धर्मावरील आघातांविषयी जागृती करणार्‍या ‘सनातन प्रभात’चा हिंदु समाज ऋणी राहील ! – अधिवक्ता विद्यानंद जोग

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने उत्साहात साजरा !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम

रत्नागिरी, १८ डिसेंबर (वार्ता.) – लोकशाहीच्या ४ आधारस्तंभापैकी चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारितेचा स्तंभ होय. दुर्दैवाने हा स्तंभ परकीय शक्ती आणि परकीय विचार यांच्या अधीन आहे. यास ‘सनातन प्रभात’ अपवाद आहे.

‘पतंजलि योग समिती’चे जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग

गेल्या २१ वर्षांपासून हिंदूंच्या धर्मभावना जपणारे केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’ हेच एकमेव वृत्तपत्र आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंवरील लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण आदी आघात हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. यामुळे हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील, असे प्रतिपादन ‘पतंजलि योग समिती’चे जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ पुरोहित श्री. अमर जोशी यांनी केलेल्या शंखनादाने झाला. त्यानंतर सनातन पुरोहित पाठशाळेचे ब्रह्मवृंद यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दीपप्रज्वलन केले. या प्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. या प्रकाशनानंतर सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. या संदेशाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना, हे ‘सनातन प्रभात’चे ध्येयवाक्य साध्य करा’, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा ताम्हनकर यांनी केले. या सोहोळ्यामध्ये ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे साहाय्यक संपादक श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनीही मार्गदर्शन केले.

‘लव्ह जिहाद’च्या आघाताला ‘सनातन प्रभात’नेच सर्वप्रथम वाचा फोडली ! – श्री. चेतन राजहंस, साहाय्यक संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह

श्री. चेतन राजहंस

वर्ष २००८ मध्ये हिंदु मुलींना पळवणे, त्यांचे अपहरण करणे, त्यांना खोट्या प्रेमात फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे अशा स्वरूपाच्या घटना घडत होत्या. त्यावरून ‘सनातन प्रभात’ने या सर्व बातम्यांचे सार काढत एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की, अशा घटनांमध्ये  जिहाद आहे आणि या प्रेम जिहादापासून सावध रहा. याच जागृतीचे फलित आज दिसत आहे. केरळच्या उच्च न्यायालयाने लव्ह जिहादविषयी केलेली टिपणी असो की, उत्तरप्रदेश सरकारने केलेला लव्ह जिहादविषयी केलेला कायदा असो. हा याच जागृतीचा परिणाम आहे. ‘सनातन प्रभात’ने नेहमीच काळाच्या पलीकडे जाऊन जनजागृती केली आहे. राष्ट्राचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजाला वैचारिक स्तरावर जागृत करावे लागते. हे वैचारिक परिवर्तन ‘सनातन प्रभात’ सातत्याने करत आहे.

धर्मशिक्षण देण्याच्या व्यवस्थेची न्यूनता ‘सनातन प्रभात’ने भरून काढली ! – श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. विनय पानवळकर

हिंदूंची सध्याची स्थिती पहाता त्यातून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे लक्षात येते. गेल्या २-३ पिढ्या हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्थाच उपलब्ध नव्हती. ही न्यूनता दैनिक ‘सनातन प्रभात’ने भरून काढली. आपले सण-उत्सव, परंपरा यांविषयीची माहिती, तसेच धर्मशिक्षण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून देण्यात येतेे. धर्माच्या, राष्ट्राच्या संदर्भातील सर्वाधिक जागृती ही दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे झाली. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे सहस्रो मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यापासून वाचल्या. केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे राष्ट्र आणि धर्महानीच्या घटना समाजासमोर आल्या.

विशेष

हा कार्यक्रम ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आणि ‘यू ट्यूब’ यांद्वारे थेट प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम ३ सहस्र ३७४ जणांनी प्रत्यक्ष पाहिला, तर कार्यक्रमाची लिंक १५ सहस्र ११४ जणांपर्यंत पोचली (रिच).