कोल्हापूर – रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. ३१ जानेवारी पूर्वी प्रत्येक लाभार्थी शिधापत्रिकेवरील सर्व व्यक्तींचे १०० टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध भ्रमणभाष क्रमांक सिड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळवले आहे.
नियमित धान्य मिळणार्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक सिडींग करण्यात आले नाही, त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे आणि सिडींग पूर्ण करावे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील, तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांना संपर्क साधावा. ३१ जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या व्यक्तींचे अनुज्ञेय धान्य फेब्रुवारी मासापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.