देशातील अनेक राज्यांत ‘बर्ड फ्लू’च्या आजाराचे संकट घोंगावत असतांनाच घडलेली ही घटना चिंताजनक आहे !
परभणी – येथील तालुक्यातील मुरुंबा शिवारात गेल्या २ दिवसांत एका कुक्कुटपालन केंद्रात ८०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. मुरुंबा गावशिवारापासून ५ किमी अंतरात कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ८ जानेवारी या दिवशी बंदी घातली. जिल्हा आणि तालुका पशूसंवर्धन विभागाने याची नोंद घेतली असून सर्वेक्षणाचे काम चालू केले. जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने तेथे पहाणी केली असून मृत कोंबड्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती परभणीचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी अशोक लोणे यांनी दिली.