सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सहवासात त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘२८ ते ३०.६.२०१९ या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुणे येथे वास्तव्याला होते. तेव्हा मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथेे दिल्या आहेत.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
श्री. शशांक सोनवणे

१. २८.६.२०१९ या दिवशी

१ अ. सायंकाळी मी सद्गुरु पिंगळेकाकांना भेटलो. त्या वेळी मला त्यांच्या खोलीत सुगंध आला.

१ आ. सद्गुरु पिंगळेकाकांच्या पायांवर बिंदूदाबन करतांना ‘त्यांच्या चरणांतून सुगंध येत आहेे’, असे जाणवणे : सद्गुरु पिंगळेकाकांना शारीरिक त्रास असल्याने त्यांच्या हाता-पायावर बिंदूदाबन करण्याची आवश्यकता असते. त्यांनी मला विचारले, ‘‘तुला हाता-पायांवरील बिंदूंविषयी ठाऊक आहेत का ?’’ तेव्हा ‘गुरुदेवांनी दिलेल्या ज्ञानाचा आवश्यक असा लाभ मी करून घेतला नाही’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर सद्गुरु पिंगळेकाकांनी मला ‘तू बिंदूदाबन करू शकतोस’, असे सांगितले. त्यांच्या पायांवर बिंदूदाबन करतांना मला ‘त्यांच्या चरणांतून सुगंध येत आहे’, असे मला जाणवले.

१ इ. सद्गुरु पिंगळेकाकांची सहजता आणि प्रीती : सद्गुरु पिंगळेकाकांचे जेवण माझ्या आधी झाल्याने मी त्यांना सांगितले, ‘‘मला थोडा वेळ लागेल.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू निवांत तुझ्या पद्धतीने जेवू शकतोस.’’ मी सद्गुरु पिंगळेकाकांंना सांगितले, ‘‘तुमचे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील भाषण चालू असतांना गुरुदेवांनी केलेले निरीक्षण आणि तुमच्या तोंडवळ्यावरील भाव’ याविषयी ध्वनीचित्र-चकती पहायला मिळाली. तेव्हा आम्हालाही पुष्कळ शिकायला मिळाले.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी माझ्या तोंडवळ्यावरील वेगवेगळे भाव लक्षात आणून दिल्यावर मलाही ‘असे काही असते’, हे समजले.’’

२. २९.६.२०१९ या दिवशी

२ अ. एरव्ही सकाळी उठतांना जडपणा जाणवणे; मात्र रात्री सद्गुरु पिंगळेकाकांंच्या शेजारी झोपून दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर चैतन्य जाणवणे : त्या रात्री मी सद्गुरु पिंगळेकाकांंच्या शेजारी झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मला पुष्कळ चैतन्य मिळाल्याचे जाणवले. (एरव्ही मला सकाळी उठतांना जडपणा जाणवतो.) तेव्हा संतांतील चैतन्याची मला प्रचीती आली. माझी अंंघोळ झालेली नसतांनाही मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते आणि आनंद जाणवत होता.

२ आ. इतरांचा विचार करणे : सद्गुरु पिंगळेकाका सकाळी सेवेला निघायच्या वेळेच्या पाच मिनिटे आधीच सिद्ध झाले. त्यांना घ्यायला येणार्‍या साधकांना विलंब झाल्यानंतर ते म्हणाले, ‘‘असू देत. पावसामुळे पुढे-मागे होऊ शकते.’’ तेव्हा मला त्यांच्यातील ‘इतरांचा विचार करणे आणि साधकांवरील प्रेम’, या गुणांचे दर्शन घडले.

