Bangladesh Politics : महंमद युनूस यांना मुख्य सल्लागार नियुक्त करण्यास बांगलादेशाच्या सैन्यदलप्रमुखांचा होता विरोध !

जातीय नागरिक पक्षाचे मुख्य संघटक हसनत अब्दुल्ला यांचा दावा

बांगलादेशचे सैन्यदलप्रमुख जनरल वकार उझ-जमान (डावीकडे) मुख्य सल्लागार महंमद युनूस (उजवीकडे) जातीय नागरिक पक्षाचे मुख्य संघटक हसनत अब्दुल्ला (वर्तुळात)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते आणि बांगलादेशाचे सैन्य यांच्यातील वाद उघडकीस आला आहे. बांगलादेशाच्या नव्याने स्थापन झालेल्या जातीय नागरिक पक्षाचे मुख्य संघटक हसनत अब्दुल्ला यांनी व्हिडिओद्वारे देशाचे सैन्यदलप्रमुख यांच्याविषयी दावा करतांना म्हटले की, सैन्यदलप्रमुख जनरल वकार उझ-जमान हे नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांना मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास उत्सुक नव्हते.

अंतरिम सरकारचे युवा आणि क्रीडा सल्लागार असीम महमूद शाजीब भुईयान यांचा २८ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांनीही म्हटले आहे की, सैन्यदलप्रमुखांनी युनूस यांच्या पात्रतेविषयी शंका व्यक्त केली आहे. ते नोबेल पुरस्कार विजेते असूनही आणि सुधारणावादी असूनही या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती नाहीत, असे यात म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्यदलप्रमुख जमान यांनी देश योग्य हातांत सोपवण्याचा आग्रह धरला होता.

सैन्यात निर्माण झाले २ गट !

भारतीय गुप्तचरांच्या माहितीनुसार युनूस आणि देशातील राजकीय आघाडी यांविषयी बांगलादेशाच्या सैन्यात दोन गट आहेत. यांपैकी एक गट ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी संबंधित घटकांना पाठिंबा देतो आणि दुसरा गट शेख हसीना यांच्या अवामी लीगशी संबंधित आहे. या गटांमुळे सैन्यात तणाव वाढला आहे.

जमान यांच्याविरुद्ध कट रचला

बांगलादेश सैन्याचे क्वार्टरमास्टर जनरल लेफ्टनंट जनरल महंमद फैजुर रहमान आणि सैन्यदलप्रमुख वकार उझ-जमान यांच्यातील मतभेदांमुळे अस्थिरता वाढली आहे. अलीकडेच फैजुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील जमानविरोधी सैन्याधिकार्‍यांनी त्यांना पदच्युत करण्यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु ते अयशस्वी झाले.