५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय ५ वर्षे) हिच्यावर सुसंस्कार होण्यासाठी तिची आई सौ. अर्पिता पाठक यांनी केलेले स्तुत्य प्रयत्न !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईश्‍वरी बळवंत पाठक  ही एक आहे !

• ‘दैवी बालकांचे आई-वडील त्यांना कसे शिकवतात, हे जाणण्याची मला इच्छा होती, ती या लेखांमुळे पूर्ण झाली. त्याविषयी कु. सायली डिंगरे हिचे अभिनंदन ! ’ 

• ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
–  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्र’ चालवण्यासाठी ईश्‍वराने सनातनला दैवी बालकांची अनमोल देणगी दिली आहे. त्यांच्यातील विविध गुणकौशल्ये, प्रगल्भता आणि ईश्‍वराप्रतीचा भक्तीभाव यांमुळे त्या बालकांतील विशेषत्व ठळक होते. ही बालके उपजतच हुशार असल्याने ‘त्यांना घडवणे’, हे एक वेगळे कौशल्यच आहे. या दैवी बालकांची बुद्धीमत्ता सूक्ष्म आणि प्रगल्भ असल्यामुळे लहान वयात त्यांना योग्य दिशा न मिळाल्यास त्यांची बुद्धी अयोग्य ठिकाणी वहावत जाण्याची शक्यता असते. बालवयातच त्यांच्यावर सुसंस्कार होण्यासाठी त्यांच्या विचारांना आध्यात्मिक दिशा दिली, तर ती आध्यात्मिकदृष्ट्या घडतात; मात्र तसे करण्यात आपण उणे पडलो, तर त्यांच्या त्या हुशारीला वेगळे वळण लागून ती वाह्यातपणाही करू लागतात. त्यामुळेच ‘दैवी बालकांना घडवणे’, हे पालकांचे मोठे दायित्व आहे. पाल्याला घडवतांना पालकांच्याही साधनेचा कस लागतो. ही मुले वयाने लहान असल्याने आपण सांगितलेले सगळे त्यांना कळतेच, असे नाही; मात्र काही सांगितले नाही, तर त्यांच्या अयोग्य कृतींना आपण अनुमोदन दिल्यासारखे होते. अशा प्रसंगांत थेट रागावण्यापेक्षा गोड बोलून पाल्यांना समजावून सांगितले, तर त्यांना योग्य दृष्टीकोन मिळतो.​

माझी ताई सौ. अर्पिता पाठक तिची कन्या कु. ईश्‍वरी हिला चांगले हाताळते. ताई सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने कधी गोष्टी सांगून, कधी स्वतःच्या कृतीतून ईश्‍वरीला घडवण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करते. तिला याविषयी मानसोपचार तज्ञ आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत आणि मानसोपचार तज्ञ (सौ.) आशा ठक्कर यांच्या सत्रांना बसण्याची संधी मिळाली. त्यातून ‘पाल्याला कसे हाताळावे ?’, हे तिला शिकता आले. कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (२८.११.२०२०) या दिवशी कु. ईश्‍वरी बळवंत पाठक हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्याविषयी काही प्रसंग येथे देऊन तिच्या आईने ‘ईश्‍वरीवर सुसंस्कार होण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे येथे दिले आहे. ते वाचून सर्वच पालकांना ‘पाल्यावर सुसंस्कार करण्यासाठी योग्य दिशा मिळून त्यांच्याकडूनही प्रयत्न व्हावेत’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना ! ​    

(भाग १)

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. ईश्‍वरी बळवंत पाठक हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती.’ – संकलक)

चि. ईश्‍वरी पाठक

कु. ईश्‍वरी पाठक हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. आवड-नावड न जपणे

१ अ. घरात सर्वांसाठी जो स्वयंपाक केला असेल, तोच ईश्‍वरीला खायला शिकवणे : ‘ताईने ईश्‍वरी लहान असल्यापासूनच सर्वांसाठी जो स्वयंपाक केला असेल, तोच खाण्याची तिला सवय लावली. त्यामुळे ताई पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहायला आली. तेव्हा सर्वांसाठी भोजन आणि अल्पाहार यांत जे पदार्थ ठेवलेले असतील, तेच ईश्‍वरी खाते.

सौ. अर्पिता पाठक

१ आ. घरातीलच खाऊ खाण्याची सवय लावणे : ताई ईश्‍वरीसाठी लिमलेटच्या गोळ्या कधीतरीच आणते; मात्र ‘चॉकलेट’ ती स्वतःहून विशेष कधी आणत नाही. बिस्किटेही कधी प्रसारानिमित्त बाहेर गेल्यानंतर ईश्‍वरीला भूक लागली, तर त्याच वेळी देते. ‘घरात असतांना घरातीलच खाऊ खायचा’, अशी शिस्त तिने ईश्‍वरीला लावली.

१ इ. कधी गोष्टी सांगून किंवा गोड बोलून सर्व पदार्थ खाण्याची सवय लावणे : ईश्‍वरीने एखादा पदार्थ खाण्यासाठी नकार दिल्यास त्या पदार्थाविषयी ताई तिला एखादी गोष्ट बनवून सांगते. त्या पदार्थाविषयी संतांची एखादी कथा किंवा प्रसंग असल्यास तो तिला सांगते. त्यामुळे त्या पदार्थाविषयी तिच्या मनात भाव निर्माण होऊन काही प्रमाणात तरी ती तो पदार्थ खाते. ‘अमुक एक पदार्थ आवडत नाही’, असे ईश्‍वरीने ताईला सांगितल्यावर ताई तिला सांगते, ‘‘आवडत नाही’, असे काही नसते. एखादा पदार्थ आपल्याला अधिक आवडू शकतो; मात्र तरी बाकीचे पदार्थ खायचेच असतात.’’

