५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय ५ वर्षे) हिच्यावर सुसंस्कार होण्यासाठी तिची आई सौ. अर्पिता पाठक यांनी केलेले स्तुत्य प्रयत्न !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईश्‍वरी बळवंत पाठक ही एक आहे !

• ‘दैवी बालकांचे आई-वडील त्यांना कसे शिकवतात, हे जाणण्याची मला इच्छा होती, ती या लेखांमुळे पूर्ण झाली. त्याविषयी कु. सायली डिंगरे हिचे अभिनंदन ! ’‘

• सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

​‘हिंदु राष्ट्र’ चालवण्यासाठी ईश्‍वराने सनातनला दैवी बालकांची अनमोल देणगी दिली आहे. त्यांच्यातील विविध गुणकौशल्ये, प्रगल्भता आणि ईश्‍वराप्रतीचा भक्तीभाव यांमुळे त्या बालकांतील विशेषत्व ठळक होते. ही बालके उपजतच हुशार असल्याने ‘त्यांना घडवणे’, हे एक वेगळे कौशल्यच आहे. या दैवी बालकांची बुद्धीमत्ता सूक्ष्म आणि प्रगल्भ असल्यामुळे लहान वयात त्यांना योग्य दिशा न मिळाल्यास त्यांची बुद्धी अयोग्य ठिकाणी वहावत जाण्याची शक्यता असते. बालवयातच त्यांच्यावर सुसंस्कार होण्यासाठी त्यांच्या विचारांना आध्यात्मिक दिशा दिली, तर ती आध्यात्मिकदृष्ट्या घडतात; मात्र तसे करण्यात आपण उणे पडलो, तर त्यांच्या त्या हुशारीला वेगळे वळण लागून ती वाह्यातपणाही करू लागतात. त्यामुळेच ‘दैवी बालकांना घडवणे’, हे पालकांचे मोठे दायित्व आहे. पाल्याला घडवतांना पालकांच्याही साधनेचा कस लागतो. ही मुले वयाने लहान असल्याने आपण सांगितलेले सगळे त्यांना कळतेच, असे नाही; मात्र काही सांगितले नाही, तर त्यांच्या अयोग्य कृतींना आपण अनुमोदन दिल्यासारखे होते. अशा प्रसंगांत थेट रागावण्यापेक्षा गोड बोलून पाल्यांना समजावून सांगितले, तर त्यांना योग्य दृष्टीकोन मिळतो.

माझी ताई सौ. अर्पिता पाठक तिची कन्या कु. ईश्‍वरी हिला चांगले हाताळते. ताई सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने कधी गोष्टी सांगून, कधी स्वतःच्या कृतीतून ईश्‍वरीला घडवण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करते. तिला याविषयी मानसोपचार तज्ञ आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत आणि मानसोपचार तज्ञ (सौ.) आशा ठक्कर यांच्या सत्रांना बसण्याची संधी मिळाली. त्यातून ‘पाल्याला कसे हाताळावे ?’, हे तिला शिकता आले. कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (२८.११.२०२०) या दिवशी कु. ईश्‍वरी बळवंत पाठक हिचा ५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तिच्याविषयी काही प्रसंग येथे देऊन तिच्या आईने ‘ईश्‍वरीवर सुसंस्कार होण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे येथे दिले आहे. ते वाचून सर्वच पालकांना ‘पाल्यावर सुसंस्कार करण्यासाठी योग्य दिशा मिळून त्यांच्याकडूनही प्रयत्न व्हावेत’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !

चि. ईश्‍वरी पाठक

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. ईश्‍वरी बळवंत पाठक हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती.’ – संकलक)

२८ नोव्हेंबर या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात चि. ईश्‍वरीवर सुसंस्कार व्हावेत यासाठी तिच्या आईने केलेले काही प्रयत्न पाहिले. आज लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426142.html


सौ. अर्पिता पाठक

३. ईश्‍वरीला आश्रमातील कार्यपद्धतींमागील कारणे समजावून सांगितल्यामुळे त्या कार्यपद्धती स्वीकारणे ईश्‍वरीला सोपे जाणे

