपचाराने सोडवण्याची आवश्यकता असतांना अशा प्रकारचे विधान करणे संतापजनक आहे, हे येडियुरप्पा यांनी लक्षात घ्यायला हवे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकची इंचभरही भूमी देणार नाही, असे प्रत्युत्तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर दिले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे, हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटीबद्ध आहोत.’

१. कर्नाटकातील बेळगाव, कारवार निपाणीसह शेकडो गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करत असलेली ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ प्रतिवर्षी १७ जानेवारीला ‘हुतात्मा दिन’ पाळत असते. या दिवशी सीमाप्रश्‍नातील हुतात्म्यांना अभिवादन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले होते. कर्नाटकात काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

( सौजन्य : हिंदुस्तान टाइम्स )

२. उद्धव ठाकरे यांना उत्तर देतांना येडियुरप्पा पुढे म्हणाले की, ठाकरे यांचे वक्तव्य सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवू शकते. खरे भारतीय म्हणून उद्धव ठाकरे देशाच्या संघराज्यीय आदर करतील, अशी मला आशा वाटते.