(म्हणे) ‘गोमांसाची टंचाई निर्माण करून गोव्यातील धार्मिक सलोखा भाजप बिघडवत आहे !’

कर्नाटकमध्ये गोहत्याबंदी विधेयक संमत केल्याने  गोव्यातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना पोटशूळ !

गोवंश हत्या केल्यावर धार्मिक सलोखा बिघडत नाही; कारण हिंदू सहिष्णु आहेत आणि गोमांसावर बंदी नव्हे, तर गोमांसाची केवळ टंचाई निर्माण झाली, तरी धार्मिक सलोखा बिघडतो, असे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना वाटते. यावरून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड हे राजकीय पक्ष गोमांस खाणारे हिंसक किंवा असहिष्णु आहेत, हेच स्पष्ट करत आहेत.

पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक संमत केल्याने गोव्यातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना पोटशूळ उठला. (हा पोटशूळ अल्पसंख्यांकांच्या मतांसाठीचा आहे. यात राजकारणाशिवाय आणखी कोणताही हेतू नाही. आरोग्याच्या, पर्यावरणाच्या किंवा अन्य कोणत्याही दृष्टीने विचार केल्यास गोवंश हत्या निषिद्धच ठरते; पण काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या सर्व जनहितकारी सूत्रांशी तडजोड करून मतांसाठी गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करत आहे. – संपादक) गोव्यात कर्नाटक राज्यातून गोमांस आयात होत असल्याने गोव्यात गोमांसाची टंचाई निर्माण होईल, अशी आवई काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड हे पक्ष उठवू लागले आहेत, तसेच गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोपही या पक्षांनी केला आहे.

कर्नाटकने गोहत्याबंदी विधेयक समंत केल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, ‘‘कर्नाटक सरकारने जनावरांच्या हत्येवर बंदी घातल्याने कर्नाटक येथून गोव्यात येणारे मांस बंद होणार आणि यामुळे गोव्यात मांसाची टंचाई होणार आहे. गोव्यात मांसाची दरवाढही मोठ्या प्रमाणात होणार आहे. गोवा शासनाने गोव्यात एकमेव असलेला गोवा मांस प्रकल्प मुद्दामहून बंद ठेवला आहे आणि आता कर्नाटकमधून येणारे मांसही बंद होणार आहे. (गोवा मांस प्रकल्पात नियम धाब्यावर बसवून गोहत्या केली जात असल्याने हे प्रकरण न्यायाप्रविष्ट आहे. न्यायालयानेच प्रकल्प बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे ट्रोजन डिमेलो जनतेची दिशाभूल करत आहेत ! – संपादक) ‘जनतेने काय खावे’ यावर आता सरकारी निर्बंध लागू झाले आहेत. गोव्यातील अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायाच्या अंतर्गत व्यवहारात हा सरकारी हस्तक्षेप आहे. गोव्यातही भाजप सरकार कर्नाटकचेच धोरण राबवणार आहे.’’

‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई म्हणाले,

१. ‘‘कर्नाटकने जनावरांच्या हत्येवर बंदी घातल्याने यंदाचा नाताळ सण साजरा करतांना ख्रिस्ती समुदायाला मांस मिळणार नाही. भाजपच्या ध्रूवीकरणाच्या राजकारणाचा हा परिपाक आहे. (‘गोवा फॉरवर्ड’ही मतांसाठी म्हणजे राजकारणापोटीच गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध करत आहे. – संपादक)

२. कर्नाटकचे भाजप सरकार संस्कृती रक्षणासाठी जनावरांच्या हत्येवर बंदी घातल्याचे सांगते; मात्र याद्वारे भाजप बहुसंख्यांकांची आहारपद्धत अल्पसंख्यांकांवर लादण्याचा हा निंदनीय प्रकार करत आहे. (एवढी वर्षे अल्पसंख्यांकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी गोवंश हत्या काँग्रेसने चालू ठेवली. त्या वेळी बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. ७० वर्षे १०० कोटींहून अधिक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तो निंदनीयच नव्हे, तर त्याही खालचा प्रकार नव्हता का ? – संपादक)

३. प्रत्येक धर्माच्या भोजनातील प्रमुख घटकाचा सन्मान केला पाहिजे. गोमांसावर संपूर्ण भारतात बंदी घातली जाऊ शकते; मात्र गोव्यात बंदी घालणे शक्य नाही. (असे आहे, तर मग कर्नाटकने गोव्यात नव्हे, तर त्यांच्या राज्यात गोवंश हत्येवर बंदी घातली आहे, त्यात काय चुकले ? – संपादक)

४. भाजपचे धोरण हे अल्पसंख्यांकविरोधी आहे. (‘गोवा फॉरवर्ड’चा विरोध अल्पसंख्यांकधार्जिणा नाही का ? – संपादक) यामुळे गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने एकाच अल्पसंख्यांक उमेदवारास उमेदवारी दिली आहे.’’