ताई ईश्‍वरीला आश्रमातील कार्यपद्धतींमागील कारणेही सांगते, उदा. भोजनकक्षाच्या बाहेरील परिसरात ‘दुपारी १ ते ४ या वेळेत मुलांनी खेळू नये’, ही कार्यपद्धत सांगतांना ताईने ‘त्या परिसरात असलेल्या निवासी खोल्यांतील संत आणि वयस्कर साधक यांना दुपारी विश्रांती घेण्यास मुलांच्या आवाजामुळे अडचण येते’, हे तिला समजावून सांगितले. त्याच समवेत त्या वेळेत तिने बाहेर न खेळता ‘आईजवळ बसून बैठे खेळ खेळल्यास तिला कसे विविध प्रकारचे खेळ खेळायला मिळतील ?’, हेही सांगितले. ‘शाळेला सुटी असतांना त्या वेळेत ईश्‍वरीने प्राधान्याने विश्रांती घ्यावी’, असेच ताईने सांगितले आणि तिचे नियोजनही केले आहे.

​ताईने आश्रमाच्या कार्यपद्धती या नियम म्हणून न सांगता त्यांची कारणे सांगितल्यामुळे ईश्‍वरीला ते सहजतेने स्वीकारणे किंवा कृतीत आणणे सोपे झाले.

४. ‘आईने केवळ स्वतःचेच कौतुक करावे, इतरांचे करू नये’, ही वृत्ती जाण्यासाठी ताईने ईश्‍वरीला भोजनकक्षातील प्रत्येक बाकाजवळ जाऊन तेथील साधिकांना ‘तुम्ही छान दिसता’, असे कौतुक करायला सांगणे आणि परिणामस्वरूप संध्याकाळी एका साधिकेला तिने ‘तुम्ही छान दिसता’, असे उत्स्फूर्तपणे म्हणणे

दसर्‍यानिमित्त ईश्‍वरीने नवीन पोशाख आणि दागिने घातले होते. त्या दिवशी आश्रमातील सर्वच साधकांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते आणि सर्वच सुंदर दिसत होते. ताईने काही बालसाधिकांना ‘त्या सुंदर दिसत आहेत’, असे सांगितले. तेव्हा ईश्‍वरीला ते आवडले नाही. त्या वेळी ‘आईने केवळ ईश्‍वरीलाच सुंदर म्हणावे आणि इतरांचे कौतुक करू नये’, असा तिचा हट्ट होता. तेव्हा ताईने ‘सर्व साधिका आणि बालसाधिका ही देवीचीच रूपे आहेत. सर्वांचे कौतुक करता आले पाहिजे’, हे सांगून तिला तिच्या अयोग्य कृतीची जाणीव करून दिली, तसेच ‘भोजनकक्षातील प्रत्येक बाकाजवळ जाऊन तेथील साधिकांना ‘तुम्ही सुंदर दिसत आहात’, असे सांगून कौतुक करून येण्यास सांगितले. तिनेही त्याप्रमाणे कृती केली. त्यानंतर संध्याकाळी मार्गिकेत एक साधिका भेटल्यावर ईश्‍वरीने त्या साधिकेला स्वतःहून ‘तुम्ही छान दिसत आहात’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले. खरेतर संध्याकाळपर्यंत ईश्‍वरी सकाळचा प्रसंग विसरली होती; मात्र इतरांचे कौतुक करण्याचा संस्कार तिच्या मनावर निर्माण झाल्यामुळे तिला त्या साधिकेचे मनापासून कौतुक वाटले आणि तिने ते व्यक्तही केले.

