
लंडन (ब्रिटन) – एकेकाळी भारतावर राज्य करणारा ब्रिटन आज भारताच्या आर्थिक शक्तीसमोर नतमस्तक होतांना दिसतो. ब्रिटन आता त्याच्या प्रगतीसाठी भारतीय गुंतवणूक, प्रतिभा आदींवर अवलंबून आहे. नुकतेच लंडनचे महापौर सादिक खान यांनी ‘ग्रोथ प्लॅॅन’ नावाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे अनावरण केले. यामध्ये भारताचे वर्णन ‘परकीय गुंतवणुकीचा सर्वांत मोठा स्रोत’, असे वर्णन केले गेले.
१. या विकास योजनेअंतर्गत लंडनने पुढील दशकात त्याची अर्थव्यवस्था १०७ अब्ज पौंडांनी वाढवण्याचे आणि सार्वजनिक सेवांसाठी अतिरिक्त कर म्हणून २७ अब्ज पौंड उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात सर्वांत मोठे योगदान भारतीय गुंतवणूक आणि कुशल व्यावसायिक यांचे असणार आहे.
२. ‘लंडन अँड पार्टनर्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरा सिट्रॉन म्हणाल्या की, भारतातील थेट परकीय गुंतवणूक सर्वांत वेगाने वाढत असून गेल्या २ वर्षांपासून ती आमचा क्रमांक १ चा स्रोत आहे.
३. याचा सरळ अर्थ असा की, भारतीय तंत्रज्ञान आस्थापने आता लंडनमध्ये त्यांचे पाय रोवत असून लंडनच्या आर्थिक पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एवढेच नव्हे, तर भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक यांनीही ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन चालना दिली आहे.
४. वर्ष २०२३-२४ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, लंडनमध्ये ३८ सहस्र ६२५ भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे प्रमाण एका दशकापूर्वीच्या तुलनेत ४ पट अधिक आहेत.
५. ‘लंडन हायर एज्युकेशन नेटवर्क’चे अध्यक्ष मार्क हर्टलिन म्हणाले की, लंडनमध्ये शिक्षण घेणार्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण आता २० टक्के आहे. ते शहराच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असून दोन्ही देशांमधील भक्कम सेतु आहेत.
संपादकीय भूमिकाभारतावर १५० वर्षे राज्य करून भारत लुटणार्या ब्रिटिशांना आता त्यांच्या आर्थिक विकासासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणे, म्हणजे नियतीने त्यांना दिलेली शिक्षाच होय ! |