​त्यामुळे ईश्‍वरी २ वर्षांची असतांना ताई पूर्णवेळ साधना करण्यासाठी तिला घेऊन आश्रमात आली. तेव्हा ईश्‍वरीच्या खाण्या-पिण्याविषयी तिला विशेष अडचणी आल्या नाहीत. आश्रमात सर्वांसाठी जो प्रसाद-महाप्रसाद असतो, तोच ईश्‍वरी आवडीने खाते.

कु. सायली डिंगरे

१ ई. ‘आश्रमातून बाहेर पडल्यावर बाहेरचा खाऊ खायचा अयोग्य संस्कार ईश्‍वरीच्या मनावर होऊ नये’, यासाठी तिला बाहेर गेल्यावर खाऊ घेऊन न देणे आणि त्यावरून तिचे लक्ष हटवण्यासाठी तिला अनेक गमती सांगत आश्रमात आणणे : ईश्‍वरीच्या शाळेला नाताळची सुटी असल्याने ताईने काही दिवस तिला खेळायला बाहेर नेले होते. त्यांतील एक दिवस अन्य एक बालसाधिका आणि ईश्‍वरी यांनी बाहेर खाऊही खाल्ला. पुढील वेळी आम्ही तिला खेळायला बाहेर घेऊन गेलो. तेव्हा ईश्‍वरी खाऊ खाण्यासाठी हट्ट करू लागली. तेव्हा ताईने तिला खाऊ घेऊन दिला नाही. खरेतर खाऊ ही अत्यंत छोटी गोष्ट होती. अशा प्रसंगांत मला वाटले, ‘एकुलती एक लेक आहे. ती गुणीही आहे, तर एवढा काय विचार करायचा ?’; म्हणून मी ताईला तिला खाऊ देण्याविषयी सुचवले. तेव्हा ताई म्हणाली, ‘‘परवा आम्ही बाहेर आलो होतो. तेव्हा मजा म्हणून मी तिला आवडीचा खाऊ घेऊन दिला होता. आता आजही खाऊ घेऊन दिला, तर ‘आश्रमातून बाहेर आल्यावर प्रत्येक वेळी बाहेरचा खाऊ खायचा असतो’, असा अयोग्य संस्कार तिच्या मनावर होईल. कधी तरी सहज, कधी कामानिमित्त किंवा खेळण्यासाठीही आपण बाहेर जाऊ शकतो; पण ‘बाहेर पडल्यावर प्रत्येक वेळी बाहेरचे खायलाच पाहिजे’, असे नाही. खाऊचा प्रश्‍न नाही; पण तिच्या मनावर अयोग्य संस्कार होऊ नयेत; म्हणून आज तिला बाहेरचा खाऊ द्यायचा नाही.’’ त्यानंतर ताईने तिला मार्गावरच्या अनेक गमती-जमती सांगत आश्रमात आणले.

१ उ. ईश्‍वरीवर न चिडता, न रागावता समजुतीने सर्व सांगणे’, हे ताईने मोठ्या संयमाने आणि चिकाटीने करणे : ‘ईश्‍वरीला हट्ट करण्याच्या स्थितीतून बाहेर काढून स्वीकारण्याच्या स्थितीत आणणे’, हे फार चिकाटीचे अन् अवघड काम आहे. ‘ईश्‍वरी तिचे बालसुलभ हट्ट करत असतांना तिला न रागावता, तिच्यावर न चिडता, तिच्या स्थितीला जाऊन तिला ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे समजावून सांगणे’, हे फार संयमाचे काम आहे. हे सर्व निवांतपणे नाही, तर त्या चालू स्थितीतच करायचे असते. हे सर्व करण्याच्या तुलनेत त्या वेळी तो खाऊ घेऊन देणे सोपे असते; मात्र ताईने चिकाटीने तिला योग्य दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला.’

२. ‘नवीन पोशाख ओला होऊ नये’, यासाठी तो सांभाळतांना ईश्‍वरीने मावशीवर चिडचिड करणे आणि त्या वेळी ‘इतरांवर चिडचिड करणे अयोग्य आहे, तुझी अशी चिडचिड होणार असेल, तर तुला जुनेच पोशाख घालीन’, असे ताईने तिला सांगणे

‘आश्रमातील भोजनकक्षातील हस्तप्रक्षालन पात्राच्या खाली एकदा थोडे पाणी सांडले होते. त्यामुळे ईश्‍वरी ‘तिने घातलेला नवीन पोशाख ओला होऊ नये’, यासाठी थोडी अधिकच काळजी घेत होती. हात धुतांना तिने माझ्यावर चिडचिड केली. हे ताईला कळल्यानंतर ताईने तिला स्पष्ट सांगितले, ‘‘सर्व साधक तेथे हात धुतात. अशा ठिकाणी गेल्यानंतर पोशाखाला काही प्रमाणात पाणी लागणारच आहे. तू जर अशा कारणांमुळे चिडचिड करणार असलीस, तर यापुढे तुला नेहमी जुनेच पोशाख घालीन. नवीन कधीही घालणार नाही. नवीन पोशाखाची काळजी घेणे योग्य आहे; मात्र त्यासाठी इतरांवर चिडचिड करणे अत्यंत अयोग्य आहे.’’

(क्रमशः सोमवारच्या अंकात)

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२०)


भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426794.html


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.