‘७.११.२०२२ या दिवशी वैकुंठचतुर्दशी असल्याने त्यानिमित्त गुरुदेवांच्याच कृपेने विशेष दैवी सत्संग झाला. त्या दैवी सत्संगात कु. प्रार्थना पाठक यांनी सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग आणि साधिकांनी सांगितलेली आत्मनिवेदनपर सूत्रे येथे दिली आहेत. या लेखातील काही सूत्रे आपण १८ फेब्रुवारी या दिवशी पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/885615.html
२. कु. प्रार्थना पाठक (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) हिने सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग

नंतर कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) हिने ‘गुरुदेवांमध्ये साक्षात् विष्णु आणि शिव यांचे तत्त्व आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग सांगितला. तो पुढीलप्रमाणे – ‘आता आपण डोळे मिटूया. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आता आपल्याला द्वैताकडून अद्वैताकडे घेऊन जाणार आहेत. ‘आपण आता कुठे जात आहोत ? कशासाठी जात आहोत ?’, हे आपल्याला काहीच कळत नाही. आपण जसजसे पुढे जात आहोत, तसतसा आपण दिव्य थंडावा अनुभवत आहोत.
आपल्याला एक शिखर दिसत आहे. कोणते आहे हे दिव्य शिखर ? हे तर साक्षात् कैलासपर्वताचे शिखर आहे. ‘साक्षात् महादेवाचे दर्शन होणार’, या आनंदात आपण कैलासाच्या शिखरावर पोचलो आहोत. सर्वत्र निळ्या रंगाचा प्रकाश पसरला आहे. कर्पूराचा सुगंध दरवळत आहे आणि एका पांढर्या रंगाच्या प्रकाशझोतातून एक दिव्य मूर्ती साकार होत आहे. साक्षात् शिवशंकर आपल्याला दर्शन देत आहे. मस्तकावर जटा आणि गळ्यात सर्पमाला असे त्याचे ध्यानमग्न रूप पाहून आपण एक वेगळीच शांतीची स्थिती अनुभवत आहोत. आपले डोळे नकळत मिटले गेले. ही शांतीची स्थिती अनुभवत असतांनाच आपल्या अंतर्मनाने आता आनंदाच्या स्थितीत प्रवेश केला आहे.
आपण डोळे उघडून पहातो तर काय ? आपल्याला सागराच्या थंड लाटा स्पर्शून जात आहेत आणि आपल्या डोळ्यांसमोर शेषासनावर श्रीविष्णु पहुडला आहे. पिवळे पितांबर नेसलेल्या त्या चक्रपाणीचे दर्शन घेता क्षणी आपले मन आनंदाने डोलू लागले आहे.
आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, ‘आपण कैलासावरून थेट क्षीरसागरी कसे आलो ?’ त्याच वेळी आपल्याला दृश्य दिसत आहे, ‘कैलास आणि क्षीरसागर आता एकरूप होत आहेत. शिवशंकर आणि श्रीविष्णु आता एकरूप होऊन एक तत्त्व निर्माण झाले आहे अन् हे तत्त्व विश्वातील चराचरात व्यापलेले आहे.
कोणते आहे हे तत्त्व ? हे आहे ‘गुरुतत्त्व !’ या गुरुतत्त्वातून एक भव्य, दिव्य आणि तेजस्वी मूर्ती साकार होत आहे. कोण आहेत हे ? हे तर आपले प्राणप्रिय गुरुदेव आहेत. आपल्याला दिसलेल्या दृश्याचे रहस्य गुरुदेवांच्या दिव्य दर्शनातून आता उलगडले गेले आहे. त्रिदेवस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी आता कृतज्ञतापुष्प अर्पण करूया.
हे गुरुदेवा, तुम्हीच साक्षात् परमेश्वरस्वरूप आहात. तुमच्यातच विश्वातील सारी तत्त्वे सामावली आहेत. तुम्हीच ब्रह्मा, विष्णु अन् महेश स्वरूप असून आम्हा साधकजनांचे पालनहार आहात. तुम्हीच शिव आणि महाविष्णु यांच्यातील अद्वैतस्वरूप आहात. ‘हे गुरुदेवा, आज तुम्हीच आम्हाला ही अद्वैताची अनुभूती दिली’, त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
२ आ. भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ आ १. कु. वैदेही खडसे (आताच्या सौ. वैदेही पाटील) : ‘मला भावजागृतीचा प्रयोग पूर्ण अनुभवता आला. मला अन्य वेळी भावजागृतीचा प्रयोग अखंड अनुभवता येत नाही; मात्र आज मला भावजागृतीचा प्रयोग संपूर्ण एकाग्रतेने अनुभवता आला. माझा भाव दाटून येत होता; मात्र माझ्यातील भाव व्यक्त होत नव्हता. ‘वातावरणातील निर्गुण तत्त्वात पुष्कळ पुष्कळ वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.’
२ आ २. कु. मधुरा गोखले : ‘मी गुरुदेवांना विष्णुरूपात अनुभवले आहे; मात्र शिवरूपात कधी अनुभवले नव्हते. देवाच्याच कृपेने मी प्रथमच गुरुदेवांना शिवरूपात अनुभवल्याने मला पुष्कळ आनंद जाणवत होता.’
२ आ ३. कु. शर्वरी कानस्कर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे) : ‘या आधी प्रत्येक भावजागृतीचा प्रयोग एका देवतेशी निगडित असे; मात्र या वेळी शिव आणि विष्णु अशी दोन्ही तत्त्वे एकत्रित असणारा भावजागृतीचा प्रयोग मला अनुभवता आला. भावजागृतीच्या प्रयोगात मला श्रीविष्णूच्या चरणी गुलाबी रंगाचे कमळपुष्प आणि शिवाच्या चरणी श्वेत रंगाचे कमळपुष्प अर्पण करतांना पुष्कळ थंडावा जाणवत होता. भावजागृती प्रयोगाच्या समारोपाच्या सत्रात माझे ध्यान लागत होते.’
३. प्रार्थना आणि कृतज्ञता
प.पू. गुरुदेवांच्याच अनंत कृपेमुळे आम्हाला सत्संगात शिव अणि श्रीविष्णु यांचे तत्त्व एकत्रित अनुभवता आले. एवढेच नव्हे, तर आम्हाला परात्पर गुरुदेवांचेही श्रीविष्णुरूपात आणि शिवरूपात दर्शन झाले. हे गुरुदेवा, हे सत्संगरूपी भक्तीपुष्प मी आपल्या चरणी अर्पण करते. कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
– कु. अपाला औंधकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (९.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |