कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधींनी अखंड सावध रहाणेच आवश्यक !

वैभव नाईक

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित आहे; मात्र शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच खळबळ उडाली. कोरोना महामारीच्या काळात विविध ठिकाणी भेटी देणार्‍या लोकप्रतिनिधींसमवेत कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो, तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असतात. या पार्श्‍वभूमीवर यापुढे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह जनतेनेही सावध राहून शासनाने सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहे.

 या अनुषंगाने लक्षात आलेली काही सूत्रे…

१. लोकप्रतिनिधींनी समूह संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे भान राखून कार्यक्रम केले पाहिजे किंबहूना त्या कार्यक्रमांची आवश्यकता किती आहे, हे पाहून टाळता येणारे कार्यक्रम टाळले पाहिजेत.

२. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘वेबिनार’, ‘झूम मीटिंग’ आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम केले पाहिजे.

३. ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकप्रतिनिधींनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

४. कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरण्याची सवय असलेले लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांची लहानशी चूकही सर्वांना महागात पडू शकते. आमदार वैभव नाईक हे याचेच उदाहरण आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.