१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच समाजात सिद्ध आणि साधक अल्प असले, तरी ते अनेकांना मोक्षमार्गाकडे वळवण्यास समर्थ असणे
‘कलियुगात प्रत्येक मनुष्याला गुरूंमुळेच मोक्षप्राप्ती होऊ शकते; परंतु ‘सिद्धा’ची अवस्था प्राप्त झाल्याविना कुणालाही मोक्ष मिळवता येत नाही. सिद्धाची अवस्था प्राप्त व्हायला मायेचा बंध तोडून टाकावा लागतो. कलियुगात मनुष्य मायेने लिप्त असला, तरी काही जण मुमुक्षू असतात, तर थोडे साधक सिद्ध कोटीस गेलेले असतात. भ्रांती गेली, तरच मुमुक्षतेला आरंभ होतो. हे झाल्यावर मनुष्य सत्त्वगुणसंपन्न आणि परोपकारी होतो. अहंकार गेला की, तो साधक होतो. येथे ‘ते’ (ब्रह्म) आणि ‘मी’ या भेदाची जाणीव असते. जेव्हा ‘ते’ आणि ‘मी’ एकच आहे’, अशी भावना होते, तेव्हा तो सिद्धाची स्थिती गाठतो आणि मोक्षाचा अधिकारी बनतो. परात्पर गुरूंच्या कृपेमुळेच समाजात सिद्ध आणि साधक अल्प असले, तरी ते अनेकांना मोक्षमार्गाकडे वळवण्यास समर्थ आहेत.
२. साधकांना समाजात नीती आणि धर्म यांची बिजे रुजवायची असणे
सध्या घोर कलियुग असल्यामुळे समाजाची स्थिती ढासळली आहे. समाजाला उन्नत करण्याचे साधकांचे नैतिक दायित्व वाढले आहे. त्यांच्यात ही व्यापकता परात्पर गुरूंमुळेच आली आहे. साधकांना समाजात नीती आणि धर्म यांची बिजे रुजवायची आहेत. राज्यसंस्थेत नीतीधर्माचे लोक असल्यास समाजात त्यांची वृद्धी लवकर होईल.
३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेची अपरिहार्यता
३ अ. झपाट्याने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अपरिहार्य असणे : व्यष्टी साधनेमुळे साधकात चैतन्य निर्माण होते. यासाठी चिंतनसारणी प्रामाणिकपणे लिहून स्वतःला घडवणे आवश्यक आहे. एखादा साधक ‘मी’च्या कोशात राहिला, तर अल्पसंतुष्टता येते आणि पुढच्या टप्प्याची प्रगती न होता त्याची गुरूंवरील श्रद्धा ढळू लागते. ही अवस्था येऊ नये; म्हणून साधनेत गुरु सांगतात, त्याप्रमाणे पुढे पुढे जाणे आवश्यक आहे. ही स्थिती लवकर येण्यासाठी आणि झपाट्याने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अपरिहार्य आहे.
३ आ. सहसाधक, कुटुंबीय आणि दायित्व असलेले साधक यांचे साहाय्य घेऊन स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत आणि याच जन्मी स्वतःचा उद्धार करून घ्यावा ! : तरुण पिढीला चिकाटीने काम करण्याचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यांच्यापुढे कुणाचा आदर्श नाही. वयस्कर साधक ‘माझ्यात स्वभावदोष नाहीत. मला माझे स्वभावदोष लक्षात येत नाहीत’, या अपसमजुतीत राहून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करत नाहीत. त्यांचे संस्कार विकोपाला जाऊन ‘माझ्यात स्वभावदोष नाहीतच’, असा भ्रम वयस्करांमध्ये असतो. अशा वेळी निराशा येऊ न देता सातत्याने गुरुतत्त्वाचेे साहाय्य घेऊन ‘माझ्यात स्वभावदोष आहेत आणि त्यांचे मी परीक्षण अन् परिमार्जन (निरसन) करीनच’, ही धारणा ठेवावी. यात सहसाधक, कुटुंबीय आणि दायित्व असलेले साधक यांचे साहाय्य घ्यावे. ‘गुरु मला बळ देत आहेत’, ही श्रद्धा ठेवून अडथळे दूर करावेत आणि ‘याच जन्मी स्वतःचा उद्धार कसा होईल ?’, यासाठी चिंतन करून क्रियमाण वापरावे. यात ‘देवच सर्व करवून घेत आहे’, असा भाव असावा.
