पू. दीक्षितआजोबा यांच्या देहत्यागाची स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना आणि पू. वामन यांनी ‘पू. आजोबा नारायणाकडे (परात्पर गुरु डॉक्टरांकडे) गेले’, असे सांगणे

८.८.२०२० ला सनातनचे ८७ वे संत पू. नीलकंठ दीक्षितआजोबा यांचा देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

पू. डॉ. नीलकंठ दीक्षित

१. पहाटे पडलेल्या स्वप्नात काही साधक एखाद्या संतांच्या देहत्यागानंतरची सिद्धता करतांना दिसणे

‘२७.७.२०२० या दिवशी पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘एका ठिकाणी पुष्कळ साधक एकत्रित झाले आहेत. त्या ठिकाणचे वातावरण एखाद्या ‘सत्संग सोहळ्याप्रमाणे’ आहे. त्या वातावरणात चैतन्य आहे. काही साधक नामजप आणि प्रार्थना करत आहेत. काही साधकांनी कसली तरी सेवा चालू केली होती. तेथे फुलांच्या माळा आणि उदबत्ती  लावली आहे. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘हा कोणता सोहळा चालू आहे ?’ त्याच वेळी ‘एका बाजूला काही साधक अंत्यविधीची सिद्धता करत आहेत. साधक सर्व सिद्धता भावपूर्ण करत आहेत’, असे मला दिसले. ते पाहून माझ्या मनात प्रश्न आला, ‘ही कुणाच्या अंत्यविधीची सिद्धता चालू आहे ?’ हे पाहून मला भीती वाटली नाही किंवा अस्वस्थ वाटले नाही. ते साधकही शांतपणे सर्व सेवा करत होते. अंत्यविधीचे दृश्य असूनही मनाला चांगले वाटत होते. यावरून मला वाटले, ‘ते एखाद्या उन्नतांच्या अंत्यविधीची सिद्धता करत आहेत.’ नंतर काही वेळात मला जाग आली. मी उठल्यावर काही वेळाने स्वप्न विसरून गेले.

२. रात्री पू. दीक्षितआजोबा यांनी देहत्याग केल्याचे समजल्यावर पहाटे पडलेल्या स्वप्नाचे स्मरण होणे

नंतर रात्री उशिरा साधारण ११.३० ते १२ वाजण्याच्या कालावधीत मला श्री. अनिरुद्ध यांनी बेळगाव येथील पू. दीक्षितआजोबा यांनी काही वेळापूर्वी देहत्याग केल्याचे सांगितले. तेव्हा अकस्मात् मला पहाटे पडलेल्या स्वप्नाचे स्मरण झाले. त्या वेळी लक्षात आले, ‘स्वप्नात ज्या उन्नतांच्या अंत्यविधीची सिद्धता दिसली, ते पू. दीक्षितआजोबांच्या संदर्भात होते; म्हणूनच या स्वप्नात ‘भाव आणि चैतन्य’ जाणवत होते.’

पू. वामन राजंदेकर

३. पू. वामन यांनी पू. दीक्षितआजोबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे गेल्याचे सांगणे

पू. दीक्षितआजोबा (बेळगाव) यांनी देहत्याग केल्याचे मला समजले, त्या वेळी पू. वामन जागेच होते. ते माझे आणि श्री. अनिरुद्ध यांचे याविषयीचे सर्व बोलणे एकाग्रतेने ऐकत होते. नंतर काही वेळाने अनिरुद्ध एका सेवेसंदर्भात श्री. सत्यकामदादा यांच्याशी बोलायला खाली गेले. पू. वामन यांना श्री. सत्यकामदादा आवडतात. ते त्यांची सतत ‘काका, काका’ असे म्हणून आठवण काढत असतात.

श्री. अनिरुद्ध दादांच्या खोलीत खाली गेल्यावर मी पू. वामन यांना झोपवू लागले. तेव्हा पू. वामन आणि माझ्यात पुढील संवाद झाला.

पू. वामन : आई, आई. काका, काका ? (त्यांनी प्रश्नार्थक लयीत विचारले.)

मी : काका खोलीत आहे. त्याला उद्या गावाला जायचे आहे ना !

पू. वामन : बाबा, बाबा. (परत) काका, काका ?

मी : हो, बाबा काकाकडे सेवेचे बोलायला गेले आहेत.

पू. वामन : काका, काका, आजी.

मी : हो. पू. दीक्षितआजोबांनी देहत्याग केला आहे ना; म्हणून उद्या सकाळी ते दोघेजण जाणार आहेत.

पू. वामन : हं, हं. त्यांनी हात पंखासारखे हलवून दाखवले. (म्हणजे मी सांगायचे, कोणासारखे. (पक्षाप्रमाणे)

मी : हो. ‘वामन, पू. आजोबा कुठे गेले ?’

असे विचारल्यावर पू. वामन यांनी ‘ग’ ‘ग’ गेलेत’, असे सांगितले. (‘ग’ ‘ग’ म्हणजे देवबाप्पा)

पू. वामन : हं, हं. (मान हलवून ‘बरोबर’, असे म्हणाले.)

पू. वामन : आबा, आबा, नारायण, नारायण.

पू. वामन पू. दीक्षितआजोबांना आबा आणि परात्पर गुरु डॉक्टरांना ‘नारायण’, असे म्हणतात. याचा अर्थ ‘पू. दीक्षितआजोबा नारायणाकडे गेले’, असे त्यांना सांगायचे होते. नंतर पू. वामन यांनी झोपण्यापूर्वी हात जोडून नमस्कार केला.’

पू. दीक्षितआजोबा यांना मागील वर्षी आम्ही भेटलो होतो. ते आठवून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. मानसी राजंदेकर, सनातन आश्रम. रामनाथी, गोवा. (२७.७.२०२०)

———⇔———

बेळगाव येथील पू. नीलकंठ दीक्षित यांच्या देहत्यागाच्या १५ दिवस आधीपासून त्यांची कन्या सौ. अंजली कणगलेकर यांनी अनुभवलेला घटनाक्रम आणि त्यांना जाणवलेली सूत्रे
वरील लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/388631.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक