म्हसवड (जिल्हा सातारा) येथे श्री सिद्धनाथांचे उभ्या नवरात्राचे व्रत चालू

सातारा, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्‍वरी यांच्या शाही विवाहसोहळ्याची धामधूम चालू झाली आहे. दिवाळी पाडवा ते तुळशी विवाह या १२ दिवसांच्या कालावधीत पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उभ्या नवरात्रीचे कडक व्रत चालू झाले आहे.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथील माणगंगेच्या तीरावर १० व्या शतकातील अत्यंत प्राचीन हेमाडपंती मंदिर उभे आहे. तेव्हापासून आजपावेतो अत्यंक कडक व्रते भाविकांकडून विनाखंड आचरली जात आहेत. दिवाळी पाडव्याला पुजारी-सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. नवरात्रीचे १२ दिवस उपवास केले जातात. उपवास करणार्‍यांना प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून कार्तिकस्नान करून नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या काळात उपासकाला धोतर नेसून अंगावर उपरणे घेऊन हातात तांब्याचा कलश आणि त्यात शुद्धोदक घेऊन १२ दिवस ही नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या काळात पायात वहाने घालायची नसतात. गावाची वेस ओलांडायची नसते. प्रदक्षिणेत खंड पडू द्यायचा नाही. १२ अहोरात्र उभे रहायचे. जमिनीशी पायाचा संपर्क तुटू द्यायचा नाही. रात्री झोपतांना आसंदीवर (टेबलवर) पालथे झोपले, तरी एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो. जर झोपेत दोन्ही पाय वर घेतले गेले, तरी नवरात्र मोडले, असे समजले जाते. या १२ दिवसांत जमिनीवर मांडी घालून बसायचे नसते. असे हे कडक व्रत आहे.

२६ नोव्हेंबर यादिवशी (तुळशी विवाह) पहाटे ५.३० वाजता घट उठतात. त्याच दिवशी रात्री १२ वाजता श्रींचा शाही विवाह सोहळा पारंपरिक आणि धार्मिक विधीपूर्वक; परंतु शासकीय नियमानुसार पार पडणार आहे.