वैकुंठचतुर्दशी निमित्त झालेल्‍या दैवी सत्‍संगात साधिकांना शिव-विष्‍णु यांचे एकत्रित तत्त्व कार्यरत असल्‍याच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

‘७.११.२०२२ या दिवशी वैकुंठचतुर्दशी असल्‍याने त्‍या निमित्त गुरुदेवांच्‍याच कृपेने विशेष दैवी सत्‍संग घेता आला. त्‍या दैवी सत्‍संगात कु. अपाला औंधकर यांनी सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. अपाला औंधकर

१. केवळ वैकुंठचतुर्दशीच्‍या दिवशी वैकुंठलोकाचे द्वार श्रीमन्‍नारायणाच्‍या प्रिय भक्‍तांसाठी उघडे असणे; मात्र श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवांच्‍या कृपेमुळे भूवैकुंठरूपी रामनाथी आश्रमाचे द्वार साधकांसाठी सदैव उघडे असणे : ‘वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ वैकुंठचतुर्दशीच्‍या दिवशी वैकुंठलोकाचे द्वार श्रीमन्‍नारायणाच्‍या प्रिय भक्‍तांसाठी उघडे असते. या दिवशी ‘जो कुणी थोडीशी श्रीमन्‍नारायणाची भक्‍ती करील, त्‍याला मृत्‍यूत्तर वैकुंठलोकाची प्राप्‍ती होईल’, हे निश्‍चित आहे’, असे शास्‍त्रात लिहिलेले आहे; मात्र आपण सर्व साधक किती भाग्यवान आहोत ! साक्षात् रामनाथी आश्रम हा भूवैकुंठच आहे आणि साधकांसाठी केवळ एक दिवस नाही, तर प्रत्येक दिवस याचे द्वार उघडेच आहे. श्रीमन्नारायणस्‍वरूप गुरुदेवांच्याच अनंत कृपेमुळे आपण प्रतिदिन भूवैकुंठरूपी आश्रमात प्रवेश करतो. एवढेच नव्हे, तर ‘जिथे श्रीमन्नारायणाचे स्थुलातून अस्तित्व आहे, तिथे राहून आपल्याला सेवा आणि साधना करण्याची अमूल्य संधी मिळाली आहे’, याबद्दल आपल्या मनात कृतज्ञताभाव सतत जागृत ठेवूया.

२. वैकुंठचतुर्दशीच्‍या दिवशी शिव-विष्‍णु यांचे एकत्रित तत्त्व कार्यरत असणे आणि नरहरी सोनारांनी विठ्ठलासाठी करगोटा बनवण्‍याची कथा सांगितल्‍यावर सभागृहात वेगळाच थंडावा जाणवणे : वैकुंठचतुर्दशीच्‍या दिवशी शिवाला तुळशीपत्र आणि श्रीविष्‍णूला बिल्‍वपत्र अर्पण केले जाते. ‘विष्‍णु आणि शिव एकाच परमात्म्‍याची २ प्रगट रूपे आहेत. ते एकच आहेत’, असे पुराणांमध्ये लिहिले आहे. आज विष्णु आणि शिव यांचे एकत्रित तत्त्व कार्यरत झाले असल्याने मी सत्संगात संत नरहरी सोनारांनी विठ्ठलासाठी करगोटा बनवण्याची कथा सांगितली, ‘ पंढरपूर येथे नरहरी सोनार रहात होते. ते मोठे शिवभक्त होते. त्यांनी भगवान शिवाची आराधना करून शिवशंकराला प्रसन्न करून घेतले होते. ते पंढरपूर येथे रहात असूनही ते विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी द़ेवळात गेले नव्हते. त्‍यांंची श्रद्धा केवळ भगवान शिवावर होती. त्यांनी अन्य देवतांची कधीच पूजाही केली नव्हती.

एकदा एका सावकाराने पंढरपूर येथे येऊन विठोबाला नवस केला, ‘मला पुत्र झाला, तर मी तुला सोन्‍याचा करगोटा घालीन.’ त्‍या सावकाराला पुत्र झाल्‍यावर तो नवस फेडण्‍यासाठी पंढरपूर येथे आला. ‘सुवर्णाचा करगोटा करून त्‍यावर हिरे-माणके जडवील, असा कुशल सोनार पंढरपूर येथे आहे का ?’, याविषयी त्याने तेथील पुजार्‍याकडे चौकशी केली. पुजार्‍याने नरहरी सोनारांचे नाव सुचवले. त्यानुसार सावकार नरहरी सोनारांकडे आला.

