साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

साधना समजल्यावर त्वरित मायेचा त्याग करणारे आणि मुलांनाही मायेत गुंतू न देता त्यांच्यावर पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. धनंजय राजहंस (वय ७० वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. ३० डिसेंबर या दिवशी या लेखात आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित गुणवैशिष्ट्ये पाहूया.

या लेखाचा पुर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/436156.html


श्री. धनंजय राजहंस

११. ‘साधनेसाठी सर्वस्वाचा त्याग करायचा असतो’, हे कृतीतून शिकवणारे आमचे बाबा !

११ अ. घर आणि व्यवसाय येथील भंगार वस्तू भंगारात घातल्यावर आलेले पैसे अर्पणपेटीत घालायला सांगणे : ‘मी शाळेत शिकत असतांनाच साधनेत आलो. घरातील निरुपयोगी वस्तूंची आणि पूर्वीच्या व्यवसायातील भंगारातील वस्तू भंगारात काढण्याची सेवा मी बाबांच्या समवेत करायचो. भंगारातून जे काही पैसे यायचे, ते बाबा मला अर्पणपेटीत घालायला सांगायचे. ‘भंगारातून मिळालेले पैसे आपण ठेवून घ्यावेत’, असा स्वार्थी विचार माझ्या मनात असायचा; पण बाबा मला हसत सांगायचे, ‘‘मिळवलेल्या पैशांचा त्याग करण्याची सवय लागली, तर पुढे सर्वस्वाचा त्याग होईल.’’

११ आ. स्वतःच्या व्यवसायातील एका महत्त्वाच्या क्षणी पूर्णवेळ साधना करण्यासाठी व्यवसाय बंद करणे : बाबांनी साधनेत आल्यानंतर लगेचच २ – ३ मासांतच एवढ्या कष्टाने वाढवलेला व्यवसाय बंद करण्याचा आणि पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला ! त्या वेळी बाबांचे सव्वा कोटी रुपयांचे ‘टेंडर’ ‘पास’ झाले होते आणि बाबांच्या व्यवसायाच्या क्षेत्रातील तो सर्वांत महत्त्वाकांक्षेचा क्षण होता ! असे असूनही त्यांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.

११ इ. मुलांनाही पूर्णवेळ साधना आणि सेवा करण्यासाठी पाठवणे : आम्ही लहान असतांनाच बाबांनी ताईला पूर्णवेळ साधना अन् सेवा करण्यासाठी आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा विचार आमच्या मनाला कधीच शिवला नाही. आमचे शिक्षण पूर्ण होत गेले, तसे माझी दुसरी बहीण आणि नंतर मी पूर्णवेळ साधना करू लागलो.

‘साधनेसाठी त्याग करावा लागतो’, हे बाबांनी स्वतःच्या कृतीतून शिकवल्यानंतर आम्हाला त्यागाची पायरी चढणे कठीण गेले नाही.’

– श्री. चेतन राजहंस

१२. ‘साधनेत नेहमी लहानच रहायचे’, अशी शिकवण देणे

‘नागपूर येथील जिल्ह्याअंतर्गत बर्‍याच सेवा असल्याने बाबा मला पुष्कळ सेवा द्यायचे. मी लहान होते आणि मला श्रम करायची सवयही नव्हती. ‘८ – ९ कि.मी. लांब सायकलने सेवेला जाणे, दिवसभर वितरण कक्षावर सेवा करणे, उन्हातान्हात प्रसार करणे’ इत्यादी सेवा करतांना ते मला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. त्या वेळी मला वाटायचे, ‘इतर साधकांच्या तुलनेत बाबा मला अधिक सेवा देतात.’ माझ्या मनात ‘त्यांनी मला एखाद्या सेवेचे दायित्व द्यावे’, म्हणजे मला पुढल्या टप्प्यात जाता येईल आणि मला मोठेपणा मिळेल’, असा अहंचा विचारही होता. त्या वेळी बाबांनी मला ‘आपण साधनेत नेहमी लहानच रहायचे असते’, असे शिकवले. त्यानंतर जेव्हा माझ्या मनात ‘मला मोठेपणा मिळावा’, हा विचार यायचा, त्या वेळी बाबांनी दिलेला हा दृष्टीकोन आठवून स्थिर रहाता येते.

