सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांचे साधनेविषयी मौलिक मार्गदर्शन !

कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (२१.११.२०२०) या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

कै. (सद्गुरु) डॉ. वसंत आठवले

‘मी’पण नष्ट होणार असल्याने भगवंताशी एकरूप होण्याचे भय वाटणे

‘स्वतःचे ‘मी’पण नाहीसे करणे सर्वांत कठीण असते. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत लिहिले आहे, ‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून मी भगवंताचा पत्ता ठाऊक असूनही ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणी भगवंताचा शोध घेत भटकत असतो.’

– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

भक्त भगवान होतो कि दोघे विभक्तच रहातात ?

‘भक्ती हा अहंकार तोडण्याचा विधी, अभ्यास आहे; परंतु भक्तीमार्गांत द्वैत ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे ‘भक्त नेहमी परमेश्‍वराच्या पायाशीच शरण असला पाहिजे’, असे सांगतात. याचे कारण अज्ञानी भक्ताला सांगितले की, तू भगवानच आहेस, तर त्याचा अहंकार वाढेल. प्रत्यक्षात मात्र भक्त भगवान होतो. भक्त असतांना तो अव्यक्त भगवानच असतो; परंतु भक्ताला ‘तू भगवान होऊच शकत नाहीस’, अशी खात्री पटली, तर तो तशा श्रद्धेमुळे भगवंताच्या पायाशीच अडकून पडेल, म्हणजे तो सलोक मुक्तीपर्यंतच पोचेल.’

– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)