सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या सहज बोलण्यातून उलगडलेली साधनेची अनमोल सूत्रे !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुष्कळ दिवसांनी आश्रमात आल्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा होणे आणि ते पू. सौरभ जोशी यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्यावर त्यांची भेट होणे

​‘२२.५.२०१९ या दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे मला भोजनकक्षात दिसले. ते पुष्कळ दिवसांनी रामनाथी आश्रमात आले होते. त्यामुळे अनेक साधक त्यांना भेटून त्यांच्याशी बोलत होते. मलाही ‘त्यांच्याशी बोलावे’, असे वाटत होते, तरी मी तसे केले नाही. मी दुपारी नामजप करण्यासाठी पू. सौरभदादा (विकलांगावस्थेतील संत पू. सौरभ जोशी) यांच्या खोलीत गेले. काही वेळानंतर सद्गुरु पिंगळेकाका पू. सौरभदादांचे दर्शन घेण्यासाठी तेथे आले आणि मला त्यांचा सत्संग मिळाला. सद्गुरु पिंगळेकाका पू. सौरभदादांशी बोलत असतांना पू. सौरभदादा त्यांना हसून प्रतिसाद देत होते.

पू. सौरभदादांशी शरणागतभावाने नमस्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. पू. सौरभ जोशी यांच्या भेटीच्या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली अनमोल सूत्रे

सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितले,

२ अ. साधकांनी ठेवायचा भाव, ‘ईश्‍वर म्हणजे रेल्वे स्थानक आहे आणि त्याच्यासाठी सर्व जण समान आहेत !’

सौ. आरती भानु पुराणिक

२ अ १. साधकांनी ‘मी आगगाडीच्या शेवटच्या डब्यात बसलो आहे’, असा विचार करायला नको ! : ‘‘अन्य साधकांची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे समजल्यावर काही साधक भाव ठेवतात, ‘मी आगगाडीच्या शेवटच्या डब्यात बसलो आहे. माझा डबा शेवटचा असल्यामुळे रेल्वे स्थानकावर डबा उशिरा येणार.’ साधकांनी असा भाव ठेवणे अयोग्य आहे. रेल्वे स्थानकावर प्रथम वातानुकुलीत (ए.सी.) डबे येतात आणि जनरल डबे शेवटी येतात. मधले डबे ‘स्लीपर’चे असल्यामुळे त्या डब्यातील प्रवासी पटकन उतरून लवकर स्थानकाच्या बाहेर जातात. ईश्‍वर म्हणजे रेल्वे स्थानक आहे. त्याच्यासाठी सर्व जण समान आहेत. आपण स्वतःला प्रवासी समजायचे. प्रवासी म्हटले की, कुठेतरी उतरावेच लागणार. मागचा-पुढचा डबा असा विचारच करायला नको.

२ अ २. गुरु आपल्या समवेत असल्याने आपल्याला ताण घेण्याची आवश्यकता नाही ! : ही हिंदु राष्ट्राची आगगाडी चालली आहे. आपण त्या गाडीत सर्व कर्मचारीच (ऑन ड्युटी स्टाफ) आहोत. त्यामुळे आपल्याला त्या गाडीत कोणत्याही डब्यात चढण्याची अनुमती आहे, तसेच कोणत्याही स्थानकावर उतरण्याची अनुमती आहे. तेव्हा आपल्याला तिकिटाची आवश्यकता नसेल; परंतु आता रेल्वेच्या प्रवाशाला त्याने घेतलेल्या तिकिटानुसार त्या त्या डब्यात जावे लागते. त्याने जनरल डब्यात बसण्याचे तिकीट काढले असेल, तर त्याला वातानुकुलीत (ए.सी.) डब्यात प्रवेश मिळणार नाही. त्याने काढलेले तिकीट ‘आर्,ए.सी’. असेल, तर तिकीट ‘कन्फर्म’ होईपर्यंत त्याला ताण असतो. त्याचे उतरायचे ठिकाण आल्यावर त्याला उतरावेच लागेल. ती आगगाडी शेवटच्या स्थानकाला पोचली की, पुन्हा ती मूळ ठिकाणी जायला निघते. त्या प्रवाशाला पुन्हा त्या आगगाडीतून जायचे असेल, तर त्याला पुन्हा तिकीट काढावे लागते. आपले तसे नाही; कारण गुरूंचे (ईश्‍वरी राज्य स्थापनेचे) कार्य जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत आपल्याला त्यांच्या समवेत प्रवास करायचा आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही ताण घेण्याची आवश्यकता नाही.

२ आ. साधकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्याचे ध्येय ठेवल्यावर त्यांची आध्यात्मिक उन्नती न झाल्यास त्यांनी आध्यात्मिक उन्नती झालेल्या अन्य साधकांच्या आनंदात सहभागी व्हावे ! : काही साधक गुरुपौर्णिमेनिमित्त स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्याचे ध्येय ठेवतात आणि त्याप्रमाणे प्रयत्न करतात. अन्य साधकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाल्यावर त्यांना थोडी निराशा येते. तेव्हा एका साधकाने असा भाव ठेवला,
‘४ साधकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाली, म्हणजे रांग तेवढी पुढे सरकली आणि आपण ४ पावले पुढे आलो.’
​खरेतर साधकांनी असा भाव ठेवायला हवा, ‘जेव्हा माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के व्हावी’, अशी मला ओढ लागेल, तेव्हा मी देवाला प्रार्थना करीन, ‘देवा, मला प्रगतीची तळमळ लागू दे; पण माझ्याआधी दुसर्‍या साधकाची प्रगती झाली, तर मला त्याच्या आनंदात आनंद घेता येऊ दे; कारण तो साधक एकटाच आहे. तो कुटुंबापासून दूर आहे. काही साधकांना त्यांच्या घरातून विरोध आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांची तळमळ अधिक आहे. अशा साधकांची प्रगती लवकर होऊन ते पुढे जाणे महत्त्वाचे आहे’ आणि त्यांची प्रगती झालेली देवाला आवडेल.

२ इ. ‘देवाची लीला कुणीही जाणू शकत नाही’, या संदर्भातील रामायणातील एक कथा

२ इ १. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला जवळ केले’, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे !

​एकदा मी एक लेख वाचला होता. श्रीरामाचा राज्याभिषेक करण्याचे निश्‍चित झाल्यावर दशरथ राजाला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा वसिष्ठ ऋषि गडबडीने कैकयीकडे गेले आणि त्यांच्यात पुढील संभाषण झाले.

वसिष्ठ ऋषि : कैकयी, राम गादीवर बसले, तर पुढची १४ वर्षे आपसांतील लढायांमुळे वंशनाश होणार आहे. गादीवर कुणीही देहधारी बसला, तरी वंशाचा नाश होणारच आहे. तुला सूर्यवंशाचा नाश झालेला चालेल का ?

कैकयी : नाही.

वसिष्ठ ऋषि : मग तू दशरथ राजाकडे जा आणि २ वर माग. ‘रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवा’, असा पहिला वर माग.

कैकयी : माझे रामावर पुष्कळ प्रेम आहे. मी त्याला वनवासाला कसे पाठवू ? ते पुष्कळ कठीण आहे.

वसिष्ठ ऋषि : ‘माझा पुत्र भरताला गादीवर बसवा’, असा तू दुसरा वर माग.

कैकयी : माझ्यापेक्षा भरताचे रामावर अधिक प्रेम आहे. त्यामुळे तो गादीवर बसणारच नाही.

वसिष्ठ ऋषि : म्हणूनच तू हा वर माग, म्हणजे गादीवर कुणीही बसणार नाही. त्या वेळी आपण सिंहासनावर १४ वर्षे पादुका ठेवूया आणि वंशाला वाचवूया.
​तेव्हा कैकयी वर मागायला सिद्ध झाली. तिने ‘रामाला १४ वर्षे वनवासात पाठवा आणि भरताला गादी द्या’, असे वर मागितले. कैकयीने असा वर मागून होणारा वंशाचा नाश थांबवला; पण जगाचा रोष ओढवून घेतला. पुढे रामाने सर्वांत प्रथम कैकयीचा उद्धार केला.

​भगवंताची लीला समजणे कठीण आहे. ‘आपली आध्यात्मिक उन्नती झाली’, हे कळण्यापेक्षा परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला जवळ केले’, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे.

