सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या शिवप्रतापामुळे युवक आणि समाज यांना आतंकवादाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. हा परिसर सध्या ‘सील’ असल्यामुळे अफझलखान वधाची जागा, अफझलखान आणि सय्यद बंडा यांची कबर शिवभक्त, युवक, तसेच परराज्यातील नागरिक यांना पहाता येत नाही. त्यामुळे किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझल खान आणि सय्यद बंडा यांची कबर परिसर शिवभक्त अन् परराज्यातून येणार्या पर्यटकांना पहाण्यासाठी खुली करावी, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने २१ डिसेंबर या दिवशी सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने हे निवेदन तहसीलदार भुसे यांनी स्वीकारले.
या वेळी श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार श्री. नितीन शिंदे, सर्वश्री आदित्य पटवर्धन, गजानन मोरे, चेतन भोसले, श्रीधरपंत मेस्त्री, ओंकार पवार, आकाश काळेल, संदीप पवार यांसह अन्य उपस्थित होते. हे निवेदन श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या सांगली येथील कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन दिले.
जिल्हाधिकार्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे
१. प्रतापगडाच्या पायथ्याशी चालू झालेले उदात्तीकरण शासनाने लक्ष घालून थांबवावे, अशी मागणी विधानपरिषदेत श्री. नितीन शिंदे यांनी आमदार असतांना केली होती. अफझलखानाचे चालू असलेले उदात्तीकरण थांबवावे, या मागणीसाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिवभक्तांचे आंदोलन उभे केले होते.
२. या आंदोलनाची नोंद घेऊन अफझलखानाचे उदात्तीकरण थांबवून अफझलखान कबरीचा परिसर सील करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि आजही तो परिसर बंद आहे. अफझलखानाचा वध केलेल्या ठिकाणी, तसेच अफझलखानाची कबर असलेल्या ठिकाणी कोणालाही जाण्यास सध्या सक्त मज्जाव आहे. हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अत्याचारी, हिंसाचारी अफझलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा प्रताप आहे. त्यामुळे हा परिसर खुला करण्यासाठी कुणाचाही विरोध होणार नाही, अशी आम्हाला निश्चिती आहे.
३. ‘शिवरायांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर मृत्यूनंतर वैर संपते, या भावनेतून अफझलखान आणि सय्यद बंडाची बांधलेली कबर सर्वांना पहाणी करण्यासाठी खुली केल्याने कुणाच्या भावना दुखावल्या जातील’, असे आम्हाला वाटत नाही.
४. एकीकडे गेली १८ वर्षे प्रतापगडावर शिवप्रताप दिन हा अत्यंत आनंदात, उत्साहाने आणि शांततेने पार पडतोे अन् दुसरीकडे या अफझलखान आणि सय्यद बंडा यांची कबर लोकांना पहाण्यासाठी बंद ठेवली आहे, हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे हा परिसर तात्काळ खुला करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.
शिवप्रतापामुळे आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, हुशारी आणि युद्धनीती यांचीही जाणीव होते. त्यामुळे हा परिसर तात्काळ खुला करण्याची आवश्यकता आहे.