काठमांडू (नेपाळ) – नेपाळ सरकारची चीनसमर्थित धोरणे पहाता तेथील हिंदु जनतेने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याच्या मागणीस आरंभ केला आहे. यासाठी तिने नेपाळच्या विविध शहरांमध्ये दुचाकीफेरी काढून साम्यवादी पक्षाच्या के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विरोध केला. देशात वर्ष २००८ मध्ये राजेशाही पूर्णपणे समाप्त झाली होती. तेव्हापासून साम्यवाद्यांची सत्ता आहे.
‘राष्ट्रीय शक्ती नेपाल’ संघटनेचे अध्यक्ष केशव बहादूर बिस्ट यांनी सध्याची राज्यघटना फाडण्याची धमकी देत म्हटले की, आमचे तीन प्रमुख उद्देश आहेत. राज्यघटनात्मक राजेशाहीची स्थापना करणे, नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आणि संघवाद नष्ट करणे; कारण यामुळे लोकांना विभाजित केले जाते अन् राष्ट्राला संकटात टाकले जाते. सामान्य लोकांना वाचवणे कठीण झाले आहे. देश संकटात आहे; मात्र आमचे नेते देशाला लुटतच आहेत.