१३. नृत्याचे शिक्षण न दिल्याविषयी मुलीची क्षमा मागणे

मला लहानपणापासून नृत्याची आवड होती. आमच्या अनेक नातेवाइकांनी बाबांना मला नृत्य शिकवण्याविषयी सुचवले होते; पण ‘चारचौघात मुलींनी नृत्य करणे’, हे बाबांना योग्य वाटत नसल्याने त्यांनी मला नृत्य शिकवले नाही.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्यात काही साधिकांनी नृत्यसेवा सादर केली होती. त्यानंतर बाबा मला म्हणाले, ‘‘मी लहानपणी तुला नृत्य शिकायला पाठवले असते, तर आज तुला गुरुदेवांसमोर नृत्यसेवा सादर करता आली असती. ‘मी तुला नृत्य शिकवले नाही’, यासाठी मला क्षमा कर.’

– सौ. नंदिनी चितळे

१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली श्रद्धा

१४ अ. संपूर्ण कुटुंबालाच सेवेसाठी दूरच्या ठिकाणी पाठवणे : ‘मी एका ‘कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’ मध्ये २ वर्षांचा ‘सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग’चा ‘डिप्लोमा’ करत होते. त्या वेळी बाबांनी त्याचे ५० सहस्र रुपये शुल्क भरले होते. माझे दीड वर्ष पूर्ण झाले होते. त्यासमवेत मी ‘बी.कॉम.’च्या दुसर्‍या वर्षात शिकतही होते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेसाठी साधक हवे आहेत’, ही चौकट वाचून मी बाबांना विचारले, ‘‘या सेवेसाठी मी गोव्याला जाऊ का ?’’ तेव्हा बाबांनी क्षणाचाही विचार न करता मला पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती दिली ! त्या वेळी सनातन संस्थेत माझ्या वयाचे केवळ १ – २ साधकच पूर्णवेळ साधना करत होते. आई-बाबांनी मला नागपूरपासून सहस्रो कि.मी. दूर गोव्याला साधकांच्या समवेत पाठवले.

माझ्यानंतर बाबांनी लहान वयातच माझी बहीण सौ. नंदिनी चितळे आणि भाऊ चेतन यांनाही उत्तर भारतात प्रसारासाठी पाठवले अन् आईलाही उज्जैन येथे अध्यात्मप्रसारासाठी पाठवले.

– सौ. अवनी आळशी

१५. परात्पर गुरु डॉक्टरांविषयीचा भाव

‘परम पूज्यांनी आपल्या जीवनात येऊन आपल्यावर किती कृपा केली आहे ? नाहीतर आपण काय असतो ? त्यांनी आपल्याला इतकी वर्षे त्यांच्या चरणी ठेवून घेऊन आपले जीवन कृतार्थ केले,’ या कृतज्ञतेच्या भावाने बर्‍याचदा त्यांची भावजागृती होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अन्य साधकांवर केलेल्या कृपेविषयीची सूत्रे किंवा ते प्रसंग ऐकल्यावरही त्यांची भावजागृती होते.

१६. साधनेत आल्यावर झालेला पालट

१६ अ. सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याचा प्रयत्न करणे : ‘श्री. राजहंस यांचा स्वभाव पूर्वीपासून पुष्कळ अबोल आहे. नातेवाइकांकडील कार्यक्रमाला गेल्यावरही ते तिथे कुणाशीच काही बोलायचे नाहीत. साधनेत आल्यावर त्यांनी नागपूर येथील कार्याचे दायित्व घेतले. तेव्हा ते साधकांशी बोलायला लागले होते. त्यांनी विविध साधकांना वैयक्तिक संपर्काद्वारे आणि घरोब्याचे संबंध निर्माण करून जोडून ठेवले होते.

देवद येथे गेल्यावर बाबांचे बोलणे परत न्यून झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी बाबांना सर्वांशी बोलण्यासाठी आणि मिळून-मिसळून रहाण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले होते. बाबा त्यासाठी प्रयत्न करत होते; पण त्यांना त्यात यश येत नव्हते. गेल्या २ वर्षांपासून ते रामनाथी आश्रमात सेवेला आहेत. या २ वर्षांत त्यांचे साधकांशी बोलणे वाढले आहे.

– सौ. वैशाली राजहंस, सौ. अवनी आळशी, सौ. नंदिनी चितळे आणि श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२९.११.२०२०)

१७. तळमळीने सेवा करणारे श्री. धनंजय राजहंस !

