RSS On Bangladeshi Hindus : बांगलादेशातील हिंदूंचे दायित्व भारताचे आहे आणि त्यापासून तो पळू शकत नाही !

रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने केले स्पष्ट !

संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा चालू आहे. या सभेकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांनी म्हटले की, बांगलादेशातील हिंदूंचे दायित्व भारताचे आहे आणि आपण या कर्तव्यापासून पळू शकत नाही.

‘छळ झालेल्या हिंदूंना भारताने स्वीकारावे का ?’, या प्रश्‍नाचे उत्तर देतांना अरुण कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की,

१. ज्या भारताला आपण अभिमानाने आपला देश म्हणतो, त्याला जितका भारतातील हिंदूंनी आकार दिला, तितकाच बांगलादेशातील हिंदूंनीही आकार दिला आहे.

२. बांगलादेशातील हिंदूंनी शांततेत आणि आनंदाने जगले पाहिजे. त्यांनी त्यांच्या देशासाठी योगदान दिले पाहिजे; परंतु भविष्यात कोणतीही कठीण परिस्थिती उद्भवली, तर आपण (भारतातील हिंदू) मागे हटू शकत नाही. जर अशी परिस्थिती उद्भवली, तर आपण ती सोडवू.

३. वर्ष १९४७ मध्ये फाळणी झाली. हे दुर्दैवी होते. आम्ही लोकसंख्येचे नव्हे, तर भूमीचे विभाजन केले. दोन्ही देशांनी अल्पसंख्यांकांच्या संरक्षणावर सहमती दर्शवली होती. नेहरू-लियाकत करारावरही स्वाक्षरी झाली. बांगलादेशाने त्याचा आदर केला नाही, हे दुर्दैवी आहे. आमची इच्छा आहे की, ते जिथे रहातात, तिथे त्यांनी आदराने, सुरक्षिततेने आणि धार्मिक ओळखीने जगावे. हे साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

४. याकडे राजकीय सूत्र म्हणून पाहू नये. राजवट पालटली आहे; परंतु हिंसाचाराचे ते एकमेव कारण नाही. त्याला धार्मिक पैलू देखील आहे. हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक हे (तेथील कट्टरतावाद्यांचे) प्राथमिक आणि सततचे लक्ष्य आहेत. हिंदु आणि अल्पसंख्यांक यांचा छळ काही नवीन नाही.

५. बांगलादेशातील हिंदु समुदायासाठी हे एक अस्तित्वाचे संकट आहे. अलीकडील हिंसाचारावरून असे दिसून आले आहे की, बांगलादेशी सरकार आणि त्यांच्या संस्था हिंदु अन् अल्पसंख्यांक यांच्यावरील आक्रमणांंमध्ये सहभागी आहेत, जी गंभीर चिंतेची गोष्ट आहे.

६. या हिंसाचाराला उत्तरदायी असलेले लोक केवळ हिंदूविरोधीच नाही, तर भारतविरोधी देखील बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात अनेक नेत्यांनी विधाने केली आहेत. आमचे आमच्या शेजारी देशांशी सहस्रो वर्षांपासून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत. भारत आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये अविश्‍वास अन् मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामागे अनेक आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत. आम्ही पाकिस्तान आणि ‘अमेरिकन डीप स्टेट’च्या भूमिकेवर चर्चा केली आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासमवेत एकजुटीने उभे रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थिती पूर्ववत् होईपर्यंत प्रयत्न चालूच राहिले पाहिजेत !

बांगलादेशातील परिस्थितीविषयी केंद्र सरकारच्या प्रतिसादावर रा.स्व. संघ समाधानी आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले की, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, हा प्रश्‍न पूर्णपणे सुटलेला नाही. सरकार त्याचे काम करत आहे आणि आम्ही शक्य तितकी सर्व पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने या समस्येचे गांभीर्य समजून घेतले आहे. परराष्ट्रमंत्र्यांना विविध ठिकाणी पाठवले आहे. वैयक्तिक चर्चा केली आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपिठांचा वापर केला आहे. याविषयी आम्हाला समाधान आहे. आम्ही आमच्या प्रस्तावात ही चिंता नमूद केली आहे. सामान्य स्थिती पूर्णपणे पूर्ववत् होईपर्यंत प्रयत्न चालूच राहिले पाहिजेत.

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा का ? असे विचारले असता अरुण कुमार म्हणाले की, शेख हसीना यांना पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्णय बांगलादेशाचे लोक घेतील. त्यांची स्वतःची राज्यघटना आणि व्यवस्था आहे. मला वाटत नाही की, इतर कोणत्याही देशाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.