सावकाराने नरहरी सोनारांना हिरे-माणके जडवून करगोटा बनवण्‍यास सांगितले. त्‍यावर नरहरी सोनार म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही विठोबाच्‍या कमरेचे माप घेऊन या. त्‍यानुसार मी करगोटा बनवून देतो.’’ सावकार लगेचच विठ्ठलाच्‍या कमरेचे माप घेऊन आला. त्‍याप्रमाणे नरहरीने सोन्‍याचा करगोटा बनवून दिला.

सावकार तो करगोटा घेऊन मंदिरात गेला. त्‍याने श्री विठ्ठलाची षोडशोपचार पूजा केली आणि तो विठ्ठलाच्‍या कमरेला करगोटा बांधू लागला; पण तो अपूरा पडू लागला. सावकाराने पुन्‍हा नरहरी सोनारांकडे जाऊन तो वाढवून आणला; पण या वेळी तो करगोटा सैल होऊ लागला. काही केल्या करगोटा विठोबाच्या कमरेला बसेना. त्यामुळे त्या सावकाराला खंत वाटू लागली. शेवटी तो नरहरी सोनारांकडे येऊन म्हणाला, ‘‘आपणच मंदिरात येऊन करगोटा नीट बसवून द्यावा.’’ सावकाराने पुष्कळ विनवण्या करूनही नरहरी सोनार मंदिरात यायला सिद्ध नव्हते. त्यांनी स्पष्‍टपणे सांगितले, ‘‘मी शिवशंकरांविना अन्य द़ैवते पहात नाही. तो माझा निश्चय आहे.’’

सावकाराने फारच आग्रह केल्‍यावर नाईलाजाने नरहरी विठ्ठलाच्‍या मंदिरात जायला निघाले; पण त्‍यांनी डोळ्‍यांवर पट्टी बांधली. ‘विठ्ठलाचे रूप स्‍वतःला दिसणार नाही’, याची पूर्ण काळजी घेऊन सावकाराचा हात धरून त्‍यांनी मंदिरात प्रवेश केला. ज्‍या विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी लोक दूर अंतरावरून दर्शनाला येतात, त्‍या विठ्ठलाचे दर्शन घेण्‍याचे टाळण्‍यासाठी या पंढरपूरवासियानेच डोळ्‍यांवर पट्टी बांधलेली पाहून तेथील भाविकांना आश्चर्य वाटू लागले.

नरहरी सोनार गाभार्‍यात गेल्‍यावर ते विठ्ठलाच्‍या मूर्तीला हातांनी चाचपू लागले; पण चमत्‍कार झाला. त्‍यांच्‍या हाताला शिवशंकराचा स्‍पर्श जाणवू लागला. ‘गळ्‍यात सर्प, मस्‍तकावर जटा, असा तो नीलकंठ साक्षात् विटेवर उभा आहे’, असे नरहरी सोनारांना वाटू लागले. ‘‘हे तर माझेच आराध्यद़ैवत !’’ असे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. त्यांनी डोळ्यांवरील पट्टी काढल्यावर त्यांना ‘समोर विठ्ठल उभा आहे’, असे दिसले. त्यांनी पुन्हा लगेच डोळ्यांवर पट्टी बांधली; पण या वेळीही त्यांना शिवशंकराचा स्पर्‍श जाणवला. असे २ – ३ वेळा झाले. तेव्हा नरहरी सोनार यांनी सद्गद़ित होऊन विठ्ठलाचे चरण धरले. त्यांनी झाल्या अपराधाची क्षमा मागितली. ते म्हणाले, ‘हे पंढरीनाथा, मी वृथा मनात द्वैतभाव धरला. तुझ्या  कृपेने तो आता दूर झाला. आता मला तुझ्या चरणी ठाव देऊन माझ्या जीवनाचा उद्धार कर.’ अशा प्रकारे विठुरायाने संत नरहरी सोनार यांच्यातील द्वैतभाव नाहीसा करून त्यांना अद्वैताची अनुभूती दिली. त्यानंतर त्यांनी विठ्ठलाला करगोटा घातला. तो व्यवस्‍थित बसला. सावकारालाही आनंद झाला.’

त्‍या वेळी मला (अपालाला) सभागृहात वेगळाच थंडावा जाणवत होता. ‘सत्‍संगात साक्षात् शिव-विष्‍णु यांचे सगुण तत्त्व कार्यरत झाले आहे’, अशी अनुभूती मला घेता आली.’

(क्रमशः)

– कु. अपाला औंधकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (९.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/887262.html