पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजमन घडत असते. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार्या बातम्या या काही वेळा प्रबोधनासाठी आणि माहितीसाठी देण्यात येतात, तर काही बातम्यांतून भ्रष्टाचार उघडकीस आणला जातो. बातम्यांच्या वार्तांकनाच्या पद्धतीतून त्या वृत्तपत्राची पत ठरते. सध्या मात्र वार्तांकनात मनोरंजनाचा आणि दिशाहीनतेचा भाग अधिक वाढला आहे. मनोरंजनात्मक बातम्यांचा वाचकांना अन्य कोणताही लाभ होत नाही. अशा बातम्या वाचण्यात वाचकांचा पुष्कळ वेळ मात्र वाया जातो. मागील मासामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने पटांगणावर सामना खेळत असतांना त्याची गर्भवती पत्नी अनुष्का शर्माला ‘जेवण केले का ?’, असे खुणावून विचारले. या प्रसंगाचा ‘व्हिडिओ’ एक चर्चेचा विषय झाला. ही घटना बातमी होण्यासारखी मुळीच नव्हती, तसेच या बातमीतून वाचकांना कसलाही लाभ किंवा दिशादर्शनही होत नाही. यातून लक्षात येते की, एकूणच पत्रकारितेचा दर्जा खालावत आहे.
याचसमवेत सध्या कोणत्या अभिनेत्रीने किती रुपयांचा पोशाख घातला ?, अभिनेता-अभिनेत्री कोणत्या ठिकाणी फिरायला गेले ?, अशी वृत्ते प्रसारित होत असून त्यातून समाजाने काही आदर्श घ्यावा, असे काहीच नसते. खरेतर अभिनेता-अभिनेत्री देशाला कितपत दिशा देऊ शकतात, हे त्यांच्या झालेल्या अमली पदार्थांच्या अन्वेषणामुळेे समोर आलेलेच आहे. अशांच्या बातम्या वाचून देशाचा विकास होणार आहे का ? सध्या सर्वांसमोर कोरोनाचे मोठे संकट आहे. जग आता तिसर्या महायुद्धाच्या दिशेने वेगाने चालले आहे. महिलांवर प्रतिदिन अत्याचार वाढत आहेत. अशी अनेक संकटे देशासमोर उभी आहेत. या संकटकालीन स्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी किंवा त्यावरील उपाय याविषयी वृत्तपत्र दिशादर्शन करतांना दिसत नाहीत. काळानुसार समाजाला दिशा देणारी पत्रकारिता लुप्त होत आहे. धर्मांधांची आक्रमणे, देशांतर्गत युद्ध, महिलांवरील अत्याचार यांविरुद्ध मोहीम राबवणे आवश्यक असतांना सध्याची पत्रकारिता जनतेला दिशाहीन करत आहे. देश पारतंत्र्यात असतांना नागरिकांना योग्य दिशा देणार्या लोकमान्य टिळकांची पत्रकारिता अभ्यासल्यास वृत्तपत्रांना पत्रकारिता कशी असावी, हे निश्चित लक्षात येईल.
– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर