S Jaishankar Slams Bangladesh : भारताशी कोणत्या प्रकारचे संबंध हवेत, हे बांगलादेशाने प्रथम ठरवावे !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी बांगलादेशाला फटकारले !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – एकीकडे बांगलादेश भारताशी असलेल्या चांगल्या संबंधांविषयी बोलतो; पण दुसरीकडे प्रत्येक समस्येसाठी भारताला उत्तरदायी धरतो. जर बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील कुणीतरी प्रतिदिन प्रत्येक समस्येसाठी भारताला उत्तरदायी धरत असेल, तर ते योग्य नाही. भारताशी कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत, हे बांगलादेशाने ठरवायचे आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी बांगलादेशाला फटकारले.

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होणारी आक्रमणे भारतासाठी चिंतेचा विषय !

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये २ प्रमुख सूत्रे उदयास येत आहेत. पहिले म्हणजे बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होणारी आक्रमणे जी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. हे एक गंभीर सूत्र आहे आणि आम्ही त्यावर आमचे विचार मांडू. (बांगलादेशात हिंदूंवर आक्रमणे पूर्वीपासून होत आहेत; मात्र गेल्या ७ मासांत ती प्रचंड वाढली आहेत. अद्यापही भारत यावर विचारच मांडण्याचा विचार करत रहाणार असेल, तर हिंदूंचे रक्षण होईपर्यंत त्यांचे अस्तित्व तरी राहील का ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक) दुसरे सूत्र म्हणजे बांगलादेशाचे अंतर्गत राजकारण. हे एक मोठे सूत्र असून जे भारतासमवेतच्या संबंधांवर परिणाम करत आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशानेच नाही, तर भारतानेही हे ठरवणे आवश्यक आहे. बांगलादेशात अजूनही प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत आहेत आणि भारत निष्क्रीय आहे, असेच जगभरातील हिंदू पहात आहेत !