India Criticises Secrecy In UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कामकाजात सुधारणा करण्याची तातडीने आवश्यकता ! – पी. हरीश, संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी

भारताने पुन्हा केली मागणी !

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कामकाजात सुधारणा करण्याची तातडीने आवश्यकता असल्याचे संयुक्त राष्ट्रांमध्ये एका आंतरसरकारी परिषदेत बोलतांना सांगितले.

पी. हरीश म्हणाले की,

१. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पालट करण्याची आमची मागणी स्पष्ट आहे. मानवतेशी संबंधित महत्त्वाच्या सूत्रांवर कोणतेही ठोस पाऊल उचलण्यास संयुक्त राष्ट्र संघ सक्षम नसल्यावरून जगभरातून प्रश्‍न उपस्थित केले जात असतांना हे आणखी महत्त्वाचे बनते.

२. सुरक्षा परिषदेच्या संबंधित संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्याची आवश्यकता आहे. सूचीबद्ध निर्णय सार्वजनिक केले जातात, तर सूचीबद्ध विनंत्या नाकारण्याचे किंवा तांत्रिक स्थगिती देण्याचे तपशील गोपनीय ठेवले जातात. हा प्रत्यक्षात एक छुपा ‘व्हीटो’ (नकाराधिकार) आहे.

३. आतंकवादी संघटनांना काळ्या सूचीमध्ये टाकण्याची मागणी नाकारण्याची किंवा प्रलंबित ठेवण्याची कारणे दिली पाहिजेत.

४. यापूर्वी अनेक वेळा पाकपुरस्कृत आतंकवादी गटांवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने अडथळा आणला आहे.

५. संयुक्त राष्ट्रांचे बहुतेक सदस्य देश सुरक्षा परिषदेत पालट करण्याच्या बाजूने आहेत; परंतु असे असूनही या दिशेने व्यावहारिकदृष्ट्या कोणतेही काम झालेले नाही. यासंदर्भात आमच्या अनेक चर्चा आणि बैठका झाल्या आहेत; परंतु परिस्थिती तशीच आहे. सदस्य देशांनी आता वाटाघाटींमध्ये अधिक वेळ वाया घालवू नये. पुढे जाण्याची आणि निकाल दाखवण्याची वेळ आली आहे.

संपादकीय भूमिका 

एकूणच संयुक्त राष्ट्रे एक बुजगावणे ठरले आहे. त्याच्यावर खर्च करण्यात येत असलेल्या पैशांच्या तुलनेत त्याच्याकडून किती प्रमाणात ठोस कृती, निर्णय आदी घेतले जातात, याचा आढावा घेणे आवश्यक झाले आहे. जर याच्या कार्यपद्धतीत पालट होणार नसेल, तर या संघटनेला विसर्जित करणेच योग्य ठरेल !