सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत. २४.३.२०२५ या दिवशी या मार्गदर्शनातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.     

(भाग ३)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/895626.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१२. एखाद्या प्रसंगात मानसिक त्रास झाल्यास वाईट शक्तीचा त्रास असलेल्यांनी ‘नामजपादी उपाय करणे आणि स्वयंसूचना देणे’, हे दोन्ही करावे अन् त्रास नसलेल्यांनी केवळ स्वयंसूचना द्यावी !

एक साधक : रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी मला पुष्कळ मानसिक त्रास होत होता. यापूर्वी मला असा त्रास कधी झाला नव्हता. मला साधनेत येऊन साधारण ३ वर्षे झाली आहेत. माझा मानसिक त्रास बघून मी उत्तरदायी साधकाला सांगितले, ‘‘दादा, मला रामनाथीला जायचे नाही.’’ मला काही कळत नव्हते. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. मला कार्यालयातही बसवत नव्हते. मी ‘१५ मिनिटे नामजप करायचा’, असे ठरवल्यावर माझा केवळ ५ मिनिटे नामजप व्हायचा आणि मी उठून कुठेतरी जायचो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘असे झाले, तर काय करायचे ?’, याचे उत्तर तुम्हाला ठाऊक असले पाहिजे. प्रत्येक वेळी काही अयोग्य झाले, तर ‘वाईट शक्ती’, असे ‘लेबल’ लावायचे नाही. ‘वाईट शक्तीचा त्रास आहे कि नाही ?’, हे उत्तरदायी साधकांना विचारा. त्रास नसल्यास स्वभावदोष-निर्मूलनासाठी मनाला स्वयंसूचना द्या. त्रास असेल, तर स्वयंसूचना द्या आणि नामजपादी उपायही करा. त्रास नसणार्‍यांनी केवळ स्वयंसूचनांवर जोर द्यायला हवा.

१३. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने देहधारी गुरूंना आठवण्यापेक्षा देवतेचा नामजप करणे महत्त्वाचे आहे !

एक साधक : मी सत्संग घ्यायला जात असतांना ‘तुम्ही माझ्या समवेत आहात’, असे जाणवून माझा भाव जागृत होतो. इतर वेळी ‘कठीण परिस्थितीत तुम्ही कसे साहाय्य करता ? कशी अनुभूती देता ?’, हे आठवून माझी भावजागृती होते; पण आता रामनाथी आश्रमात आल्यानंतर तुमची तशी आठवण होत नाही किंवा तुम्हाला पाहूनही माझा भाव जागृत होत नाही. तेव्हा ‘मी तुमच्यापासून दूर गेलो कि काय ?’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आठवण इत्यादी सर्व मनाच्या स्तरावर झाले. माझी आठवण होत नसतांना तुमच्या मनाला काय वाटते ?

एक साधक : काही वाटत नाही. नामजप चालू असतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नामजप करणेच महत्त्वाचे आहे. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ आहे. देह हा नामापेक्षा सगुण झाला. राम, कृष्ण, विष्णु इत्यादी देवता देहधारी नाहीत. त्या सगळ्या सूक्ष्मातील आहेत. त्यामुळे नामजप करणेच अधिक महत्त्वाचे आहे. हा पुढचा टप्पा आहे. माझी आठवण तर नकोच. कृष्णाची आठवण व्हायला हवी; कारण तो युगानुयुगे असणार आहे. आपण देहधारी मनुष्य आहोत. आज आहोत, तर उद्या नाही.

१४. प्रारब्ध आणि ईश्वरेच्छा

एक साधक : एखाद्या घटनेत ईश्वरेच्छा आणि प्रारब्ध कसे ओळखायचे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कर्मयोग्यांच्या भाषेत प्रारब्ध, संचित कर्म आणि क्रियमाण कर्म असते. भक्तीयोग्यांच्या भाषेत स्वेच्छा आणि ईश्वरेच्छा असते.

योगमार्गाप्रमाणे ईश्वरेच्छा म्हणजे एक प्रकारे प्रारब्धच असते. ते आपण पालटू शकत नाही.

१५. आध्यात्मिक भावाचे टप्पे

एक साधक : दुपारी मी शिकायला मिळालेली सूत्रे लिहीत असतांना तुमची आठवण येऊन मला पुष्कळ रडायला येत होते. आताही तसेच होत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : भाव निर्माण करणे पुष्कळ कठीण आहे. आध्यात्मिक भावाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.

१५ अ. व्यक्त भाव

१५ अ १. पहिला टप्पा : जे आपल्या ओळखीचे असतात, ज्यांना आपण पाहिलेले असते, ज्यांच्याबद्दल आपल्याला ठाऊक असते, ज्यांचे लिखाण वाचलेले असते, त्यांच्याबद्दल आरंभी आपल्याला जरा जवळीक वाटते. जे आपल्या ओळखीचे असतात, त्यांच्याबद्दल आपल्या मनात भाव निर्माण होतो. संत आणि गुरु देहधारी असतात. आपल्याला त्यांना भेटता येते, त्यांच्याशी बोलता येते, तसेच त्यांना प्रश्न विचारता येतात. अशा प्रकारे आपल्याला त्यांना अनुभवता येते.

१५ अ २. दुसरा टप्पा : देहधारी संत नसले आणि त्यांची नुसती आठवण जरी झाली, तरी भावजागृती होते.

१५ अ ३. तिसरा टप्पा : आणखी पुढे गेले की, देहधारी संतांची आठवणही होत नाही. मग देवाची, कृष्णाची आठवण होते.

१५ आ. अव्यक्त भाव : आणखी पुढे गेल्यानंतर असा व्यक्त भाव निर्माण होत नाही. तेव्हा आपण अव्यक्त भावाच्या टप्प्याला जातो. ती भावावस्था २४ घंटे अंतर्मनात असते. आपल्याला बाह्य काही कळणार नाही, तरीही ती स्थिती महत्त्वाची आहे. तेव्हा देव आपल्याला साहाय्य करतो. तो अव्यक्त भाव म्हणजे ईश्वराशी अनुसंधान ! ते असले की, साधनेत प्रगती होते.

तात्कालिक भाव असेल, तर देव थोडे साहाय्य करतो. अखंड भाव असेल, तर देव २४ घंटे साहाय्य करतो. पुढच्या टप्प्याला जाणे महत्त्वाचे आहे.

(क्रमशः)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/896238.html

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.