५. कमळाचे उदाहरण देऊन परिस्थिती स्वीकारण्यास शिकवणे

ईश्‍वरी ३ वर्षांची असतांना आम्ही खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा पावसामुळे मार्गावर बराच चिखल झाला होता. ईश्‍वरीला सगळीकडे स्वच्छता लागते. त्यामुळे अशा चिखलाच्या ठिकाणी पाय ठेवण्याची तिची सिद्धता नव्हती. त्यामुळे आमची खरेदी चालू असतांना ती ‘कडेवर घे’, असा हट्ट करत होती. ताईने तिला कडेवर घेतले नाही आणि शेजारून चालत असलेली अनेक लहान बालके दाखवून तिला सांगितले, ‘‘तूही त्यांच्याप्रमाणे चालले पाहिजे.’’ तेव्हा ईश्‍वरीचे विशेष समाधान झाले नाही आणि ताईनेही तिला कडेवर घेतले नाही. शेवटी सर्व खरेदी करून परत आल्यावर ताईने तिला लक्ष्मीचा चरणस्पर्श लाभलेल्या कमळाची गोष्ट सांगून समजावले. तेव्हा ताईने तिला सांगितले, ‘‘कमळ चिखलातच उभे असते; मात्र कमळाने ती परिस्थिती स्वीकारली आहे. त्या चिखलात राहूनही कमळ ‘स्वतःचे मन स्वच्छ अन् बाप्पाला अपेक्षित असे राहील’, यासाठी प्रयत्न करत असल्याने ‘त्याच्यावर उभे रहावे’, असे लक्ष्मीला वाटते. तू एवढा वेळ हट्टीपणा केलास, तर ‘तुझ्या हृदयात यावे’, असे बाप्पाला वाटेल का ? सनातनच्या आश्रमांत जशी स्वच्छता असते, तशी सर्वत्र नसेल; पण त्याही परिस्थितीशी तुला जुळवून घेता यायला हवे.’’

६. ‘ज्येष्ठांना नमस्कार करण्याची सवय लागावी’, यासाठी सणाच्या प्रसंगी ताईने ईश्‍वरीला सेवेतील साधकांना वाकून नमस्कार करायला सांगणे ​

घरी रहाणार्‍या मुलांना ‘ज्येष्ठांना वाकून नमस्कार करणे, सणाच्या दिवशी घरातील ज्येष्ठांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करणे’, अशा सवयी आपोआप लागतात; मात्र आश्रमात असे प्रसंग क्वचित् येतात. ‘ईश्‍वरीला ज्येष्ठांना नमस्कार करण्याची सवय लागावी’, यासाठी ताई ईश्‍वरीला दसरा आणि गुढीपाडवा अशा सणांच्या प्रसंगी आमच्या समवेत सेवा करणार्‍या सर्व साधकांना वाकून नमस्कार करण्यास सांगते.

७. प्रत्येक सणाचे आणि त्या दिवशीच्या उपास्यदेवतेचे महत्त्व सांगून ईश्‍वरीकडून त्या देवतेची मानसपूजा करवून घेणे ​

ताई प्रत्येक सणाच्या आधी त्या सणाचे पौराणिक महत्त्व ईश्‍वरीला समजावून सांगते. ‘त्या सणाची देवता आणि त्या दिवशी करायची पूजा’ यांविषयी तिचा भक्तीभाव वाढेल’, अशा प्रकारच्या गोष्टी तिला सांगते. त्या त्या सणानुसार ताई ईश्‍वरीकडून त्या त्या देवतेची मानसपूजाही करवून घेते. त्यामुळे ईश्‍वरीला त्या त्या सणांचे आध्यात्मिक महत्त्व कळते.

८. ‘राधेसारखे होण्यासाठी तिच्यासारखी साधना करायला हवी’, हे ईश्‍वरीला समजेल, अशा प्रकारे सांगणे  

दोन वर्षांची असतांना एकदा ईश्‍वरीने राधा-कृष्ण यांच्याविषयीची एक ध्वनीचित्र-चकती पाहिली. त्यातील राधेची भक्ती पाहून ती भारावली. ती आईला म्हणाली, ‘‘आई, मलाही ‘राधा’ व्हायचे आहे. तू मला घागरा-ओढणी घाल आणि राधेसारखे सजव.’’ ती ध्वनीचित्र-चकती पाहून ईश्‍वरीला ‘राधेसारखे व्हायचे आहे’, हे कळले होते; पण ‘त्यासाठी काय करायचे ?’, हे कळले नव्हते. ताईने तिचा ‘बालहट्ट’ असे म्हणून सोडून न देता तिला त्यातील आध्यात्मिक भावार्थ सांगितला. तिच्या इच्छेसाठी ताईने तिला घागरा-ओढणी घातली; मात्र ‘केवळ राधेसारखा पोशाख केल्याने ‘राधा’ होता येत नाही. त्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनाही करावी लागते’, हे ताईने ‘तिला समजेल’, अशा रितीने तिला सांगितले. त्यामुळे ईश्‍वरीने त्या दिवशी राधेसारखे होण्यासाठी काही वेळ सेवाही केली.

