बांगलादेशची युद्धगाथा : वर्ष १९७१ मध्ये भारताने जिंकलेल्या युद्धाची गोष्ट !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यानंतर पाकिस्तान कधीही आपली बरोबरी करू शकला नाही. ही लढाई पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) आणि पश्‍चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) या दोन भागांमध्ये झाली होती. हे युद्ध ४ डिसेंबर १९७१ या दिवशी चालू झाले आणि १६ डिसेंबर १९७१ या दिवशी संपले. ३ आठवड्यांच्या आत आपण पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. या युद्धात कोणकोणते पराक्रम झाले, तसेच त्या वेळची परिस्थिती काय होती, यांविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. वर्ष १९७१ च्या लढाईमागील उद्देश

पाकिस्तानमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या. तेथे शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीग पक्षाला बहुमत मिळाले होते. बहुमत मान्य झाले असते, तर अवामी लीग, म्हणजे बांगलादेशींनी पाकिस्तानवर राज्य केले असते. हे पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नव्हते, तसेच त्या वेळी पाकिस्तानचे प्रमुख अन् पीपल्स पार्टीचे प्रमुख झुल्फिकार अली भुत्तो यांनाही ते नको होते. त्यामुळे त्यांनी रहमान यांना कारागृहात डांबले, म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला त्यांनी राज्य करू दिले नाही. त्यानंतर आपल्यावर कधीही बांगलादेशींची सत्ता येऊ नये, यासाठी पाकिस्तानने बांगलादेशींवर अत्याचार चालू केले. त्यात ३० लाख बांगलादेशी हे हिंदू होते आणि १० लाख हे अवामी लीग पक्षाचे अनुयायी होते.

पाकिस्तानने जनरल टिक्का खान यांना तेथे नियुक्त केले. सैनिकांना सांगण्यात आले की, तेथील लोक आणि महिला यांच्यावर अत्याचार करा. ते इतके घाबरले पाहिजेत की, त्यांनी पाकिस्तानवर राज्य करण्याचे स्वप्नही बघायला नको. त्यामुळे बांगलादेशी जनतेवर पुष्कळ अत्याचार करण्यात आले आणि अनुमाने ८० लाख बांगलादेशी नागरिकांनी निर्वासित म्हणून भारतात प्रवेश केला. त्याचा ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला, तसेच देशाच्या सुरक्षेलाही धक्का बसला. त्यांची ही घुसखोरी कधी थांबेल, हे सांगायला कुणीही सिद्ध नव्हते. त्यामुळे तत्कालीन भारतीय नेतृत्वाने पाकिस्तानशी युद्ध करून पाकिस्तानचा काही भाग जिंकण्याचा निर्णय घेतला, म्हणजे बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांना तेथे बसवता येईल आणि देशाच्या सुरक्षेला पोचलेला धोका न्यून करता येईल.

२. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व असल्यामुळे भारताला वर्ष १९७१ चे युद्ध जिंकता येणे

सॅम माणेकशॉ

हे युद्ध लवकरच चालू करावे, अशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची इच्छा होती; परंतु भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी पंतप्रधान गांधी यांना सांगितले, ‘‘मार्च किवा एप्रिलच्या मासात युद्ध करणे आपल्याला शक्य होणार नाही. सैन्याची सिद्धता झालेली नाही. रणगाडे नाहीत, दारूगोळा अल्प आहे, शस्त्रे अल्प आहेत आणि सैन्य पश्‍चिम बंगालमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईत गुंतलेले आहे. आपल्याला निर्णायक लढाई जिंकायची असेल, तर ५ ते ६ मास सिद्धता करणे आवश्यक आहे. आपल्याला डिसेंबरमध्ये युद्ध करणे सोयीचे होईल; कारण त्या वेळी आपला दुसरा शत्रू चीन हा पाकिस्तानला साहाय्य करू शकणार नाही. चिनी सैन्य ज्या खिंडींमधून भारताच्या अरुणाचल प्रदेश, सिक्कीम किंवा लडाख या प्रदेशांमध्ये येऊ शकते, त्या खिंडी बर्फामुळे बंद होतील आणि आपण पाकिस्तानशी एका आघाडीवर लढाई करू शकू.’’ इंदिरा गांधी यांना हे आवडले नाही. त्या म्हणाल्या, ‘‘नाही ! तुम्ही हे युद्ध लगेचच चालू करायला पाहिजे. देश एवढा वेळ वाट पाहू शकत नाही.’’ युद्ध लवकर व्हावे, यासाठी फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्यावर माध्यमांचाही मोठा दबाव होता. त्यात काही उंटावरून शेळी हाकणारे तज्ञ सैनिक अधिकारीही होते. ते ‘तुम्ही लढाईला घाबरता आहात का ? युद्ध लगेच करा’, अशा प्रकारच्या सूचना करत होते. त्या वेळी माणेकशॉ यांनी सर्व दबावाला तोंड दिले. त्यांनी इंदिराजींना सांगितले की, तुम्हाला लगेचच युद्ध हवे असेल, तर मला बडतर्फ करावे लागेल आणि माझ्याऐवजी दुसरा लष्करप्रमुख शोधावा लागेल. जो आता लढाईला येऊ शकतो. सर्व नोकरशाही, तथाकथित तज्ञ आदी माणेकशॉ यांच्या विरोधात बोलत होते. इंदिराजींना कळले की, माणेकशॉ यांच्या बोलण्यात तथ्य आहे. त्यांनी माणेकशॉ यांना पाठिंबा दिला. त्यामुळे दुसरा लष्करप्रमुख आणण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत सैन्याने युद्धाची सिद्धता विविध पूर्ततेसह केली.

भारतीय सैन्य दोन सीमांवर तैनात आहे. सध्याच्या पाकिस्तान सीमेवर ते तैनात असते. बांगलादेश सीमेवर कोणतेही सैन्य तैनात नसते. त्या सीमेकडे लक्ष देण्याचे दायित्व सीमा सुरक्षा दलाकडे देण्यात आले आहे. अरुणाचलच्या सीमेवरील सैन्याचे लक्ष अर्थात्च चिनी सीमेकडे असते. त्यामुळे सैन्याचे लक्ष वळवून ते बांगलादेशकडे आणण्याचा प्रयत्न करावा लागला. तेव्हा युद्धाच्या पूर्वसिद्धतेसाठी प्रचंड प्रमाणात सैन्याची हालचाल करावी लागली. त्याचे फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले. त्यांच्यावर श्रीमती गांधी यांचा पुष्कळ विश्‍वास होता. त्यामुळे त्यांनी नोकरशाहीला न जुमानता लढण्याची सिद्धता केली. अन्यथा अनेक प्रश्‍न होते की, तुम्हाला इतका दारूगोळा, रणगाडे, शस्त्रे कशाला हवी आहेत ? हे देशाला परवडेल का ? इत्यादी. तेव्हा फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी सांगितले की, मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. जे सांगायचे आहे, ते मी पंतप्रधानांना सांगितले आहे. मला लढाईसाठी जे साहित्य हवे आहे, ते तुम्ही मला द्या. त्या वेळी केवळ माणेकशॉ यांच्यासारखे एक अत्युच्च व्यक्तीमत्त्व असल्यामुळे युद्धासाठी सगळ्या प्रकारची सिद्धता झाली.

(क्रमशः वाचा सोमवारच्या अंकात)

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करूया – https://sanatanprabhat.org/marathi/437808.html