रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग १)

१. ‘अंतर्मनातून नामजप चालू असणे’, हे समाधी लागल्यासारखेच असल्याने त्या वेळी प्रयत्नपूर्वक नाम घेण्याची आवश्यकता नाही !
एक साधक : परम पूज्य, मी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून नामजप करतो. नामजप चालू केल्यावर मला अर्धा घंटा आनंद वाटतो. नामजप करतांना माझ्या मनात एकही विचार येत नाही आणि त्या वेळी मला शरिराचीही जाणीव रहात नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : किती छान आहे ! ‘अंतर्मनातून नाम चालू असणे’, ही तर पुढची अवस्था आहे. हे एक प्रकारे समाधी लागल्यासारखे झाले. तुमचे मन निर्विचार झाले.
एक साधक : त्या वेळी प्रयत्नपूर्वक नाम घ्यायची आवश्यकता आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मुळीच नाही. आपल्याला त्या स्थितीत जाता येत नाही; म्हणून आपण प्रयत्नपूर्वक नामजप करतो. तेथपर्यंत जाता आले, तर मग आणखी काय हवे ?
एक साधक : त्यात आनंद मिळतो आणि प्रयत्नपूर्वक ध्यान लावले, तर ध्यानही लागते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमचे अर्धा घंटा ध्यान लागते. शेवटी साधनेचे ध्येय काय आहे ? काही प्रयत्न न करता ती स्थिती (ध्यानाची स्थिती) अनुभवता यायला हवी. ध्यान लावा किंवा समाधी लावा. समाधीत गेल्यावर मनात काहीच विचार नसतात. निर्विचार स्थिती असते. आपल्याला तेथपर्यंत जाता येत नाही; म्हणून आपण बाह्यमनाने प्रयत्न करतो आणि बाह्यमनाने प्रयत्न करता करता त्या स्थितीला जातो. ते झाले की, सगळेच पूर्ण झाले.
२. बौद्धिक कामे करतांना नामजप होत नसल्याने शारीरिक कृती करत असतांना नामजप करावा !
एक साधक : कोणतीही कृती करत असतांना माझा नामजप आपोआप चालू होतो; पण बुद्धीने एखादे काम करायचे म्हटले, तर नामजप होत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : बुद्धीला एका वेळी दोन कामे करता कशी येतील ? काहीतरी लिहायचे आहे आणि त्याच वेळी नामजपही करायचा आहे, तर दोन्ही एकाच वेळी करता येणार नाही. स्थूलदेहाने शारीरिक कृती करण्याच्या वेळी, उदा. अंघोळ करतांना, कपडे घालतांना, इस्त्री करतांना बुद्धीचे काम नसते. या कृती यांत्रिकपणे आपोआप होत असतात. त्या कृती करत असतांना नामजप करायचा. घराबाहेर गेल्यावर आणि प्रवासात असतांना जप करायचा.
३. साधनेत तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे !
एक साधिका : साधकांना साधनेसाठी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येतांना विरोध पत्करावा लागला आहे, तरी ते आश्रमात आले आहेत. त्यांना विरोधाचे काहीच वाटले नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : याला ‘तळमळ’ म्हणतात. साधनेत तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. तळमळ असली की, साधनेत आपली प्रगती होते.
एक साधिका : सर्व साधक म्हणतात, ‘‘दुपारी विश्रांती न घेता आपण सत्संग घेऊया आणि आपले प्रयत्न वाढवूया.’’ विश्रांती घेतांनाही ते ‘एकमेकांशी साधनेविषयी बोलणे, मानसपूजा आणि नामजप करणे’, असे प्रयत्न करतात. सर्व साधक एकत्र येऊन एकमेकांकडून शिकण्याचा प्रयत्न करतात.
४. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे !
४ अ. साधिकेने केवळ ग्रंथ न वाचता वाचलेले कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ३ – ४ वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) सत्संग घ्यायच्या. एकदा त्यांनी सत्संगात सांगितले, ‘‘पुढच्या आठवड्यात ‘भावजागृती’ हा विषय घेऊया. तुम्ही सर्वांनी ‘भावजागृतीसाठी साधना’, हा ग्रंथ वाचून या.’’ पुढच्या आठवड्यातील सत्संगात त्यांनी विचारले, ‘‘सर्वांनी ग्रंथ वाचला का ?’’ सगळ्यांनीच ग्रंथ वाचला होता; म्हणून सर्वांनी हात वर केला. केवळ एका साधिकेने हात वर केला नाही. तेव्हा सौ. गाडगीळ यांनी तिला विचारले, ‘‘तू आजारी होतीस का ? सेवा अधिक होती का ?’’ तरी ती बोलत नव्हती. मग तिला विचारले, ‘‘थोडे तरी वाचले असशील ना !’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘मी १० पाने वाचली आणि जे वाचले, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करत होते.’’ अध्यात्मात वाचलेले कृतीत आणायचे असते.
४ आ. धर्मराजाने स्वतःला राग येण्याच्या संदर्भात अभ्यास करून क्रोधावर मात करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : महाभारतातील एक उदाहरण आहे. एकदा द्रोणाचार्य बाहेरगावी जाणार होते. त्यांनी कौरव आणि पांडव यांना सांगितले, ‘‘मी ८ दिवस नसेन. तुम्ही तुम्हाला पाहिजे तो अभ्यास करा. मी आल्यावर परीक्षा घेईन.’’ आठ दिवसांनंतर ते परत आले. त्यांनी भिमाला विचारले, ‘‘तू गदा शिकण्यासाठी काय प्रयत्न केलेस ?’’ नंतर अर्जुनाला विचारले, ‘‘तू किती बाण मारून दाखवलेस ?’’ त्या दोघांनी उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी धर्मराजाला विचारले. तेव्हा तो काहीच बोलत नव्हता. द्रोणाचार्यांना राग आला. ‘धर्मराजाने पुष्कळ चांगले काही केले असेल’, असे त्यांना वाटले; पण तो काही न बोलल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आणि ते रागावले. त्यांनी धर्मराजाच्या एक थोबाडीत मारली. तेव्हा धर्मराजा म्हणाला, ‘‘मी कोणत्याही प्रसंगात राग येणार नाही’, या संदर्भात अभ्यास केला; पण राग येण्यासारखा प्रसंगच घडला नाही. आता तुम्ही मला मारले, तरी मला राग आला नाही.’’
(क्रमशः)
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/895626.html