९. ‘चूक झाल्यावर आई शिक्षा करेल’, अशी भीती वाटण्यापेक्षा ‘चुका लपवल्यास आपण देवबाप्पापासून दूर जातो’, असे सांगून ईश्‍वरीला योग्य विचार करायला प्रवृत्त करणे  

‘चूक झाल्यावर आई शिक्षा करील’, अशी ईश्‍वरीला भीती वाटते’, हे काही प्रसंगांत ताईच्या लक्षात आले. एका प्रसंगात ‘आईने शिक्षा करू नये’, यासाठी ईश्‍वरीने प्रसंग फिरवून फिरवून सांगितला. त्या वेळी ताईने तिला विश्‍वासात घेऊन सांगितले, ‘‘शिक्षा तुझ्या भल्यासाठी आहे. एखाद्या वेळी शिक्षा घेण्याची तुझ्या मनाची सिद्धता नसेल. तेव्हा तू मला तसे मोकळेपणाने सांग. त्या वेळी मी तुला शिक्षा देणार नाही; मात्र ‘आई शिक्षा करेल’, या भीतीने तू चुका लपवल्यास, तर तुझे स्वभावदोष आणि अहं वाढून तू देवबाप्पापासून दूर जाशील.’’

९ अ. ‘शिक्षेच्या भीतीने ईश्‍वरीने झालेल्या चुका लपवू नयेत आणि तिला स्वतःलाच योग्य-अयोग्य विचार करता यावा’, यासाठी ताईने घेतलेला स्तुत्य निर्णय ! : ‘चुकांची भीती सर्वांच्याच मनात असते. ईश्‍वरी तर लहानच आहे. ‘तिला चुकांमुळे शिक्षा होण्याची भीती वाटणे’, हे साहजिक आहे’, हे लक्षात घेऊन ताईने तिला समजावून सांगितले. त्यामुळे ‘ईश्‍वरीला योग्य-अयोग्य सांगून शिक्षा करायची’, यापेक्षा ‘ईश्‍वरीच्या स्वतःच्याच मनाची प्रक्रिया व्हावी’, यावर तिने भर दिला. ताईने तिला सांगितले, ‘‘एखाद्या वेळी तुझ्या मनाची स्थिती ठीक नसेल, तर शिक्षा घेऊ नकोस; पण खेळतांना आणि बालसाधकांशी बोलतांना झालेल्या चुका तू मला मोकळेपणाने सांग. ‘तुझ्या स्थितीनुसार आपण चुकीविषयी पुढील प्रक्रिया कशी करायची ?’, हे ठरवू.’ त्यामुळे आई कठोर असली, तरी ईश्‍वरीच्या मनातील तिच्याविषयीची भीती न्यून होण्यास साहाय्य झाले.

पालक कठोर असतील, तर मुलांच्या मनात पालकांविषयी भीती निर्माण होऊन मुले चुका लपवण्याचा विचार करतात. घडलेल्या चुकीपेक्षा चुका लपवण्याचे विचार आयुष्यात पुढे घातक ठरतात. अशा वेळी ‘हे सर्व त्यांच्या भल्यासाठी आहे’, हे त्यांना पटवून देतांना त्यांना विश्‍वासात घेणे फार महत्त्वाचे असते. ईश्‍वरी तशी लहान असली, तरीही ताई हे सर्व करते.

९ आ. स्वतःच्या चुका झाल्यावर स्वतःही प्रायश्‍चित्त घेत असल्याचे ईश्‍वरीला सांगणे : जसे आपण तिला प्रायश्‍चित्त घ्यायला सांगतो, तसेच ‘आपणही स्वतःकडून चुका झाल्यावर विविध प्रायश्‍चित्ते घेतो’, हे तिला समजावे; म्हणून ताई स्वतः घेतलेली प्रायश्‍चित्ते तिला सांगते.