२ इ. साधक दुपारी ताटातील अधिक झालेली पोळी परत करतांना सद्गुरु पिंगळेकाकांनी साधकाची त्यामागची विचारप्रक्रिया सूक्ष्मातून जाणणे : दुपारी ताटातील अधिक झालेली पोळी परत ठेवत असल्याचे पाहून सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले ‘‘शशांकला झोप लागेल आणि झोप लागल्यावर सद्गुरु पिंगळेकाकांना काय वाटेल ?’, असा त्याने विचार केला; म्हणून तो पोळी परत करत आहे.’’ तेव्हा ‘संत सूक्ष्मातील कसे जाणतात !’, हे माझ्या लक्षात आले. प्रत्यक्षात ‘नंतर शिबिरामध्ये मला झोप लागल्यावर ‘सद्गुरु पिंगळेकाकांना काय वाटेल ?’, असाच माझा विचार होता.

२ ई. साधकाला त्याच्यातील ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूची जाणीव होणे : संध्याकाळी सद्गुरु पिंगळेकाका परत आल्यावर त्यांनी मला त्यांच्या हाता-पायांवर बिंदूदाबन करायला सांगितले. मी त्यांच्यावर बिंदूदाबन करतांना काही वेळानंतर मला ग्लानी येत होती. तेव्हा मी सद्गुरु पिंगळेकाकांशी मोकळेपणाने बोललो नाही. नंतर त्यांनीच मला प्रेमाने विचारले, ‘‘आज दमलास का ?’’ तेव्हा माझ्यातील ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूची मला जाणीव झाली.

३. सद्गुरु पिंगळेकाकांनी शिबिरस्थळाहून निघतांना साधकांना अत्यंत भावपूर्ण नमस्कार करणे आणि ते पाहून पुष्कळ भावजागृती होणे​

शिबिर संपल्यानंतर एक साधक चारचाकीने सद्गुरु पिंगळेकाकांना नियोजित ठिकाणी पोचवणार होता. तो साधक शिबिर संपण्याआधीच शिबिरस्थळी आला. ‘शिबिराचा कालावधी वाढणार आहे’, हे कळताच सद्गुरु पिंगळेकाकांनी विचारले, ‘‘त्या साधकाला विलंब झाला, तर त्याला काही अडचण येणार नाही ना ? तसे असेल, तर आपण त्वरित निघूया.’’ ‘ते इतरांचा किती विचार करतात !’, हे माझ्या प्रकर्षाने लक्षात आले.

​सद्गुरु पिंगळेकाकांनी निघतांना आम्हा साधकांना अत्यंत भावपूर्ण नमस्कार केला. हे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. गुरुदेवांनी आम्हा साधकांना अनेक संत उपलब्ध करून दिले. त्यांचा सत्संग दिला. त्याविषयी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. शशांक सोनवणे, पुणे (४.७.२०१९)


सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ हातात घेतल्यावर ‘स्वतःतील स्वभावदोष कठोर प्रयत्न करून दूर करायला हवेत’, या विचाराची तीव्रता वाढणे आणि ‘त्या माळेत पुष्कळ चैतन्य आहे’, असे जाणवणे​

‘२८ ते ३०.६.२०१९ या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुणे येथे वास्तव्याला होते. त्यांच्या गळ्यात तुळजापूर येथील भवानीमातेच्या मंदिरातील कवड्यांची माळ आहे. एकदा त्यांनी त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ माझ्या हातात देऊन ‘माळ हातात घेतल्यावर काय वाटते ?’, असे मला विचारले. मी माळ हातात घेतल्यानंतर माझ्या मनात अकस्मात् संघर्ष करण्याचे विचार वाढले. ‘माझ्यात जे स्वभावदोष आहेत, ते कठोर प्रयत्न करून घालवायलाच हवेत’, या विचाराची तीव्रता वाढली. ती माळ हातात घेतल्यानंतर मला एक वेगळ्या प्रकारचा नाद ऐकू आला. ‘त्या माळेत पुष्कळ चैतन्य आहे आणि त्यातून मला शक्ती मिळत आहे’, असेही जाणवले. परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या कृपेने मला ही अनुभूती घेता आली, त्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. ज्योती दाते, पुणे (७.७.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक