ओशेल, शिवोली येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !

घुबलावाडा- ओशेल, शिवोली, बार्देश, गोवा येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी, २३ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या देवस्थानाविषयी माहिती देणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.

श्री देवी महाकालिका

घुबलावाडा- ओशेल हा गाव शिवोलीपासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या उत्तरेला शापोरा नदी मंजुळ नाद करत वहाते, तर दक्षिणेला उंच डोंगरांच्या भिंती गावचे रक्षण करतात. चहूबाजूंनी हिरवीगार शेते, तर असंख्य कल्पवृक्षांची दाट छाया या गावाला लाभली आहे. अशा निसर्गरम्य आणि प्राकृतिक सौंदर्य लाभलेल्या या गावात श्री देवी महाकालिका आणि कुंभळेश्‍वर या देवता विराजमान झाल्या आहेत.

आख्यायिका

या देवस्थानची आख्यायिका अशी आहे. येथील रहिवासी श्री. रघुवीर रायु मांद्रेकर यांना १० ऑगस्ट १९८६ च्या पहाटे साक्षात्कार झाला की, ‘कुंभयाच्या वृक्षाखाली भूमी खण, तेथे तुला देवीची मूर्ती मिळेल.’ या साक्षात्काराविषयी श्री. रघुवीर मांद्रेकर यांनी दुसर्‍या दिवशी गावातील युवकांना माहिती दिली. त्यानुसार गावातील तरुण फावडे, कुदळ असे खोदकाम करण्याचे साहित्य घेऊन सदर ठिकाणी जमा झाले. त्या ठिकाणी खोदकाम करण्यास प्रारंभ केला. काही वेळातच त्यांना देवीची आणि महादेवाची अशा दोन पाषाणाच्या मूर्ती सापडल्या. सर्व ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा हा म्हणता ही वार्ता सर्वत्र पसरली. शिवोली गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित झाले. सदर मूर्ती किमान साडेचारशे वर्षांपूर्वीच्या असल्याचा कयास उपस्थितांनी लावला.

कौलप्रसादांती सदर मूर्ती कालिका आदीस्थानच्या आहेत, असे सांगण्यात आले. त्यानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी समराधना उत्सव करण्याचे ठरले.  या उत्सवाच्या दिवशी श्री देवी कालिका माता आणि श्री देव कुंभळेश्‍वर यांचा अवसर आला. त्यांनी एका जागी खोदून पहाण्यास सांगितले. अवसराच्या कौलप्रसादांती गावकर्‍यांनी तेथे खोदकाम केले. आश्‍चर्य म्हणजे त्या ठिकाणी त्यांना चारही बाजूंनी चिरेबंदी कुंपण सापडले. ‘गर्भकुड बांधण्यासाठी पूर्वजांनी हा आराखडा तयार केला असावा’, असा अंदाज हे कुंपण पाहिल्यावर येतो,  तसेच ४ कोपर्‍यांत ४ दगडी खांबही अर्धवट स्थितीत उभारलेले सापडले. पोर्तुगीज काळात गावकर्‍यांनी या ठिकाणी देवळाची गर्भकुड उभारण्याचे ठरवले असावे आणि त्यांना ते शक्य झाले नसावे, असा अंदाज जाणकारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

भूमीच्या मालकाने जागा उपलब्ध करून दिली आणि ग्रामस्थांच्या सर्वतोपरी सहकार्याने देवस्थान उभे राहिले. त्यांनंतर वर्ष १९९५ मध्ये या ठिकाणी भव्य सभागृह उभारण्यात आले. त्यानंतर मुख्य देवळाचे कौलारू छत पालटून ‘स्लॅब’चे पक्के बांधकाम श्री. दयानंद मांद्रेकर यांनी देणगी रूपाने करून दिले आहे.

देवस्थानचे उत्सव

देवस्थानात मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमीला जत्रोत्सव, चैत्र कृष्ण पक्ष षष्ठीला वर्धापनदिन, आषाढी एकादशीला दीड दिवसाचा भजनी सप्ताह, शिशिरोत्सव, असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

– श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवस्थान समिती