१०. ईश्‍वरीची आकलनक्षमता चांगली असल्याने ताईने तिला अक्षरे आणि नंतर छोटी वाक्ये लिहायला लवकर शिकवणे अन् हळूहळू प्रतिदिन स्वतःची एक चूक लिहायला शिकवून तिचा व्यष्टी साधनेचा पाया सिद्ध केल्यामुळे तिच्या बालमनावर साधनेचा सहजतेने संस्कार होणे

ईश्‍वरीची आकलनक्षमता पुष्कळ आहे. ईश्‍वरी ४ वर्षांची असतांनाच ताईने आणि माझ्या आईने तिला ‘अ ते ज्ञ’ अक्षरे लिहायला शिकवली आहेत. टप्प्याटप्प्याने काना, मात्रा, वेलांटी हेही शिकवले. त्यामुळे आता शाळेतील अभ्यासक्रम बराच मागे असूनही ईश्‍वरीला लहान लहान वाक्ये लिहिता येतात. तिला लिहायला येऊ लागल्यानंतर ताईने तिला प्रतिदिन एक चूक आणि त्यामागचा तिचा स्वभावदोष लिहायला शिकवले. त्यामुळे तिचा लिखाणाचा सरावही झाला आणि सारणी लिखाणही होऊ लागले. तिने तिच्या प्रयत्नांची स्वतंत्र चिंतनसारणीही बनवली आहे. ईश्‍वरीच्या व्यष्टी प्रयत्नांमध्ये तिने ‘प्रतिदिन समष्टीत एक चूक सांगणे’, हा प्रयत्नही अंतर्भूत केला आहे.

ताईच्या सेवांची तातडी असेल, तेव्हा ईश्‍वरीकडून हे प्रयत्न करवून घेणे तिला कठीण जाते; पण जेव्हा शक्य असेल, तेव्हा ताई तिच्याकडून अशा प्रकारे प्रयत्न करवून घेते.’

कु. सायली डिंगरे

११. कु. ईश्‍वरीचे संगोपन करतांना ताईने स्वतःच्या स्तरावर केलेले प्रयत्न !

११ अ. ईश्‍वरीकडून होणार्‍या चुका टाळण्यासाठी त्या चुकांमागच्या कारणांचा अभ्यास करणे आणि ‘त्या चुका टाळण्यासाठी आपण दोघीही नियोजनबद्ध प्रयत्न करूया’, असे ईश्‍वरीला सांगणे : ‘ईश्‍वरीची काही कारणाने चिडचिड होत असल्यास ताई तिला नुसते न रागावता त्यामागील कारणांचा अभ्यास करते. काही वेळा सेवांच्या तातडीमुळे ताई तिला वेळ देऊ शकलेली नसते. काही वेळा ताईच्या सेवांनुसार तिचे नियोजन पालटत असल्याने त्याचा ईश्‍वरीच्या खेळण्यावर किंवा झोपण्यावर परिणाम झालेला असतो. त्यासाठी ताई तिची क्षमाही मागते आणि ‘आतापासून तुला वेळ देते’, असे तिला सांगते. ताई ईश्‍वरीच्या चुकांची तिला जाणीव करून देते आणि ‘त्या चुका टाळण्यासाठी आपण दोघीही नियोजनबद्ध प्रयत्न करूया’, असेही तिला सांगते.

११ आ. ‘स्वतःच्या साधनेच्या समवेत मुलीचीही साधना घडावी, तिच्या संस्कारक्षम बालमनावर साधनेचे चांगले संस्कार व्हावेत आणि तिच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव निर्माण व्हावा’, यासाठी ताई सतत प्रयत्नरत असणे अन् काही वेळा प्रयत्न अल्प झाले किंवा त्यांत खंड पडला, तरी ती पुन्हा चिकाटीने प्रयत्न करणे : ताई आणि ईश्‍वरी यांच्या सहवासात मला असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग अनुभवता येतात. मी त्यांतील काही प्रसंगच येथे शब्दबद्ध करू शकले. अशा वेळी ईश्‍वरीवर लहान वयात सुसंस्कार करणारी ताई आणि ते सर्व आवडीने आत्मसात करणारी प्रगल्भ ईश्‍वरी यांचे मला अपार कौतुक वाटते. ‘आपली स्वतःची साधना होण्यासह ईश्‍वरीचे कल्याण व्हावे; म्हणून आपण पूर्णवेळ साधना करत आहोत, तर ईश्‍वरी साधनेच्या दृष्टीने घडली पाहिजे’, या ध्यासाने ताई स्वतःची साधना म्हणूनच तिला घडवत असते. लहान लहान संवादातून ‘तिच्या मनामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांविषयी भाव निर्माण होईल आणि तिच्यावर साधनेचा संस्कार होईल’, अशा रितीने ती प्रयत्न करते. ताईची समष्टी प्रकृती आहे. दायित्व घेऊन सेवा करायला तिला आवडते. असे असूनही ईश्‍वरीसाठी काही वेळ ती आवर्जून ठेवते. हे करतांना तिचा संघर्ष होतो, तरीही ईश्‍वरीमध्ये साधकत्व रुजावे आणि तिच्या मनावर साधनेचा संस्कार व्हावा; म्हणून ताई सतत धडपड करते. कधी काही प्रसंगांत ती न्यूनही पडते, कधी काही प्रयत्नांमध्ये खंड पडतो; पण असे असले, तरी ती पुन्हा प्रयत्न चालू करते.

