अवैध हुक्का पार्लरवर कठोर कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार !

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – वर्ष २०१८ मध्ये अवैध हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा सिद्ध केला आहे. हुक्का पार्लर पुन्हा चालू झाल्याने याचा कायदा कडक करण्याची आवश्यकता आहे. कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. अवैध हुक्का पार्लर चालू करतांना दुसर्यांदा सापडला, तर ६ महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रहित करण्यात येईल, तसेच तिसर्यांदा सापडला, तर उपाहारगृहाचा परवाना कायमचा रहित करण्यात येईल, तसेच संबंधित दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला जाईल, अशी माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य सुनील कांबळे यांनी पुणे येथील अवैध हुक्का पार्लरविषयी हा तारांकित प्रश्न विचारला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, विश्वजित कदम, नाना पटोले यांनी सहभाग घेतला होता.
अवैध हुक्का पार्लर चालू असल्यास उत्तरदायी पोलिसांवर कारवाई करणार !
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अवैध हुक्का पार्लर पोलिसांनी उघडकीस आणला, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही; मात्र इतरांनी अवैध हुक्का पार्लर उघडकीस आणला, तर उत्तरदायी पोलिसांवर कारवाई केली जाईल. हुक्का ओढणे, ही ‘फॅशन’ झाली आहे. काही ठिकाणी तंबाखू असते, काही ठिकाणी नसते. बरेच जण अमली पदार्थ, चिलीम ओढतात. एके ठिकाणी धाड घातल्यावर शाळेतील मुले आढळली होती. यासाठी कायदा कडक करण्याविषयी निर्देश देण्यात येतील. अलीकडील काळात अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सिगारेट दिसते. त्यावर बंदी आहे. |