पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील कुंभार घाटालगतची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा बळी गेला होता. या घटनेला दीड मास लोटूनही अद्याप उत्तरदायी दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांना अटक झालेली नसल्याने ‘दोषी अधिकारी अन् ठेकेदार यांना अटक व्हायलाच हवी’, ‘संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा’, अशा घोषणा देत कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला येथे येत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कोळी समाजाने केला. (अशी मागणी करावी लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) शासनाने मृतांच्या वारसदारांना जाहीर केलेल्या मदतीची पूर्तता पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महादेव कोळी समाजाने महर्षि वाल्मीकि संघाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली कुंभार घाटाजवळ दुर्घटना घडलेल्या ठिकाणी घोषणा देत आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.