३ इ. ‘चूक दुसर्यावर ढकलणे’, म्हणजे बहिर्मुखता आणि ‘स्वतः कुठे उणे पडलो ?’, हा विचार म्हणजे अंतर्मुखता असणे : ‘कोणत्याही चुकीमध्ये स्वतःचा सहभाग अत्यल्प होता’, हा विचार घातक आहे. स्वतःच्या चुका लक्षपूर्वक ऐकणे, त्या स्वीकारणे आणि मूळ स्वभावदोष शोधून त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘चूक दुसर्यावर ढकलणे’, म्हणजे बहिर्मुखता आहे आणि ‘स्वतः कुठे उणे पडलो ?’, हा विचार अंतर्मुखतेकडे नेणारा आहे.
३ ई. चुकांचे समर्थन करू नये ! : ‘चूक मान्य असते; पण सांगणारा आवडत नाही. सांगण्याची पद्धत आवडली नाही’, याच विचारात साधक वावरत असतो; पण ‘प्रत्यक्ष गुरु आपल्याला साहाय्य करण्यासाठी आले आहेत’, हा योग्य विचार तो करत नाही. अशा वेळी ‘मी तन, मन आणि धन सोडून साधना करतो’, हे वरवरचे असतेे’, हे समजून घेऊन त्यामुळे निराश न होता त्वरित उपाययोजना करावी.
४. स्वतः आचरण करून इतरांना उपदेश करावा !
‘मी समाजात जाऊन केवळ शाब्दिक उपदेश करणार नाही. मी स्वतः आचरण करून उपदेश करतो’, यामध्ये ‘आधी केले, मग सांगितले’, असे होऊन आपल्या कृतीस पूर्तता येते. येथे १०० टक्के आज्ञापालन होते.
५. साधनेत कूपमंडूक स्थिती नको, तर व्यापकत्व हवे !
हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी ‘स्वतःची आध्यात्मिक उन्नती करणे’, ही पहिली पायरी आहे. त्यासाठी साधनेत कूपमंडूक स्थिती टाळता आली पाहिजे. यासाठी ‘माझे व्यवस्थित चालले आहे किंवा एवढीच (अल्प) साधना पुरेशी आहे’, असा विचार न करता ‘मी थोडा व्यापक होऊन गुरूंच्या आज्ञेची फलनिष्पत्ती वाढवू शकतो का ?’ हे पहाणे’, म्हणजे गुर्वाज्ञापालन करणे.
६. ‘शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास आहे’, हे कारण पुढे करून कुणीच साधनेत प्रगती करू शकत नाही. हे कारण अयोग्यच आहे. ‘आहे त्या स्थितीत राहून साधना करणे’, हेच योग्य आहे.
७. मी माझ्या मनानेच ठरवून अयोग्य कृती करत गेलो, तर तो अविचार असतो. त्यावर पुन्हा गुरूंना शरण जाऊन साधनेतील अडथळे दूर करावेत आणि परिपूर्ण साधना करावी.
साधनेसी आलो, परि मतात (मनात) अडकलो ।
अयोग्याची धारणा केली, तेथे अविचार बळावला ॥
माझे मीच ठरवले, तेथे घोटाळा झाला ।
आता पुन्हा गुरुस शरण जाणे, पुन्हा साकार होणे ॥
साधनेत अल्पसंतुष्टता आणि हतबलता चालत नाही. गुरुच कुणाच्या तरी माध्यमातून सांगत असतात. आपण व्यापक होऊन गुरूंचे साहाय्य घेऊनच पुढे जाऊ शकतो. सद्य:स्थिती आपण जाणतो. ‘आता वेळ अल्प आहे’, हेही आपल्याला ज्ञात आहे. समाजाला साधकांची आवश्यकता आहे आणि गुरूंना साधकांच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करावयाचा आहे.
श्री गुरूंनीच हे विचार माझ्या मनात घातले’, यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’
– प्राण्यांचे आधुनिक वैद्य अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२०)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |