काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम राष्ट्रीय शक्ती करतील ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

देवेंद्र फडणवीस

मुंबई – काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रविघातक शक्तींसमवेतच्या युतीत काँग्रेस सहभागी होत आहे. ‘आम्ही विघटनवाद्यांना समवेत घेऊन चर्चा करू’, ‘काश्मीर पाकमध्ये गेले पाहिजे’ अशी मागणी करणार्‍यांसमवेत काँग्रेस उभी आहे. ‘पाकसारख्या शक्तींसमवेत काश्मीरचा लढा लढू’, असे ज्यांचे ध्येय आहे, त्या विघातक तत्त्वांसमवेत काँग्रेस जात आहे. याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल. त्यामुळे आम्ही काँग्रेसला प्रतिदिन प्रश्‍न विचारू आणि त्यांना उत्तर द्यावे लागेल. काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम राष्ट्रीय शक्ती करतील, असे आव्हानात्मक प्रतिपादन भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘पिपल्स अलायन्स गुपकर डिक्लरेशन’ या नावाखाली पीडीपी, पिपल्स कॉन्फरन्स, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम्, पॅन्थर्स पार्टी, अवामी नॅशनल कॉन्फरन्स, यांच्यासमवेत काँग्रेसने युती केली आहे. याचा अर्थ त्यांचा देशविरोधी ‘अजेंडा’ काँग्रेसला मान्य आहे का ? त्याला त्यांचे समर्थन आहे का ? ‘चीनच्या साहाय्याने ३७० कलम पुन्हा लागू करण्याचे’ ज्यांचे ध्येय आहे ते फारूख अब्दुल्ला आणि ‘काश्मीरचा झेंडा नसेल, तर राष्ट्रीय झेंडा लावू देणार नाही’, असे बोलणार्‍या महेबुबा मुफ्ती यांच्यासमवेत काँग्रेस युती करत आहे. देशाचे ज्येष्ठ नेते असे या देशात बोलू शकतात, यापेक्षा संतापजनक दुसरे काय आहे ? ३७० कलमामुळे आज भारतीय काश्मीरमध्ये निवास करू शकतो. प्रचंड मोठी पायाभूत बांधकामे तिथे होत आहेत; परंतु भारतविरोधी शक्ती विविध राजकीय पक्षांशी हात मिळवणी करून पुन्हा एकदा तिथे ‘कलम ३७० लागू करू’, असा प्रसार करत आहेत. जगातील कोणतीही ताकद ते करू शकत नाही. काही झाले तरी या देशात ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही आणि देशाची जनता त्यांना क्षमा करणार नाही.’’