१७ अ. इतरांना विचारून करणे : ‘श्री. राजहंसकाका वयाने आणि अनुभवाने पुष्कळ मोठे आहेत, तरी एखादी मोठी खरेदी करतांना ते आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनाही त्यांचे मत विचारून आणि त्यांच्याशी विचारविनिमय करून मगच खरेदी करतात.

१७ आ. अभ्यासू वृत्ती : नवीन घर खरेदीची प्रक्रिया चालू असतांना त्यांच्यामधील अभ्यासूपणा माझ्या लक्षात आला. कुठलीही नवीन वस्तू खरेदी करण्याआधी ते त्या संदर्भातील सविस्तर अभ्यास करतात. ते केवळ एखाद्या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीवर अवलंबून न रहाता विविध ठिकाणांहून त्याविषयी माहिती मिळवतात. तुलनात्मक अभ्यास करून मगच ते योग्य वस्तू खरेदी करतात.

१७ इ. सेवेची तळमळ : पूर्वी ते देवद आश्रमात सेवा करत होते. तेव्हा ते स्वतःचे वय आणि शारीरिक स्थिती यांचा कुठलाही अडथळा होऊ न देता अत्यंत तळमळीने पहाटे लवकर उठून सेवेला जायचे. ते आश्रमातील देवपूजेच्या ठिकाणी आणि ते सेवा करत असलेल्या ठिकाणी जाऊन मनापासून अन् एकाग्रतेने सेवा करायचे. पहाटे लवकर उठून सेवा करण्याचा त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असा आहे.’

– श्री. नीलेश चितळे (धाकटे जावई) (२९.११.२०२०)

१८. इतरांचा विचार करणारे श्री. राजहंसकाका

१८ अ. मनमोकळेपणाने बोलणे : माझ्या विवाहानंतर मी घरी रहायला गेले, तेव्हा श्री. राजहंसकाका मनमोकळेपणाने बोलत नव्हते. मध्यंतरी त्यांच्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन सत्संग होता. त्या दिवशी ते माझ्याशी मनमोकळेपणाने बोलले. त्यानंतर ते त्यांना येणार्‍या अडचणी वेळोवेळी विचारून उपाययोजना काढतात आणि त्यानुसार प्रयत्न करतात. त्यांच्यातील मनमोकळेपणा आता वाढला आहे.

१८ आ. इतरांचा विचार करणे : आम्ही रहात असलेल्या इमारतीमध्ये काही साधक रहातात. त्या साधकांचा वीजदेयके आणि अन्य देयके भरण्यासाठी वेळ जायला नको अन् त्या साधकांना सेवेला वेळ देता यावा; म्हणून श्री. राजहंसकाका स्वतःच्या देयकांसमवेत अन्य साधकांची देयकेही जाऊन भरतात. ‘सर्व साधक म्हणजे आपले कुटुंबच आहे’, असा त्यांचा भाव असतो.

– सौ. प्रियांका राजहंस (सून)

(समाप्त)


पू. संदीप आळशी यांनी श्री. राजहंस यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पू. संदीप आळशी

१. धनाचा त्याग

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर श्री. राजहंसकाकांनी काही वर्षे नागपूर येथील अध्यात्मप्रसाराचे दायित्व स्वीकारले. त्या कालावधीत प्रसारकार्यासाठी जो काही व्यय येत असे, तो त्यांनी संस्थेकडून न घेता स्वतःच केला होता ! त्याचप्रमाणे बर्‍याचदा त्यांच्या घरी कुणी ना कुणी तरी साधक रहाण्यासाठी असत. त्यांच्या निवास-भोजनावरील सर्व व्ययही ते स्वतःच करत असत. त्या काळात सनातन संस्थेचे नाव मोठे नव्हते, परात्पर गुरुदेवांचेे कार्यही फार मोठे नव्हते. असे असतांनाही त्यांनी स्वतःची साधना म्हणून धनाचा मोठा त्याग केला.

२. सेवेची तीव्र तळमळ

काही वर्षांपूर्वी ते देवद आश्रमात होते. आश्रमापासून दूर एका जागेत एक केंद्र नुकतेच चालू झाले होते. तेथे ते ग्रंथांच्या वितरणाची सेवा करायचे. त्या काळात तेथे पंखा नव्हता. उन्हाळ्याचे दिवस होते. अंगाची लाहीलाही व्हायची. सोबतीला विशेष साधकही नव्हते. अशा स्थितीतही ते १०-१२ घंटे सेवा करायचे. आपण १ मिनिटही पंख्याविना राहू शकत नाही. ‘अशा स्थितीत त्यांनी कशी सेवा केली असेल’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही !

