राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गाजलेल्या पुणे शहराला हे लज्जास्पद !

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

‘गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका प्रशासन  पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ या धर्मविरोधी संकल्पनेनंतर ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या केमिकलमध्ये विसर्जन आरंभले आहे. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम हौद कचरापेट्यांपासून बनवल्याचे उघड झाले. संबंधित कंत्राटदारांना काळ्या सूचीत टाकून पालिकेने हे मान्य केले. आता तर पालिकेने धर्मद्रोहाची परिसीमा गाठत ‘मूर्तीदान’ उपक्रमाच्या अंतर्गत भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची पुनर्विक्री करण्यासाठी अनुमती देत सामाजिक  संस्थांच्या माध्यमातून मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. ‘किती मूर्ती दान मिळाल्या ?’, ‘किती मूर्ती विकल्या ?’, ‘त्यातून मिळालेला पैसा कुठे आणि कोण वापरणार ?’, या सर्व गोष्टी पालिकेच्या आवाहनावर विश्‍वास ठेवून त्यांना विसर्जनासाठी मूर्तीदान करणार्‍या भाविकांपासून का लपवल्या ?, असे अनेक प्रश्‍न यातून उपस्थित झाले आहेत. हा गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ  करणारा, तसेच भाविकांची आणि मूर्तीकारांची घोर फसवणूक करणारा ‘मूर्तीदान घोटाळा’च आहे, असा घणाघात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केला.’