२ ई. जे प्रगतीसाठी थांबले आहेत, ते खरे श्रद्धावान ! : मला एकदा कुणीतरी म्हणाले, ‘‘तुमची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर किती श्रद्धा आहे ना ! तुमची एवढी प्रगती झाली.’’ तेव्हा मला वाटले, ‘माझ्या समवेत किंवा मी साधनेत येण्यापूर्वी जे साधनेत आले आणि ज्यांची अजूनही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झालेली नाही, तरीही त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा आहे. ते आश्रमात किंवा प्रसारात आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांची श्रद्धा अधिक आहे; कारण ‘त्यांनी ६१ टक्के, संतपद, सद्गुरुपद म्हणजे काय ?’, ते अनुभवलेले नाही. माझी प्रगती झाली. त्यामुळे माझी श्रद्धा टिकून रहाण्यास मी अनुकूल झालो. माझ्या श्रद्धेची परीक्षा होत नाही; मात्र ज्यांची प्रगती झाली नाही, तरी ते परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा ठेवून सेवा करत आहेत. मला संदर्भ द्यायचा असेल, तर मी त्यांच्या श्रद्धेविषयी सांगीन. जे प्रगतीसाठी थांबले आहेत, ते खरे श्रद्धावान !’

३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

३ अ. परात्पर गुरु डॉक्टर जेथून जातात, त्या लाद्या म्हणजे मी आहे. त्यांनी घातलेल्या पादत्राणांतील धूळ मी आहे. ते जेथे जातात, साधक जेथे सेवा करतात, तेथे मी आहे ! : ‘माझ्या मनात प्रारंभी रामनाथी आश्रमाविषयी द्वैत असायचे. मी प्रसारकार्यासाठी आश्रमातून निघालो, तरी माझी पुन्हा आश्रमात येण्याची इच्छा असायची. मी आश्रमात येण्याविषयी विचारायचो. तेव्हा ‘नको’, असे उत्तर यायचे. असे २  ३ वर्षे झाले. नंतर मी ठरवले, ‘मी रामनाथी आश्रमाच्या परिसरात येण्यापेक्षा मी रामनाथी आश्रमाचा परिसर समवेत घेऊन जात आहे’, असा भाव ठेवूया.’ ‘मी असेन, तेथून ३ फूट पुढे रामनाथी आश्रमाचा परिसर आहे. मी आश्रमातच आहे’, असा माझा भाव असायचा. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्याच कृपेने माझ्या मनातील हे द्वैत माझ्या लक्षात आले. नंतर मी भाव ठेवला, ‘मी सगळ्या ठायी आहे. परात्पर गुरु डॉक्टर जेथून जातात, त्या लाद्या म्हणजे मी आहे. त्यांनी घातलेल्या पादत्राणांतील धूळ मी आहे. ते जेथे जातात, साधक जेथे सेवा करतात, तेथे मी आहे इत्यादी.’

३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण झाल्यावर ‘ते ज्या आसंदीवर बसले आहेत, ती आसंदी मी आहे’, असा भाव ठेवल्यावर सगुणातील त्यांच्या स्पर्शाचा आनंद मिळणे : स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ ! आपण जसा भाव ठेवून प्रयत्न करतो, तशी अनुभूती आपल्याला येते. मी पूर्वी स्नान करतांना ‘ते पाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे चरणतीर्थ आहे’, असा भाव ठेवल्यामुळे काही वेळा मी ते तीर्थ प्राशन करून मग स्नान करत होतो. मी ‘माझी ती कृती योग्य कि अयोग्य’, याचाही विचार केला नाही. त्यानंतर अनुमाने १ वर्षानंतर मला स्नानासाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे चरणतीर्थ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका बाटलीत भरून पाठवले. मला ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे चरणतीर्थ मिळावे’, अशी माझी अपेक्षा नव्हती आणि मी तसा भाव ठेवला नव्हता. भावाच्या कृती ठरवून होत नाहीत, तर त्या आपोआप होतात. मला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण झाल्यावर ‘ते ज्या आसंदीवर बसले आहेत, ती आसंदी मी आहे’, असा भाव ठेवतो. तेव्हा मला सगुणातील त्यांच्या स्पर्शाचा आनंद मिळतो.’’

– सौ. आरती भानु पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक