देहली दंगल भडकावणार्‍या इस्लामी संघटनेकडून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना साहाय्य

२५ मशिदींतून मिळत आहे साहाय्य !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तान्यांचाही समावेश आहे, हे उघड होत असतांना आणि जिहादी विचारसरणीचेही लोक यात सहभागी होतांना दिसत असल्याने हे आंदोलन आता देशविरोधी होऊ लागले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

नवी देहली – येथील सीमेवर आंदोलन करणार्‍या पंजाब आणि हरियाणा येथील शेतकर्‍यांना काही संघटना साहाय्य करत आहेत. यात देहली दंगलीच्या प्रकरणी नाव आलेल्या ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ (यू.ए.एच्.) या इस्लामी संघटनेचाही समावेश आहे.

या संघटनेकडून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना भोजन आणि अन्य साहित्य पुरवण्यात येत आहे. यासाठी या संघटनेला २५ मशिदींकडून साहाय्य मिळत आहे, असे वृत्त ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.

१. संघटनेचा प्रमुख नदीम याने सांगितले की, आंदोलन करणार्‍यांना सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची ४ स्वयंपाकघरे २४ घंटे कार्यरत आहेत. हौज खास, रोहतक, ओखला आणि जुनी देहली येथे ही स्वयंपाकघरे आहेत. येथून शेतकर्‍यांच्या मागणीनुसार भोजन पाठवले जात आहे. यासाठी वाहनांचा वापर केला जात आहे.

२. यू.ए.एच्. या संघटनेची स्थापना खालिद सैफी याने केली होती. देहली दंगलीच्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत या संघटनेचे नाव घेतले होते. त्यांनी म्हटले होेते की, या संघटनेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर येण्यापूर्वी रस्ताबंद करण्याचे षड्यंत्र रचले होते. या प्रकरणी सैफी याला अटक करून त्याच्यावर ‘यूएपीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.