श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची लांजा पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
लांजा – बांगलादेशातील रोहिंग्या घुसखोरांच्या अवैध कृत्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे घुसखोर असल्याची माहिती सर्वांना आहे. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायत सीमेत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती घेऊन त्यांची कागदपत्रे पडताळावीत आणि ही कारवाई विनाविलंब करावी. यामुळे भविष्यात निर्माण होणार्या समस्या अल्प होतील, तसेच सुव्यवस्था चांगली रहाण्यास साहाय्य होईल. ही कारवाई कोणताही समाज अथवा धर्म यांच्याशी निगडीत नसून देशद्रोह्यांच्या विरोधात आहे. याला कोणताही धार्मिक रंग देण्यात येऊ नये. घुसखोर आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या लांजा शाखेच्या वतीने येथील पोलीस ठाणे, तहसीलदार आणि लांजा नगरपंचायत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदु समाजावर अकारण अत्याचार चालू असणे ही संतापजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. अशा प्रकारे हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक आघात करणारे बांगलादेशातील घुसखोर (रोहिंगे) भारतातही सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करत आहेत. लांजा तालुक्यात भाडे तत्त्वावर रहाणारे आणि आठवडा बाजार, तसेच अन्य दिवशी बाहेरून येणारे व्यापारी आणि त्यांचे कामगार यांची कागदपत्रे तपासून ते भारतीय आहेत का ? याची खात्री करावी. भाड्याने जागा देणार्यांनी भाडेकरूंची माहिती नगरपंचायत आणि पोलीस ठाणे येथे द्यावी. यामध्ये विलंब न करता तात्काळ कारवाई करण्यात यावी.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा विभागातील धारकरी श्रेयस शेट्ये, सचिन कदम, सुशांत रहाटे, रुपेश चव्हाण, अजय सावंत, प्रवीण पावसकर, परशुराम गुंजीकर, अनिकेत शेट्ये, ओम कुंभार, उदय शिंदे (रा.स्व. संघ), शिवप्पा उकळी, माजी नगरसेवक मंगेश लांजेकर, विश्व हिंदु परिषदेच्या सत्संग प्रमुख मनिषा घाटे, सनातन संस्थचे डॉ. समीर घोरपडे आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.