३. जावयाकडे ‘संत’ म्हणूनच पहाणे

एवढी वर्षे जावयाकडे ‘जावई’ म्हणून पाहिल्यावर संत म्हणून घोषित झाल्यावर त्याच्याकडे एकदम ‘संत’ म्हणून पहाणे कठीण असते; परंतु काकांचे तसे नाही. ते माझ्याकडे नेहमीच ‘संत’ या भावाने पहातात.

४. सांगितल्यानुसार करणे

त्यांना प्रतिदिन भ्रमणभाषवर बातम्या पहाण्याची सवय होती. एकदा मी त्यांना सांगितले, ‘यात वेळ फुकट जातो. ‘सनातन प्रभात’मधून आपल्याला सर्व कळतेच. तसेच भ्रमणभाषवरील बातम्यांतील रज-तमाचा आपल्यावर दुष्परिणामही होतो.’ हे सांगितल्यानंतर त्यांनी बातम्या पहाणे बंद केले.

५. नामजपादी उपायांचे पुष्कळ गांभीर्य असणे

श्री. राजहंसकाकांमध्ये नामजपादी उपायांचे पुष्कळ गांभीर्य आहे. ते उपायांसाठी नामजपाच्या पट्ट्या लावणे, स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, कपाळावर टिळा लावणे आदी नामजपादी उपाय नियमित अन् चिकाटीने करतात. एकही दिवस असा जात नाही की, त्यांनी उपाय थोडे तरी अल्प केले असावेत. त्रास असणार्‍या साधकांना त्यांचा हा गुण विशेषकरून शिकण्यासारखा आहे.

६. कुटुंबियांकडून कसलीच अपेक्षा नसणे

काकू प्रकृती-अस्वास्थ्यामुळे आश्रमात रहातात. मुलगा चेतन बहुतांश वेळा प्रसाराच्या निमित्ताने बाहेरगावी असतो. सून सौ. प्रियांका सेवेच्या दृष्टीने आश्रमातच रहाते. ते घरी असतांना केर काढणे, कपडे धुणे इत्यादी कामे स्वतःच करतात. काकांनी कुटुंबियांकडून कसलीच अपेक्षा ठेवलेली नाही.

श्री. धनंजय राजहंस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सौ. वैशाली राजहंस यांनी केलेले शुभेच्छापर काव्य

सौ. वैशाली राजहंस

या कवितेत धनंजय राजहंस या नावाच्या आद्याक्षरावरून कविता केली आहे.

ध – धरीला गुरुदेवांनी एकदा हात
नं – नंतरही कधीच सोडणार नाही हात
ज – ज्याने केली कृपा एकवार
य – यात नाही शंका घेणार
रा – राहील अशीच कृपा तुम्हावरी सतत
ज – जराही नाही कमी होणार
हं – हसणे मोकळे आता आले बाहेर
स – स्व विसरूनी आता गुरुचरणी जाल

आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि नमस्कार !

श्री. राजहंसकाका यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचा विचार दोन-तीन वेळा मनात येणे

‘आज सकाळी दैनिक चाळत असतांना श्री. धनंजय राजहंसकाका यांचा वाढदिवस असल्याचे वाचनात आले. ती बातमी वाचत असतांना माझ्या मनात पुसटसा विचार येऊन गेला की, काकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असावी. दुपारी एका साधिकेने मला सांगितले, ‘‘आज मला एका भावसत्संगाला बसायचे आहे.’’ त्या वेळी मी तिला म्हटले, ‘‘एखाद्या साधकाने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असावी.’’ तेव्हाही माझ्या मनात राजहंसकाका यांचा विचार होता; परंतु मी ‘साधिकेला वर्तमानकाळातील आनंद घेता यावा’, यासाठी नाव सांगितले नाही. त्यानंतरही एकदा माझ्या मनात ‘आज राजहंसकाकांची पातळी घोषित करतील’, असा विचार येऊन गेला. दुपारी फलकावर त्यांची आनंदवार्ता वाचून ‘हे सर्व विचार म्हणजे देवाने दिलेल्या पूर्वसूचना होत्या’, हे लक्षात आले.’

–  अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक