साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

साधना समजल्यावर त्वरित मायेचा त्याग करणारे आणि मुलांनाही मायेत गुंतू न देता त्यांच्यावर पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. धनंजय राजहंस (वय ७० वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

डावीकडून बसलेले सौ. वैशाली राजहंस (पत्नी), श्री. धनंजय राजहंस, पू. संदीप आळशी (मोठे जावई), सौ. अवनी आळशी (मोठी मुलगी), मागच्या रांगेत डावीकडून सौ. नंदिनी चितळे (लहान मुलगी), श्री. नीलेश चितळे (लहान जावई), श्री. चेतन राजहंस (मुलगा), सौ. प्रियांका राजहंस (सून)

१. कष्टमय बालपण

‘श्री. राजहंस यांचे बालपण पुष्कळ कष्टात गेले. ते ४ वर्षांचे असतांना त्यांच्या आईचे निधन झाले. त्या वेळी त्यांचा मोठा भाऊ ६ वर्षांचा, तर छोटी बहीण केवळ १३ दिवसांची होती. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी रामकृष्ण मठाची साधना करत संन्यस्त जीवन जगायला आरंभ केला. त्यामुळे लहानपणापासूनच ते त्यांच्या आजीच्या समवेत स्वयंपाक आणि घरची कामे करायचे. घरची कामे आणि अभ्यास दोन्ही करून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

२. नीटनेटकेपणा

त्यांच्यामध्ये स्वच्छता आणि टापटीपपणा पुष्कळ आहे. ते घराची स्वच्छता पुष्कळ नीटनेटकी करतात. लहानपणी आम्ही मुलांनी (अवनी, नंदिनी आणि चेतन यांनी) घराची स्वच्छता केल्यावर ते आम्हाला त्यातील त्रुटी दाखवून स्वच्छता करून दाखवायचे. त्यामुळे आमच्यावर स्वच्छतेचा संस्कार झाला. ते त्यांच्या वस्तू नेहमी जागच्या जागी ठेवतात. त्यांची सेवा करण्याची पद्धतही पुष्कळ नीटनेटकी आहे.

श्री. धनंजय राजहंस

३. विविध कौशल्ये

पूर्वीपासूनच त्यांच्यात विविध कौशल्ये आहेत. ते घरीच ‘इलेक्ट्रिक फिटिंग’, गवंडीकाम, घराचे रंगकाम, बागकाम, ‘प्लंबिंग’ किंवा कुठलीही बिघडलेली वस्तू उघडून ती दुरुस्त करणे’, अशी अनेक कामे करायचे. त्यामुळे या कामांसाठी आम्हाला कधी बाहेरून कामगार बोलवावा लागायचा नाही. ते छंद म्हणून चित्रेही काढायचे आणि भजनेही म्हणायचे. ते स्वयंपाकही उत्तम करू शकतात.

४. कष्टाळू स्वभाव

ते ‘पी.डब्लू.डी.’मध्ये ‘सेक्शनल इंजिनीयर’ होते. नोकरी करतांना त्यांनी ‘इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशीप’चा व्यवसाय चालू केला. त्यांनी नोकरी आणि व्यवसाय यांसाठी पुष्कळ कष्ट घेतले. ते नोकरीहून थेट ‘साईट’वर जायचे आणि रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत काम करून घरी यायचे. आरंभी त्यांच्याकडे कुशल कामगार नव्हते. त्या वेळी त्यांना बरेच शारीरिक श्रमही करावे लागले. काही वर्षांनंतर त्यांनी नोकरीचे त्यागपत्र देऊन स्वतःचा व्यवसाय चांगला नावारूपाला आणला.

आता त्यांचे वय ७० वर्षे असूनही ते घरची कामे, इमारतीची स्वच्छता किंवा आश्रमात त्यांना दिलेली सेवा स्वतःचा विचार न करता सेवाभावाने करतात.’

– सौ. वैशाली राजहंस (पत्नी), सौ. अवनी आळशी (मोठी मुलगी), सौ. नंदिनी चितळे (मधली मुलगी) आणि श्री. चेतन राजहंस (धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. मुलांवर धार्मिक संस्कार करणे

‘आमचे आई-बाबा दोघेही धार्मिक असल्याने त्यांनी आमच्यावर साधनेचे संस्कार केले.

अ. ‘बाबा अंघोळीला गेल्यापासून त्यांचे स्वतःचे पूर्ण आवरेपर्यंत विविध स्तोत्रे मोठ्याने म्हणायचे. त्यामुळे लहानपणापासूनच आमची ती स्तोत्रे तोंडपाठ झाली होती.

आ. ते प्रतिदिन सायंकाळी आम्हाला ‘शुभं करोती’ आणि इतर स्तोत्रे म्हणायला लावायचे.

इ.वर सण-उत्सव असल्यावर ते आम्हाला पूजेची सिद्धता करायला सांगायचे आणि पूजेच्या वेळी आम्हाला तिथे बसायला सांगायचे.

ई. ते आम्हाला रामकृष्ण मठात घेऊन जायचे आणि तिथे नामजप करायला लावायचे.

उ. नागपूरमध्ये येणारे साध्वी प्रीतीसुधाजी, मुरारीबापू, रमेशभाई ओझा यांसारख्या विविध कथावाचकांच्या आध्यात्मिक प्रवचनांना आई आणि बाबा प्रतिदिन जायचे अन् आम्हाला सुटीच्या दिवशी या प्रवचनांना नेऊन ते आमच्यावर भक्तीचा संस्कार करायचे.’

– सौ. अवनी आळशी, सौ. नंदिनी चितळे आणि श्री. चेतन राजहंस

६. प्रेमळ

६ अ. शाळा दूर असल्यामुळे ‘एवढ्या दूरपर्यंत सायकलवरून जायला लागू नये’, यासाठी दुचाकी घेऊन देणे : ‘लहानपणापासून बाबांनी आमच्यावर योग्य संस्कार करण्याच्या समवेतच आमचे पुष्कळ लाडही केले. त्यामुळे आम्ही समाधानी होतो. माझी शाळा घरापासून दूर होती आणि तिकडे रिक्शा मिळत नसे. तेव्हा मला ‘सायकलने शाळेत जायला लागू नये’, यासाठी बाबांनी मी दहावीत असतांना ‘लायसन्स’ न लागणारी एक दुचाकी गाडी मला घेऊन दिली. माझ्याप्रमाणेच त्यांनी सौ. नंदिनी आणि चेतन यांनाही १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लगेच गाड्या घेऊन दिल्या.

६ आ. महाविद्यालयात त्रास देणार्‍या मुलाला अतिशय योग्य शब्दांत समज देणे आणि त्यामुळे त्याच्या वर्तनामध्ये पालट होणे : मी अकरावीत असतांना माझ्या महाविद्यालयातील एक मुलगा मला त्रास द्यायचा. एकदा मी बाबांना त्या मुलाविषयी सांगितले. बाबांनी त्या मुलाला घरी बोलावले. तो मुलगा घरी आल्यावर बाबांनी प्रेमाने त्याची विचारपूस केली आणि त्याला सांगितले, ‘‘हे तुमचे अभ्यासाचे वय आहे. त्यामुळे आता अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला भेटायला ये. मग आपण बघू.’’ त्या वेळी ‘बाबांनी त्या मुलाची चांगली कानउघाडणी करावी’, असे मला वाटत होते; पण बाबांनी असे काही न केल्याने मला वाटले, ‘तो मुलगा परत तसाच वागेल.’ प्रत्यक्षात दुसर्‍या दिवशीपासून त्या मुलाच्या वर्तनात पुष्कळ पालट झाला होता.’

– सौ. अवनी आळशी

६ इ. ‘आमची काही चूक झाल्यास किंवा आम्ही हट्ट करत असल्यास बाबा आम्हाला प्रेमाने समजावून सांगायचे. त्यांनी कधीच आम्हाला मारले नाही. आमच्याकडून कधी चूक झाल्यावर ते शिक्षा म्हणून आमचा कान धरायचे.

६ ई. व्यवसाय करतांना त्यांच्याकडे कामाला असलेल्या कामगारांवरही ते स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करायचे.

६ उ. नातेवाइकांनी आमच्याशी फारसे संबंध ठेवले नाहीत. ते आम्हाला त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेत नाहीत, तरीही बाबा आम्हाला सांगतात, ‘‘ते त्यांच्या जागी योग्य आहेत. आपण त्यांच्याशी चांगलेच वागायचे.’’

६ ऊ. नागपूर येथील साधकांवरही त्यांचे पुष्कळ प्रेम आहे.

६ ए. आम्ही लहान असल्यापासून बाबा आमच्याशी मित्रासारखे वागायचे. त्यामुळे आम्ही बाबांना कुठलीही गोष्ट सहजपणे सांगू शकायचो. आताही आम्ही आमच्या आणि त्यांच्याही चुका त्यांना सहजपणे सांगू शकतो.’

– सौ. अवनी आळशी, सौ. नंदिनी चितळे आणि श्री. चेतन राजहंस

७. भोळा स्वभाव आणि इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती

‘पूर्वीपासूनच त्यांचा स्वभाव भोळा आहे. आमच्या एक नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती; म्हणून श्री. राजहंस त्यांना साहाय्य करायचे. त्यांनी अनेकदा राजहंस यांना फसवले होते. हे राजहंस यांच्या लक्षात येऊनही ते त्या नातेवाइकांच्या परिस्थितीचा विचार करून त्यांना साहाय्य करायचे. एरव्हीही कधी कुणाला काही साहाय्य हवे असल्यास ते लगेच साहाय्य करतात.