‘ताई आणि ईश्‍वरी या दोघींची साधनेच्या स्तरावर जडणघडण होऊ दे. परात्पर गुरुदेवांची अखंड कृपा त्यांच्यावर राहू दे’, अशी मी प्रार्थना करते.’

(समाप्त)

– कु. सायली डिंगरे (कु. ईश्‍वरीची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२०)

मानसोपचारतज्ञ आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी ‘बालकांचे संगोपन’ याविषयी केलेले मार्गदर्शन

१. मुलाची चूक झाल्यावर ‘स्वतःच्या स्वभावदोषांचे प्रकटीकरण होते कि पाल्यावर संस्कार करण्यासाठी रागावले जाते ?’, याचा अभ्यास करणे आवश्यक असणे

‘काही वेळा लहान मुलांना आपण रागावतो. त्या वेळी ‘आपल्या मनात त्यांच्या अयोग्य कृतीविषयी प्रतिक्रिया उमटली आहे का ?’, हे पहाणे आवश्यक आहे. अशा वेळी आपण रागावल्यावर ती आपल्या स्वभावदोषांची प्रतिक्रिया असल्यास ते मुलांनाही कळते. याची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१ अ. मुलाकडून पाणी सांडल्यावर ‘ते सर्व आपल्याला पुसावे लागणार’, या विचाराने रागावले जाते कि त्याच्या अयोग्य कृतीमुळे पाणी सांडले’, यासाठी रागावले जाते ?’, हे पहाणे आवश्यक असणे : एखाद्या वेळी पाल्याकडून पाणी सांडल्यावर आपण पटकन त्याला रागावतो. त्या वेळी काही वेळा त्या पाल्याची स्वीकारण्याची स्थिती असते, तर काही वेळा नसतेही. त्या वेळी ‘त्याने पाणी सांडल्यामुळे आपल्याला ते सर्व पुसावे लागेल, आवरावे लागेल’, या कारणाने आपण रागावतो कि पाल्याकडून पाणी का सांडले ? त्याने तो पेला योग्य ठिकाणी ठेवला असता, तर कसे योग्य झाले असते ?’, असे विचार असतात’, हे पहाणे आवश्यक असते.

१ आ. ‘मुलाने इतरांसमोर ‘चॉकलेट’ खाल्ल्यास त्याला रागावणे; पण एकटे असतांना ‘चॉकलेट’ खाल्यास न रागावणे’, यात पालकांचा ‘प्रतिमा जपणे’, हा स्वभावदोष असणे : काही वेळा आपण प्रतिमेपोटीही पाल्याला रागवतो, उदा. ‘पाल्याने अन्य साधकांसमोर किंवा इतरांसमोर ‘चॉकलेट’ खाल्ल्यास आपण त्याला रागावतो; मात्र काही वेळा खोलीत आपण एकटेच असतांना किंवा अन्य गोष्टींत व्यस्त असतांना त्याने ‘चॉकलेट’ खाल्ले, तर त्याकडे दुर्लक्ष करतो. अशाने मुलांना ‘इतरांसमोर ‘चॉकलेट’ खाल्ले, तर आई रागावते; पण अन्य वेळी खाल्ले, तर चालते’, असे वाटते. त्यामुळे एखादी अयोग्य सवय सोडवण्यासाठी प्रत्येकच वेळी योग्य पद्धतीने जाणीव करून देणे आवश्यक असते.

