पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालाच्या आधारे १० नोव्हेंबरपासून प्रवेशबंदीत वाढ केली आहे.
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी प्रवेशबंदी आदेशात म्हणतात, ‘‘पोलीस अहवालानुसार प्रमोद मुतालिक यांच्या धार्मिक स्तरावरील भाषणामुळे विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. गोव्यात धार्मिक सलोखा, शांती आणि सुरक्षा टिकून रहाणे आवश्यक आहे. ‘सी.आर्.पी.सी.’चे कलम १४४ अंतर्गत श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गोवा प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. श्री. प्रमोद मुतालिक यांच्या भाषणामुळे एखाद्या गटाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.’’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी लागू आहे.