८. सेवाभाव

अ. लहानपणापासूनच ते श्री रामकृष्ण मठात जाऊन तेथील स्वामीजी सांगतील, त्या सेवा करायचे. तेथील वाचनालयात ते ग्रंथपालाची सेवा करायचे. त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सेवा म्हणून पूर्ण मठाचे नव्याने ‘इलेक्ट्रिक फिटिंग’ करून दिले होते.

आ. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर बाबांना जी सेवा दिली जाईल, ती सेवा ते अगदी तळमळीने, मन लावून आणि परिपूर्ण करतात.

९. देवाची ओढ आणि भक्ती

ते सोलापूर येथील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. तेव्हा प्रत्येक आठवड्याला ते कुलदेवी श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जायचे. त्यांची श्री भवानीदेवीवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर साधनेत येईपर्यंत ते प्रत्येक वर्षी तुळजापूरला देवीच्या दर्शनाला जात होते. नोकरी लागल्यावर प्रत्येक मासाचे वेतन मिळाल्यावर ते कुलदेवी भवानीदेवी आणि कुलदेव तिरुपति बालाजी यांना अभिषेकासाठी पैसे पाठवायचे.’

– सौ. वैशाली राजहंस, सौ. अवनी आळशी, सौ. नंदिनी चितळे आणि श्री. चेतन राजहंस

१०. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ !

१० अ. साधना समजल्यावर त्वरित कृतीला आरंभ करणे : ‘नागपूर येथे सनातनचे कार्य चालू झाल्यावर आरंभीपासूनच आमचे घर सनातनच्या कार्याशी जोडले गेले.

१. आई-बाबांनी साधकांशी झालेल्या पहिल्या भेटीतच त्यांनी सांगिल्याप्रमाणे लगेचच देवघरातील देवतांची संख्या न्यून केली.

२. घरात जागोजागी लावलेली देवतांची चित्रे काढून त्यांचे विसर्जन केले.

३. कुलदेवतेचा नामजप करायला आरंभ केला.

४. ते अनेक वर्षांपासून करत असलेली व्रतवैकल्ये आणि उपवास बंद करून गुरुकृपायोगानुसार साधना करायला आरंभ केला.

आई-बाबा दोघेही पहिल्यापासूनच कुलदेवतेची भक्ती करत असल्याने देवाने आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवलेंसारखे महान गुरु दिले.

१० आ. साधकांची घरातच रहाण्याची आणि जेवण्याची सोय करणे : नागपूर येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून साधक अध्यात्मप्रसारासाठी यायचे. ते येथे भाड्याने घर घेऊन रहायचे. आमचे घर मोठे असल्याने आई-बाबांनी साधकांची रहायची आणि जेवणाचीही सोय आमच्या घरीच केली. हळूहळू आमचे घर नागपूरचे सेवाकेंद्र झाले. प्रसाराच्या निमित्ताने अनेक साधक आमच्या घरी येऊन रहायचे.

१० इ. मायेतून अलिप्त होणे

१० इ १. नातेवाइकांच्या मायेत न अडकता जोमाने साधना करणे : आम्ही साधनेत येण्यापूर्वी काका आणि आत्या यांच्या कुटुंबांशी आमचा पुष्कळ घरोबा होता. आम्ही प्रत्येक आठवड्याला एकत्र यायचो आणि सण एकत्र साजरे करायचो. आम्ही साधना करायला आरंभ केल्यावर काका आणि आत्या यांनी आम्हाला सनातन संस्थेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सनातनच्या कार्यात अधिकाधिक सहभागी होत असल्याचे बघून त्यांनी आमच्याशी संबंध न्यून केले, तरीही आई-बाबा त्यांच्या मायेत अडकले नाहीत. त्यांनी आणखी जोमाने साधना चालू ठेवली.

१० इ २. पूर्णवेळ साधना करण्यासाठी केलेला मायेचा त्याग : ‘मोठा व्यवसाय करणे, अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असा मोठा बंगला बांधणे (त्यासाठी त्यांनी कागदोपत्री प्लॅनही केला होता.), मुलांना पुष्कळ शिकवणे’, अशी बाबांचीही सर्वसामान्यांप्रमाणे स्वप्ने होती. साधनेत आल्यावर व्यवसायामुळे साधनेसाठी वेळ देता येत नसल्यामुळे त्यांनी व्यवसाय न्यून केला आणि हळूहळू तो बंद करून ते पूर्णवेळ साधना करू लागले. त्यांनी आमच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्याही साधकांना वापरण्यासाठी दिल्या. बाबांनी आमच्या घराचे सेवाकेंद्र केले.’

– सौ. अवनी आळशी, सौ. नंदिनी चितळे आणि श्री. चेतन राजहंस

(क्रमशः उद्याच्या अंकी)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/436423.html