​असे चिंतन केल्याने ‘आपण पालकांचे कर्तव्य म्हणून पाल्याला रागावतो ? कि आपल्या स्वभावदोषांचे प्रकटीकरण होऊन त्याला रागवतो ?’, हे समजणे
सोपे होते.

२. शिक्षेचे गांभीर्य ठेवणे

२ अ. पाल्याच्या मनात चुकांविषयीचे गांभीर्य रहाण्यासाठी त्या चुकीच्या वेळी किंवा पाल्य क्षमायाचना करतांना ‘त्याला हसून जवळ घेणे’, अशा कृती टाळणे आवश्यक : दैवी बालके वयाने लहान असूनही स्वतःच्या चुकीसाठी इतरांकडे क्षमायाचना करतात आणि स्वतःच्या चुका स्वीकारतात. अशा वेळी आपल्याला त्याचे कौतुक वाटते. पाल्याने गंभीर चूक केली असली, तरी ‘त्याने क्षमायाचना केली’, या कौतुकाने आपण त्याला हसून प्रतिसाद देतो किंवा जवळ घेतो. अशा वेळी त्या चुकीचे क्षमायाचनेमुळे निर्माण झालेले गांभीर्य अल्प होते. त्यामुळे पाल्याने क्षमायाचना केल्यानंतर त्याला हसून प्रतिसाद न देता ‘चुकीचे गांभीर्य टिकून राहील’, अशा प्रकारे पालकांचे वर्तन असावे.

२ आ. पाल्याला शिस्त लावण्यासाठी सर्व कुटुंबियांचाही सहयोग असणे आवश्यक ! : आई पाल्याला शिस्त लावण्यासाठी रागावत असेल, तेव्हा इतर कुटुंबियांनी त्याला पाठीशी घातले, तर पाल्याच्या लेखी आई वाईट ठरते आणि पाल्याला शिस्तही लागत नाही. अशा वेळी आई कठोर राहून शिस्त लावत असतांना अन्य कुटुंबियांनीही आईला पूरक राहून कृती करावी.

३. समजावून सांगणे

३ अ. लहान मुलांना सतत मारू नये ! : लहान मुलांना सतत मारले की, ती कोडगी होतात. नंतर त्यांच्याकडून मोठी चूक झाल्यावर आपण त्यांना मारले, तरी त्यांना त्याचे विशेष काही वाटत नाही. ‘अमुक अमुक केले नाही, तर तुला मारीन’, अशा प्रकारे केवळ भीती दाखवली, तर मोठी शिक्षा होईल; म्हणून मुले घाबरतात; मात्र प्रत्यक्ष वारंवार मार मिळाल्याने ‘मार मिळाल्यानंतर थोडा वेळ दुखते. नंतर काही होत नाही’, अशी त्यांची मानसिकता होते. त्यामुळे मार खाल्ल्यावर ती थोडा वेळ रडतात; पण नंतर त्यांना चुकीची खंत किंवा गांभीर्य रहात नाही.

३ आ. पाल्याला प्रेमाने समजावून सांगितल्यास आणि त्याला विश्‍वासात घेऊन नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास पाल्यात योग्य प्रकारे सुधारणा घडू शकणे : मुलांना मारण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे शिकवले, तर मुले शिकतात. चूक झाल्यानंतर तात्काळ नुसतेच न रागावता त्याची चूक स्वीकारण्याची स्थिती निर्माण करून त्याला ‘त्या चुकीमुळे त्याच्या साधनेची कशी हानी होते ? देवबाप्पाला काय अपेक्षित आहे ?’, असे समजावून सांगितले पाहिजे. त्यानंतर ‘पुन्हा ही चूक होऊ नये’, यासाठी कुठले प्रायश्‍चित्त घ्यायचे ?’, असे त्याला विचारून प्रायश्‍चित्त घ्यायला साहाय्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना विश्‍वासात घेऊन चुका सुधारण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला, तर त्याच्या चुका सुधारता येतात. ‘पाल्याला मारणे’ हा अगदी शेवटचा पर्याय ठेवावा.’

– कु. सायली डिंगरे (कु. ईश्‍वरीची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.