स्वातंत्र्यानंतरही पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचा अवलंब करणारे गुलामगिरी मानसिकतेचे भारतीय !

‘आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला; परंतु आजसुद्धा कोणत्याही व्यवस्थेमध्ये कोणतेही विशेष असे परिवर्तन दृष्टीस पडत नाही. आपण शिक्षणपद्धतच बघितली, तर लक्षात येईल की, १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वी विद्यालय आणि महाविद्यालय येथे जे शिकवले जात होते, जवळ जवळ तेच आजही शिकवले जात आहे. ना पुस्तके पालटली आणि ना परीक्षा पद्धत पालटली. सर्वकाही यथावत् आधीसारखेच चालू आहे. शिक्षणाशी संबंधित विद्वान आता अनुभवत आहेत की, भारतामध्ये दिले जाणारे शिक्षण भारतीय नाही. कोणत्याही पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय ज्ञान आणि भारतीयत्व दिसून येत नाही. केवळ एवढेच नाही, तर भारताचे जे मूलतत्त्व आणि अधिष्ठान आहे, ते अध्यात्मसुद्धा आजच्या शिक्षणामध्ये कुठेही दिसून येत नाही. शिक्षणाचे अधिष्ठान भारतीय नसल्यामुळेच शिक्षण क्षेत्रात विसंगती निर्माण झाली आहे. आम्ही हेच मूळ सोडून अन्य उपाय करण्यात गर्क आहोत. त्यामुळेच कोणतीही सुधारणा ना शिक्षण पद्धतीत होत आहे आणि ना समाजामध्ये ! उलट विकृती आणखीनच वाढत चालल्या आहेत.

आजचे शिक्षण संपूर्णपणे पश्‍चिमीकरणाच्या प्रभावाखाली आहे. काशीहून उच्च शिक्षित विद्यार्थ्याला ती मान्यता किंवा सन्मान मिळत नाही की, जो विदेशातून काहीही उलटसुलट शिकून आलेल्या व्यक्तीला मिळतो. पाश्‍चिमात्य प्रभावाने ग्रस्त झालेले शिक्षणक्षेत्र केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मागे धावत आहे. त्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांची घोर उपेक्षा होत आहे.

– श्री. ईश्‍वर दयाळ, (संदर्भ : मासिक ‘संस्कारम्’, जून २०१७)